Breakingभांडवलशाहीतील परंपरागत संबंध मोडीत निघाले असून श्रमिकांचे डिजिटल नाके तयार होत आहेत - कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर

 


आकुर्डी : भांडवलशाहीतील परंपरागत संबंध मोडीत निघाले असून श्रमिकांचे डिजिटल नाके तयार होत आहेत, असे प्रतिपादन कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी केले.

 

आकुर्डी येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन कॉम्रेड अजित अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी. ते विद्यमान औद्योगिक संबंध आणि असुरक्षित श्रमिक या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हा अध्यक्ष वसंत पवार होते.


अभ्यंकर ते म्हणाले की, दोन दशकापूर्वीच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये पूर्णतः बदल झाले असून पूर्वीचे कामगार मालक असलेले माणूसकीचे किमान कल्याणकारी संबंध संपुष्टात आलेले आहेत. कार्पोरेट भांडवलशाहीला तात्पुरत्या मुदतीचे श्रम कौशल्य हवे आहे. श्रमिकांचे डिजिटल नाके तयार होत आहेत, अशी आजची परिस्थिती आहे. असंघटित तरुण कंत्राटी कामगार मोठ्या उद्योगात आहेत. त्यांच्या शेकडो समस्या प्रलंबित आहेत, सरकारने कायद्याचे राज्य संपवले आहे, अशी टीका अभ्यंकर यांनी केली आहे.


पुढे बोलताना ते म्हणाले की, वित्त भांडवल आणि गुंतवणुकीला नफ्याची प्रेरणा आहे. नव्या श्रमिकांच्या पिढ्या संवेदना शून्य समाज निर्माण करत अहेत. सभ्य संस्कृती निर्माण करणारी पिढी लुप्त होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेअर निर्देशांक 50 हजाराच्या पुढे आहे आणि जीडीपी उणे 22 आहे. अशा विचित्र अवस्थेत देश आहे. येणाऱ्या काळात आर्थिक अराजक निर्माण होऊ शकते. सरकारे बदलतील, संघटित कामगार वर्ग संपुष्टात आल्यामुळे श्रमिकांच्या वेतन मूल्याची लढाई विस्कळित झाली आहे. असुरक्षित समाजामुळे सभ्य संस्कृती इतिहास जमा होईल. कामगारांचे सेवा पुरवठा वर्गात रूपांतर झाले आहे आणि अर्थव्यवस्थेचे ओला उबारायझेशन होत आहे असेही ते म्हणाले.

 

देशातील सर्व श्रमिक एकाच आर्थिक स्तरावर आलेले आहेत. ते कशाप्रकारचे जीवन जगत आहेत, त्यांचा आर्थिक स्तर वाढला पाहिजे, अशी कार्पोरेटची आणि सरकारची इच्छा नाही. बांधकाम कामगार, असंघटित यांच्यासाठी महामंडळे स्थापन केली जात आहेत. श्रमिकांच्या सामाजिक उत्कर्षाच्या योजनाची घोषणा सरकारे करतात, मात्र अंमलबजावणीची यंत्रणा नाही. बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे 13 हजार कोटी रुपये पडून आहेत. मात्र त्यांची नोंदणी करण्यासाठी कामगार, समाज कल्याण मंत्रालयाने प्रशासकीय व्यवस्था निर्माण केलेली नाही.

 

45 कोटी हुन जास्त कामगार वंचित आहेत. सरकारच्या योजना आणि नव्या स्वरूपाच्या योजना राबविण्यासाठी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी विशेष केंद्रे उभारावीत असे अभ्यंकर यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश दराडे यांनी केले. यावेळी अँड. नाथा शिंगाडे, जयप्रकाश, तुकाराम साळवी, अपर्णा दराडे, सचिन देसाई, सतीश नायर, अमिन शेख, स्वप्निल जेवळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा