Breakingवडवणी : कुंडलिका प्रकल्पाच्या पाण्यापासून बाहेगव्हाणचे पंचवीस शेतकरी वंचित२५ शेतकऱ्यांची ५० एकर जमीन ओलिताखाली यावी म्हणून जिल्हाधिका-यांना घातले साकडे


वडवणी : तालुक्यातील सोन्ना खोट्टा येथील अप्पर कुंडलिका प्रकल्पातील डाव्या कालव्यातील बंद पाईपलाईन द्वारे बाहेगव्हाणच्या काही शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अद्यापही पाणी मिळत नाही. प्रकल्पाच्या अधिकारी व इंजिनियर यांनी मिळुन व कोणाच्या तरी सांगण्यावरून बाहेगव्हाण येथील २५ शेतक-यांच्या ५० एकर शेतीला पाणी मिळु नये असा डाव आखला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात येथील २५ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे.


बाहेगव्हाण शिवारात जमीन पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे ओलीताखाली येत नाही. गट क्रमांक ३६५, ३६७, ३३३, ५३, ३६२, ३५०, ३४०, ३४८, ३६८ मधील ४० ते ५० एकर जमीन धरणाच्या जवळच आहे. यातील गट क्रमांक ३६५ मधून ही बंद पाईपलाईन गेलेली आहे. तरीही शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध होत नाही. वारंवार विनंती अर्ज व मागणी करूनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतक-यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. देशाचे नेते व बीडचे भुमिपुत्र केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतुन माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सोन्या खोट्टा येथील अत्यंत महत्वाकांक्षी उर्ध्व कुंडलिका प्रकल्प हा वडवणी तालुक्याचे नंदनवन करणारा प्रकल्प आहे. मात्र तो आमच्यासाठी जीवघेणा ठरला आहे. शेजारील गटातील जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या चुकीने आमची जमीन ओलीताखाली येत नाही. 


सोन्नाखोट्टा येथील धरणाच्या पाण्याचे आम्ही सगळ्यांनी स्वप्न बघितले होते. मात्र अधिकारी व इंजिनियर यांनी मिळुन आम्हाला हक्काच्या पाण्यापासुन विचित ठेवले आहे. डोळ्यादेखत पाणी दुस-याच्या शेतात जाते तेंव्हा पोटात आग होते. ‘पाणी उशाला आहे मात्र घशात येईना’ अशी आमची अवस्था झाली आहे. इंजिनियरला विचारले तर ते म्हणतात की तुमचा भाग कमांड मध्ये नाही. त्यामुळे पाणी देता येणार नाही. म्हणुन जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मिळाले यासाठी प्रयत्न करावे अन्यथा आमरण उपोषणानंतर आम्हाला आत्मदहनच करावे लागेल.


- चक्रधर नागवे, शेतकरी वडवणी


प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन करतांना तालुक्यातील बाहेगव्हाण, चिंचोटी, साळींबा, तिगाव, पुसरा यासह इतर गावातील फक्त २८०० हेक्टर जमीनीलाच पाणी देता येईल असे केलेले आहे. तो भाग कमांड मध्ये नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याच्या जमीनी या रेल्वेच्या भु-संपादनात गेलेल्या आहेत. म्हणुन त्यांना पाण्याचा लाभ देता येईल. तशा पद्धतीचा प्रस्ताव तयार केला असुन शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे.

- सुनिल आपसिंगेकर, अभियंता पाटबंधारे विभाग बीड


जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीची दखल घेऊन कुंडलिका प्रकल्पातून आलेल्या बंद पाईपलाईनचे पाणी येथील २२ शेतकऱ्यांच्या ४० ते ५० एकर जमीनीला मिळावे जेणेकरून सदरील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तसेच मायनर डी.वाय.थ्री. १ या पाईपलाईनला अद्यापही पाणी आलेले नाही. तरी हे मायनर लवकर सुरू करून संबंधीत शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. सध्या येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस, उन्हाळी बाजरी, भुईमुग, इत्यादी पिकाची लागवड केली आहे. पाणी न मिळाल्यास लागवड केलेली पिके जळून जातील व मोठा आर्थिक फटका बसेल. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे. दहा दिवसात पाणी उपलब्ध न दिल्यास आपल्या कार्यालयासमोर सर्व शेतकरी समोर उपोषण करणार आहेत. असे जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 


या निवेदनावर सुदाम धोंडीबा मस्के, शिवाजी धोंडीबा मस्के, भगवान धोंडीबा मस्के, सतीश लक्ष्मण वाघमारे, भागवत गंगाधर मस्के, बबन काशिनाथ नागवे, दगडु वैजुबा नागवे, गुलाब हरिभाऊ मस्के, अशोक सुदाम मस्के, संभाजी सुदाम मस्के, मनोहर शिवाजी मस्के, अंकुश शिवाजी मस्के, गोविंद भगवान मस्के, वैभव भगवान मस्के, गुलाब हरिबा मस्के, मुक्ताबाई सर्जेराव मस्के, दत्ता लक्ष्मण अलगट, खंडू यशवंत नागवे, मथलसाबाई खंडू नागवे, चक्रधर खंडू नागवे, सर्जेराव हरिभाऊ मस्के, रामदास रावसाहेब मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा