Breakingविशेष लेख : कायद्याच्या आधारे घरे पाडण्याचा आम्ही निषेध करतो - धनाजी येळकर पाटील


शेतीबाडी, सोनेनाने विकून, आयुष्य भराची संपूर्ण कमाई घालून शहरात राहण्यासाठी स्वतःचं हक्काचं घर असावं, या भावनेने प्रत्येकाने आपल्या स्वप्नातील घरं उभारली. परंतु सर्वसामान्यांची घरे कायद्याकडे बोट दाखवत अनियमित ठरवून वारंवार पाडण्यात आली. आज पण तेवढ्याच निर्दय पणाने सर्वसामान्यांची गोरगरिबांची घरे जमीनदोस्त केली जातात. 


जो कायदा नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने मोडला, सर्व बांधकामे याच अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली असताना सर्वसामान्यांना दोषी धरून बांधकामे अनियमित ठरवून त्यांचा निवारा उद्ध्वस्त करणं हे योग्य नाही. म्हणून आमची बांधकामे नियमित झाली पाहिजेत या मागणीसाठी ४० वर्षांपासून चालू असलेल्या लढ्यास पाठिंबा देत आंदोलनात, उपोषणात, मोर्चात सहभागी होणारे सर्वच पक्षाचे नेते सत्ता मिळताच हा सर्वसामान्यांचा प्रश्न जाणीवपूर्वक बाजूला ठेवतात. याचे कारण त्यांचा या सर्वसामान्यांच्या घरावर असलेला डोळा, याच सर्वसामान्यांच्या जमिनीवर असलेला डोळा हेच कारण आहे. फक्त प्राधिकरण प्रशासनाला पुढे करत प्रत्येक जण आपला स्वार्थ साधत आला आहे. परंतु परिस्थिती अगोदरच्या सारखी राहिली नाही. येथील तरुणांनाही राजकारण समजायला लागलं, खोटं बोलून राजकारण करणारे समजायला लागले, मतासाठी पाया पडणारे, भूलथापा देणारे, चांगले कोण, कोण वाईट, कोण हरामखोर, कोण चोर हे सर्व आता जनता बोलत जरी नसली तरी त्यांच्या लक्षात आले आहे.


फक्त विरोधात असताना विरोध करायचा? सत्ता द्या १०० दिवसात प्रश्न सोडवतो म्हणणारे, निवडून द्या हा प्रश्न सोडविणार म्हणत काहीजण नगरसेवकाचे खासदार झाले तर कोण आमदार झाले. प्रत्येक पाच वर्षाने याच सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे प्रत्येक लबाडाने, स्वार्थी राजकारण्यांनी राजकारण केले, घरे नियमित करण्याची वेळोवेळी खोटी आश्वासने दिली, खोटे बोलून फसवणूक केली, पिचलेल्या खचलेल्या सर्वसामान्य जनतेने परत परत अशा सर्वच घाणेरड्या आणि गलिच्छ राजकारण करणाऱ्या राजकारणावर विश्वास ठेवला. आता जनता अशा खोटारड्या नेत्यांना माफ करणार नाही. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, त्यात आमदारांना सभेतून हाकलून देणे, माजी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारणारी, सभेमध्ये खोटे बोलून दिशाभूल करणाऱ्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सभेत परखडपणे आमच्या घराचं काय झालं? आमची घरं कधी नियमित करणार? दिलेल्या आश्‍वासनांचं काय झालं? याचा जाब विचारणारी हीच सर्वसामान्य जनता आहे.

आता सत्ता शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी या तीन पक्षाची म्हणजेच महाविकास आघाडीची आहे, याही पक्षातील नेत्यांनी आश्वासने दिली होती, आंदोलने केली होती, मोर्चे काढले होते, मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत चालत नेले होते. पण सत्ता येताच तेही मूग गिळून गप्प आहेत.


आता सत्ता तर तुमचीच आहे मग हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या हाताला लकवा मारला की हात कोण बांधलेत ? वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं याचा जवाब तुम्हाला येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा द्यावी लागणार आहेत. हीच जनता उद्या तुम्हाला सांगणार आहे जरा जनाची नाही तर मनाची लाज बाळगा.....


जय शिवराय..!


- धनाजी येळकर पाटील

- स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा