Breaking


विशेष लेख : अलेक्सांद्रा कोलान्ताई - सोविएत रणरागिनी - इर्शाद बोरकर


आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला गेला. त्याच पार्श्वभूमीवर आज एका महिलेच्या कर्तृत्वाबद्दल लिहीत आहे कि जिचं नाव आज आपल्या (तोकड्या ) इतिहासाच्या पडद्यामागे गेलं आहे. तिचा आज स्मृतिदिन देखील आहे. विसाव्या शतकातील कम्युनिस्ट चळवळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रशियन राज्यक्रांती, लेनिन स्टॅलिन इत्यादी नावे पटकन येतात. कम्युनिस्ट चळवळीतील  महिला म्हटलं की अगदी मोजक्याच महिलांची नाव आठवतात- रोजा लक्झेंबर्ग क्लारा जेटकिन, नदेझ्दा कृपस्कया ( लेनिन यांच्या पत्नी) रशियातील अलेक्सांद्रा कोलान्ताई हे नाव तसं कोणाच्या  खास  परिचयाचे नसेल. नावातच ताई असलेल्या या ताईने विसाव्या शतकातील सुरुवातीस क्रांतीच्या भोवऱ्यात अडकलेल्या रशियात एक वेगळाच इतिहास स्वतःच्या कार्याने घडविला. 


जगातील कामगारवर्गाची पहिली वहिली राज्यक्रांती रशियामध्ये १९१७ मध्ये घडवून आणण्यात  कोलान्ताईंचा महत्त्वाचा वाटा होता. लेनिनच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियातील संपूर्ण राजकीय सत्ता बोल्शेविकांच्या हाती आली आणि  तिथे कम्युनिस्ट सत्ता प्रस्थापित झाली. या सरकारमध्ये अलेक्सांद्रा कोलान्ताई ही पहिली व एकमेव महिला प्रतिनिधी समाविष्ट होती. कम्युनिस्ट सरकार मधील मंत्र्यांना कमीसार म्हटले जायचे. समाजकल्याण खात्याचे कमिसार बनुन या पोलादी स्त्रीने रशियातील स्त्रियांच्या शैक्षणिक, आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी हरतरेने भरीव प्रयत्न केलेत. तसेच कम्युनिस्ट पार्टीचे अंतर्गत महिलांना समान न्याय व संधी मिळाव्यात यासाठी देखील स्वतंत्र विभाग स्थापन केला. कोलान्ताई ह्या एक क्रांतिकारक, डिप्लोमॅट तसेच लेखक आणि राजकीय  सैद्धांतिक मांडणी करणाऱ्या अभ्यासक होत्या. स्त्रियांची सर्वांगीण सबलीकरण आणि मुक्तता ही केवळ राजकीय सुधारणांतून येणार नाही तर ती सद्यस्थितीतील आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था संपूर्णता बदलून नवीन आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था प्रस्थापित केल्याशिवाय होऊ शकत नाही ही त्यांची पक्की धारणा होती. त्यासाठीच त्यांनी समाजवादी विचारधारांची कास धरली होती.  


लेनिन, त्रोत्स्की आणि इतर क्रांतिकारयांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संपूर्ण तारुण्य कम्युनिस्ट ध्येयपूर्तीसाठी घालवले. कामगारांच्या आणि विशेषतः स्त्रियांना प्रबोधन करून तयार करण्यासाठी त्यांनी  विविध अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिलीत. हद्दपारी, तुरुंगवास भोगले. लेनिनच्या सशस्त्र उठावाच्या संकल्पनेला अगदीच थोड्या क्रांतिकारकांचा पाठिंबा होता त्या काही मोजक्या क्रांतीकारकामध्ये कोलान्ताईंचा समावेश होता. लेणीच्या पाठीमागे त्या ठामपणे उभ्या होत्या. साम्राज्यवादी युध्दाच्या विरुद्ध असणाऱ्या कोलान्ताईना पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत पीस कॅम्पेन साठी विविध ठिकाणे  जनतेशी संवाद साधण्यासाठी बोलावण्यात आले होते. अशा प्रकारचा मान मिळणारे त्या पहिल्याच रशियन महिला. त्यांचा लढा हा कुठल्याही एका देशातील सत्ता परिवर्तनासाठी नसून जगभरातील साम्राज्यवादी, शोषणवादी भांडवलशाही व्यवस्थे विरुद्ध होता. 


युरोपातील मोठमोठ्या समाजवादी आणि साम्यवादी विचारवंत आणि क्रांतिकारकांशी त्यांचा कनिष्ठ संबंध व सहकार्य होतं. कोलान्ताई या रशियातील पहिल्या सोवियत फेमिनिस्ट होत्या. काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या या महिलेला स्त्रीच्या केवळ आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याची अपेक्षा नव्हती तर स्त्रियांच्या संपूर्ण लैंगिक  स्वातंत्र्यावर त्यांचा भर होता. लैंगिक क्रांती शिवाय स्त्रीमुक्ती शक्य नाही अशी धारणा असणाऱ्या कोलान्ताईनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिले- द ऑटोबायोग्राफी ऑफ सेक्शुअली इमानसिपेड कम्युनिस्ट वुमन. कोणत्याही राजकीय सत्तेचा व्यक्तीच्या व्यक्तिगत आणि लैंगिक बाबतीत कुठलाही हस्तक्षेप नसावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.


फ्री लव या संकल्पनांचे पुरस्कार करणाऱ्या त्यावेळेच्या काही मोजक्या विचारवंतांपैकी त्या एक होत्या. त्यांचे लग्नसंस्था, कुटुंबव्यवस्था इत्यादी बाबतचे विचार त्या काळच्या सोवियेत सत्तेला देखील झेपणारे नव्हते. महिलांचे सर्वांगीण सबलीकरण करण्यासाठी सामाजिक कल्याण खात्याच्या कमीसार बनल्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत एका वेगळ्या महिला कक्षाची स्थापना केली. या कक्षा अंतर्गत राबवलेल्या योजना या संपुर्ण युरोपातील एक वेगळाच प्रयोग होता. त्यांच्याच प्रयत्नांमुळे सोवियत युनियन हे जगातील पहिले राष्ट्र बनले जिथे गर्भपाताला कायदेशीर मान्यता देण्यात आली. सरकारी दवाखान्यात मोफत गर्भपात करण्यासाठीचा लढा स्त्रियांनी कोलान्ताईंच्या नेतृत्वाखाली जिंकला. कोलान्ताईंचा लढाऊ बाणा होता. 


१९१८ ला जेव्हा  बोल्शेविकांनी सेंट्रल पॉवर्सस (जर्मनी आणि इतर राष्ट्र) सोबत मानहानीकारक युद्ध तह केला त्याचा निषेध म्हणून त्यांनी राजीनामा देऊन सरकार मधून बाहेर पडल्या. पुढे १९२१ ला ज्यावेळी कम्युनिस्ट पक्षात बथ्थड नोकरशाहीचे प्राबल्य वाढत  जाऊन प्रत्यक्ष ज्यांच्यासाठी व ज्यांच्या नावाने राज्यसत्ता स्थापन झाली त्या कामगार वर्गालाच  स्वतःच्या मूलभूत स्वातंत्र्याना मुकावे लागले त्यावेळी त्यांनी या नोकरशाही ला विरोध करत कामगार वर्गाची बाजू घेतली. परिणामत: त्यांना पक्षात दुय्यम स्थानावर जावे लागले. रशियन, जर्मन, फिनिश, फ्रेंच इंग्रजी अशा पाच भाषेत पारंगत असणाऱ्या या पंडितेने कम्युनिजमवर मूलभूत स्वरूपाची पुस्तके लिहून मार्क्सवादाच्या सैद्धांतिक मांडणीत मोलाची भर घातली. अशा प्रकारची मांडणी करणाऱ्या त्या रशियातील पहिल्या महिला लेखिका ठरल्या. 


ज्या काळात अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यावेळी कोलान्ताई या नॉर्वेत सोवियत युनियनच्या राजदूत होत्या. अखंड युरोपातील पहिली महिला राजदूत. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर १९५२ ला वयाच्या ७९ वर्षी त्यांचा मृत्यू झाला. १९६०-७० च्या दशकामध्ये जेव्हा फेमिनिझमची चळवळ सर्व युरोप मध्ये जोर धरु लागली त्यावेळी, कोलान्ताईंच्या कार्याकडे आणि लेखनाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले. रशियाच्या या पोलादी मनगटाच्या मुक्त स्त्रीला तिच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधुन सलाम.


- इर्शाद बोरकर, संशोधक विद्यार्थी

इंग्रजी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ

1 टिप्पणी: