Breaking


महिला दिन विशेष : जेव्हा रोजगार हमी योजनेच्या अमंलबजावणीसाठी एक महिला उपसरपंच पुढे येतात...वाचा सविस्तरशेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माधुरीताई गावातील महिल्यांच्या व्यथा पाहून दु:खी व्हायच्या. गावातील महिलांना रोजगारासाठी सकाळी आठ वाजता १५ ते १६ किलोमीटर अंतरावर गावामध्ये मजुरीसाठी जावे लागायचे. हे पाहून उपसरपंच माधुरीताई कोरडे यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून गावामध्ये रोजगार हमी योजनेच्या अमंलबजावणीसाठी पुढाकार घेतला. 


याकामी त्यांना त्याचे दीर किसान सभेचे कार्यकर्ते सुनिल कोरडे, विश्वनाथ निगळे, लक्ष्मण जोशी, गणपत घोडे, अमोल वाघमारे यांचे सहकार्य लाभले. रोजगार हमीचे काम करताना पहिल्यांदा १० - १२ लोक कामावर आले, मग स्वतः माधुरीताई रोजगार हमीच्या कामावर काम करु लागल्या. लोकांना रोजगार हमीच्या कामावर येण्यासाठी सांगू लागल्या. लोकांचा प्रतिसाद वाढत होता. त्यावेळी मजूरी वेळेवर जमा झाला, हे बघून गावातील आणखी सात लोकांनी कामावर यायला सुरुवात केली. आता माणसे वाढली आणि काम कमी म्हणून पुन्हा १६०० खड्डे आणि सोबत झाडे लावण्याचे काम मंजूर केले व ते काम सर्वांना दोन आठवडे गेले. त्यातच झाडे लावून सुद्धा काम संपले. काही दिवसांनी गावाची पाहणी करून कोणकोणती कामे रोजगार हमीतून करता येतील याचा आराखडा तयार करून अशी दहा कामे मंजुरीसाठी पंचायत समितीकडे पाठवली. परंतु अद्यापही ती कामे चालू झाली नाही त्यामुळे लोकांना पुन्हा बेरोजगार व्हावे लागले, असल्याचे माधुरीताई यांनी सांगितले. 


मग लावलेल्या ३००० झाडांच्या संगोपनासाठी बिहार पँटर्न राबविला गेला. आता १६ मजूर ३ वर्षासाठी झाडांचे संगोपन करणार आहेत. त्यांंना झाडांची देखभाल करण्यासाठी दररोज पाणी घालणे, कुंपण करणे, अशा प्रकारची कामे करावी लागणार आहेत.


त्यासाठी त्यांना प्रतिदिन २३८ रुपये मजूर मिळणार आहे. सगळ्यात जास्त दिवस रोजगार हमी योजनेवर काम करणारे कोंडीभाऊ बांबळे ही याच गावतले. आतापर्यंत सुमारे 8 लाख रुपये मजूरी मजूरांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.


गावातील मजूरांना १५ - २० किलोमीटर अंतरावर रोजगारासाठी जावे लागत होते.  माधुरीताई सुध्दा कामावर जात असत. त्यावेळी मुली - महिलांना किती त्रास सहन करावा लागत असतो, हे मी डोळ्याने पाहिले असल्याचे त्या सांगतात.परंतु काही प्रमाणात गावातच रोजगार मिळवून देऊ शकलो असल्याचे माधुरीताई म्हणाल्या.


माधुरीताई सरपंच होण्याचे उराशी बाळगून होत्या. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्या उपसरपंच झाल्या. माधुरीताईंंचे डी.एड झाले आणि त्याच वर्षी लग्न झाले. पती सतिश कोरडे प्राथमिक शिक्षक असून ते सध्या पुणे येथे कार्यरत आहेत. सामाजिक, राजकीय जाणिवा असलेले सासरचे कुटुंब. दीर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते. घरामध्ये लोकशाहीचं वातावरण. प्रत्येकाचे मत विचारात घेणे, प्रत्येकाचा आदर करणे. त्यातच सुरुवातीपासूनच शिक्षणासाठी गावाबाहेर पडलेल्या माधुरीताईंंना शहरात आल्यानंतर तिथले वातावरण आणि ग्रामीण भागातील वातावरण बघून मला मनामध्ये वाटायचे कि, आपले सुद्धा गाव असे झाली पाहिजे.


माधुरीताईंंच्या मनात खूप स्वप्न होतीच, पण आपल्या आदिवासी भागात काम करताना अनेक अशा अडचणी येतात. त्यातल्या त्यात स्री म्हटल्यावर तर अनेक जबाबदाऱ्या बायको, सून, आई व आता गावची उपसरपंच. समाजासाठी काहीतरी करण्याची आवड होतीच. मग सुरुवातीलाच बचत गटाविषयी चौकशी केली, माहिती गोळा केली व वाड्या-वस्त्यांवर रात्री आठ वाजता जाऊन तेथील महिलांना बचत गटाविषयी माहिती सांगितली. सुरुवातीला चार बचत गट तयार केले व पंचायत समितीला जोडले. त्यावेळी पंचायत समितीचे बी.डी.ओ. गाढवे होते. त्यांनी संपूर्ण जुन्नर तालुका हागणदारीमुक्त करण्याची जणू शपथच घेतली होती. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीत रात्री ८ वाजता येऊन सभा घेतल्याचे माधुरीताई सांगतात. 


दिवसा लोक आपापल्या कामावर, गुरे, शेतमजुरीवर जायचे. म्हणून त्यावेळी त्यांनी गावातील महिलांसाठी रोजगाराची मागणी केली आणि त्यांनी गावात आठ दिवसाचे दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण लावले. त्या आठ दिवसात महिलांनी प्रथमच एकत्र येऊन दुग्ध व्यवसायाची माहिती घेतली. विविध कार्यक्रम खेळ, गाणी म्हटली. खूप उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. ज्या महिला फक्त संसार, मुलं यात जगत होत्या त्यांनी या वेळेस भाग घेत वेगळे अनुभव अनुभवले. 


माधुरीताई म्हणतात की, महिला सांगत होत्या, ‘लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या गावात झाला आणि आम्ही पुन्हा बालपण अनुभवले.’  माधुरीताई म्हणतात, अजूनही मला असे वाटते की, आदिवासी गावातील महिलांची अवस्था दावणीला बांधलेल्या गायी सारखीच आहे. त्यांचा जन्म जणू अडचणीसाठी झाला आहे असे वाटते. एकीकडे शहरात घरांमध्ये धुणी-भांडी, फरशीसाठी बाई ठेवली जाते व शरीराची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जिम लावली जाते. तर दुसरीकडे मोलमजुरी करुन पोट भरले जाते. तसेच समाजाच्या रूढी परंपरा मान - अपमान यामध्ये तिचे अस्तित्व नाहीसे होऊन जाते. ती कधीच स्वतःचा एक माणूस म्हणून विचार करत नाही.


माधुरीताई सांगतात, माझ्या आयुष्यात मात्र एक चांगले झाले. मला माझ्या सासरकडचे माणसे खूप चांगली मिळाली. सासरे, सासू, नवरा, नंदा सर्वजण मला खूप सहकार्य करतात, मदत करतात. त्यामुळे मला हे शक्य झाले. त्याच्यामुळे सामाजिक आणि राजकीय कामात पुढे जाऊ शकले.


महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या अमंलबजावणीच्या कामाबद्दल केंद्र सरकारकडून तीन पुरस्कार प्राप्त झाले. या पुरस्कार मिळण्यामध्ये पुणे जिल्ह्याचा खारीचा वाटा राहिला. अखिल भारतीय किसान सभा आणि पुणे जिल्हा परिषदेच्या समन्वय आणि सहकार्याच्या भूमिकेमुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तीन तालुक्यात रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी झाली. या पुरस्कारामध्ये चावंड गावाही तितकाच खारीचा वाटा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा