Breaking

धक्कादायक : १६ वर्षीय बलात्कार पीडितेला आरोपी सोबत दोरीने बांधून "भारत माता की जय"च्या घोषणा देत गावातून धिंड


भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून जवळपास ४०० किमी दूर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल अलिराजपूर जिल्ह्यातील एका गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गावकऱ्यांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या नातलगांनी, कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालायला भाग पाडल्याचं समोर आलं आहे, इतकंच नाही तर दोघांची धिंड काढताना हा जमाव 'भारत माता की जय'च्या घोषणाही देत होता.


या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. रविवारी हा प्रकार घडल्याचं समजतंय.


व्हायरल व्हिडिओमध्ये पीडिता आणि आरोपीला एका दोरीने बांधून त्यांची धिंड काढताना दिसत आहे. त्यांच्या चहुबाजूला काही लोकं असून ते 'भारत माता की जय'च्या घोषणा देत आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पीडितेची जमावापासून सूटका केली. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकारी दिलीपसिंह बिल्वाल यांनी दिली.


"या प्रकरणी बलात्कार करणाऱ्या आरोपीला आणि धिंड काढणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा बलात्काराचा आरोप असलेल्या २१ वर्षीय व्यक्तीविरोधात, तर दुसरा गुन्हा पीडितेच्या नातेवाईकांविरोधात आणि गावकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. पीडितेला आणि आरोपीला मारहाण करुन त्यांची धिंड काढल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे", अशी माहिती दिलीपसिंह बिल्वाल यांनी दिली. भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत आणि लैंगिक अपराधांपासून लहान मुलांच्या संरक्षण कायद्यातील तरतुदींखाली (पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.


दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे मध्य प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा