Breakingडहाणू ते नाशिक रेल्वे मार्ग सुरू करा - आमदार विनोद निकोले


पश्चिम रेल्वे महाप्रबंधक आलोक कंसल यांची घेतली भेट


मुंबई : डहाणू ते जव्हार ते नाशिक रेल्वे मार्ग सुरू करा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी पश्चिम रेल्वे महाप्रबंधक आलोक कंसल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. तसेच या मागण्यांबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना देखील ई-मेल द्वारे निवेदन पाठविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.


यावेळी आमदार निकोले म्हणाले की, डहाणू मधील आमचे आदिवासी बंधू-भगिनी नाशिक येथे एमआयडीसी असल्याने रोजगाराच्या निमित्ताने ये-जा करत असतात. रस्त्याने जाणे-येणे हे परवडणारे नसून खूप खर्चिक आहे. त्याअनुषंगाने नमूद मार्ग लवकरात लवकर तयार करावा. तसेच, मुंबईच्या दिशेने उदरनिर्वाह करण्यासाठी जात असतात. अशा स्थितीत डहाणू ते विरार व विरार ते डहाणू या रेल्वे मार्गावर दर अर्ध्या तासाला एक लोकल ट्रेन असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तसेच डहाणू ते विरार या प्रवासासाठी एकूण 09 स्थानकात 01 तास 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिकचा वेळ लागतो. त्याअनुषंगाने डहाणू ते विरार व विरार ते डहाणू लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात व हे अंतर कमी वेळात कसे पूर्ण होईल या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने प्रयत्न करावे. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे डहाणू मधील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांनुसार पूर्वी प्रमाणे स्थानिक रिक्षा चालकांना डहाणू रेल्वे स्थानक येथे उपलब्ध असलेल्या खुल्या जागेत रिक्षा लावण्याची परवानगी देणे, डहाणू रेल्वे स्थानकाजवळ सार्वजनिक शौचालय बांधणे, व डहाणू रेल्वे स्थानकामध्ये स्थानिक जनतेला मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.


यावर पश्चिम रेल्वे महाप्रबंधक आलोक कंसल म्हणाले की, आपल्या मागण्या या जनहितार्थ असून यावर सकारात्मक लेखी उत्तर आपणांस कळविले जाईल. पण, तूर्तास नक्कीच सांगतो की, पार्किंगचे देयकाबाबत दिलासादायक निर्णय घेऊ. यावेळी भारत सरकार रेल्वे मंत्रालय पश्चिम रेल्वे महाप्रबंधक यांचे सचिव सचिन शर्मा, डीवायएफआयचे डॉ. आदित्य अहिरे, माकप विधिमंडळ कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा