Breakingसोलापूर : 'एसएफआय - डीवायएफआय' तर्फे महाराष्ट्रातील शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण


सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) तर्फे 23 मार्च रोजी शहिद स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या आणि बेरोजगारीच्या विरोधात राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत आज सोलापुरातील दत्त नगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात युवक आणि विद्यार्थ्यांनी लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.


यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपोषणस्थळी सर्व सामान्यांना न परवडणारी ऑनलाइन शिक्षण प्रणाली रद्द करा, तातडीने पारदर्शक नोकरभरती प्रक्रिया राबवा, शिक्षणाचे खाजगिकरण बंद करा व अन्य विविध मागण्यांचे फलक लावण्यात आले होते.


उपोषण करत असताना उपोषणकर्ते युवक आणि विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक गीते सादर केली. दरम्यान संयुक्त कामगार कृती समिती आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने अशोक इंदापुरे, नसीमा शेख, सुनंदा बल्ला यांनी उपोषणकर्त्याना पाठिंबा दिला. तसेच सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे महासचिव ऍड. एम. एच. शेख यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्याना पाठिंबा दिला.


याप्रसंगी डीवायएफआयचे राज्य सचिव मंडळ सदस्य दत्ता चव्हाण, एसएफआय चे जिल्हा अध्यक्ष माललेशम कारमपुरी जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव, मीरा कांबळे, शामसुंदर आडम, राहुल भैसे, प्रशांत आडम, विजय साबळे, अश्विनी मामड्याल, पूनम गायकवाड, प्रिया किर्तने, डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष मुन्ना कलबुर्गी, प्रदेश उपाध्यक्ष अशोक बल्ला, जिल्हा सचिव अनिल वासम, अकिल शेख, आसिफ पठाण, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, प्रविण आडम, दिनेश बडगू, विनायक भैरी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा