Breakingआंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील गावातून मुख्यमंत्र्यांना हजारो पत्रे


हिरडा या औषधी फळांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पण अद्यापही नुकसान भरपाई नाही.


आंबेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील गावातून हजारो पत्रे मुख्यमंत्र्यांंना पाठविण्यात आली. हिरडा या औषधी फळांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पण अद्यापही नुकसान भरपाई नाही, ही नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी ही पत्रे पाठविण्यात आली आहेत.


निसर्ग चक्रीवादळात मे-जून 2020, या काळात आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न असणारे हिरडा या औषधी फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून, हे पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर केले होते. परंतु 10 महिने होऊनही अद्याप नुकसान भरपाई आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मिळाली नाही.


याबाबत किसान सभेने सातत्याने पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली नाही. किसान सभेच्या माध्यमातून तालुका व जिल्हा स्तरावर या विषयावर मोठे आंदोलन आयोजित करण्याचे पूर्वनियोजित केले होते. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन तूर्तास स्थगित करून घर तेथून पत्र हे अभियान राबविण्याचे ठरले होते, असे अखिल भारतीय किसान सभेचे अशोक पेकारी म्हणाले.


त्यानुसार आज (दि. 23 मार्च) रोजी शहीद दिनाच्या निमित्ताने, शेतकऱ्यांनी आपली ही मागणी, पत्राच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचवली आहे.


आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे 20 पेक्षा अधिक गावातून हजारो शेतकरी बांधवांनी आपली मागणी पोस्टकार्डवर लिहून पोस्टाच्या माध्यमातून ही पत्रे रवाना केली आहेत. या पत्र अभियानाचे समनव्य आंबेगाव तालुका किसान सभा समितीचे कृष्णा वडेकर, राजू घोडे, अशोक पेकारी, अशोक जोशी, सुभाष भोकटे, रोहिदास गभाले यांनी केले.


प्रमुख मागण्या : 


1. हिरडा नुकसानीचे पंचनामे ज्या-ज्या शेतकरी कुटुंबाचे झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी.


2. हिरड्यांच्या झाडांची नोंद शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर करावी.


3. आदिवासी विकास महामंडळाने हिरडा खरेदी केंद्र सुरू करावीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा