Breaking


हिंसाचाराचे बळी ठरलेलं 'हे' गाव ठरतंय आदर्श, अंगावर शहारे आणणारा इतिहास


श्रीनगर : काश्मिरमधील दर्दपोरा गावात हिंसाचारात 700 पैकी 327 महिलांना वैधव्य आलं. दहशतवादाचा मोठा त्रास गावाला सोसावा लागला. परंतु आता तरुण शिकले, शिक्षण, डॉक्टर, इंजिनिअर पदापर्यंत मजल मारली.


श्रीनगरपासून १२० किमी दाट जंगल व पर्वतांजवळ ७०० उंबऱ्यांचे दर्दपोरा गाव आहे. ते एलओसीपासून ५ किमीवर आहे. १९९० ते २००३ दरम्यान दहशतवादामुळे या गावाने आपल्या नावाप्रमाणेच खूप त्रास सोसला. मात्र, २००३ नंतर गेल्या १७ वर्षांत येथे शांतता आहे. आता गावातून अतिरेकी नव्हे डॉक्टर, इंजिनिअर व शिक्षकांची पिढी घडत आहे.


गावातील निम्म्या म्हणजे ३२७ कुटुंबांतील महिलांना दहशतवादामुळे वैधव्य आले. मात्र गेल्या दशकभरात गावातील एकाही मुलाने दहशतवादाचा मार्ग पत्करला नाही. आज परिसरात ५ - ६ शाळा आहेत. साक्षरता दर ७०% वर आहे. येथील तरुणाई काश्मीरबाहेरही व्यवसाय करत आहेत. मुले डॉक्टर, इंजिनिअर, लेक्चरर बनली आहेत. शिक्षक शब्बीर अहमद म्हणाले, ‘गावातील प्रत्येक मूल शिकत आहे. मात्र लोक नवी सुरुवात करू इच्छित आहेत. काही तरुण उच्च शिक्षणासाठी परदेशातही गेले आहेत.’ ३० वर्षीय सुहैल अहमदच्या वडिलांची दोन दशकांपूर्वी अतिरेक्यांनी हत्या केली होती. तो आता प्राध्यापक आहे. तो म्हणाला, ‘अनंत अडचणी असूनही मी शिकून प्राध्यापक बनलो.’ शांतता व भरभराटीच्या मार्गावर परतणे गावासाठी सोपे नव्हते. 


६५ वर्षांच्या शाहमल्ला बानो रोज घराबाहेर बसून मुलाची वाट पाहतात. सप्टेंबर २००२ मध्ये त्यांचे पती अब्दुल्ला बट यांची बंदूकधाऱ्यांनी हत्या केली होती. ५ मुले व २ मुलींच्या आई बानो म्हणाल्या, ‘पतीच्या मृत्यूच्या वर्षभरातच १७ वर्षांचा मुलगा मुश्ताक कमावण्यासाठी पंजाबला गेला. तो आजवर परतलेला नाही.’ येथे दहशतवादाचे थैमान सुरू असताना लष्कराचा खबरी असल्याच्या संशयावरून लोकांची हत्या केली जायची. येथील सुमारे ६०० मुले काश्मिरातील विविध अनाथालयांत राहत आहेत. 


दर्दपोराला ‘विधवांचे गाव’ असेही म्हटले जायचे. लोक म्हणाले, गावातील अनेक तरुण बंदुका उचलून पाकिस्तानात प्रशिक्षण घ्यायचे. नंतर सुरक्षा दलांसोबत चकमकीत मारले जायचे. गावात दररोज दफनविधी व्हायचे. आता चित्र खूप बदलले आहे.’


माता मुलांना शिकवत आहेत, अनेक जण उच्च शिक्षणासाठी परदेशात आहेत. ६० वर्षीय जाना बेगम यांनी १९९३ मध्ये पतीला गमावले. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा पाचवीत होता, मुलगी आठ महिन्यांची होती. त्या म्हणाल्या, भावाच्या मदतीने मुलांना शिकवले. मुलाला सरकारी नाेकरीही मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा