Breaking

विशेष लेख : बास झाले जुलूम आता, थांबवा हा कोंडमारा...! - ऋतुजा गायकवाड


गेल्यावर्षी उन्हाळ्यात चीनचा पाहुणा फिरायला निघाला. बघता बघता तो जसा इतर देशात गेला तसाच आपल्या भारत देशातही येऊन पोहोचला. वैज्ञानिकांनी फार विचारपूर्वक त्या पाहुण्याचे साधे, सोप्पे  "कोरोना" असे नाव ठेवले अतिथी देवो भव: ! असे म्हणत त्याचे स्वागत करण्यापेक्षा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जो तो व्यक्ती " गो कोरोना, कोरोना गो" असचं म्हणू लागला, नारे देऊ लागला. मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं या गाण्याच्या ओळींप्रमाणेच डोळ्यांनाही न दिसणाऱ्या विषाणूची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. एवढ्याशा सुक्ष्म  जिवाने बघता बघता अख्या जगाला मुठीत घेतलं. लॉकडाऊन करायला भाग पाडलं. हात धुवा, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा गेल्या वर्षभरापासून प्रत्येकाला या नियमांच्या बंधनात जखडून ठेवलं प्रत्येकाच्या जीवनाची हीच चित्रकथा बनवून टाकली. हा विदेशी पाहुणा अगदी नको नको वाटू लागला.


डोळ्यांनाही न दिसणाऱ्या विषाणूमुळे १२७ कोटी ४२ लाख ३९ हजार ७६९ एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला भारत देशही गेल्यावर्षी लॉकडाऊन झाला. भारताची १,०८९,९४ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली. प्रत्येकाला आपापल्या आरोग्याची काळजी वाटू लागली. मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले. कोरोनाने माणसाला चार भिंतीत बंद केले, देऊळांनाही कुलूपात बंद केले. फुलपाखरांसारखं इकडून तिकडून बागडणाऱ्या लहान मुलांना शाळेतून घरी बसवलं. पुस्तकांना बाजूला करून संगणक, इंटरनेट, मोबाईल यावर अभ्यास करायला भाग पाडलं. कसलीही परीक्षा न देता धडाधड पुढच्या वर्गात ढकलले. वर्षभरात कोरोनाने अख्या जगात थैमान घातले आक्राळविक्राळ रूप धारण करून सर्वत्र हाहाकार माजवला.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतून माणूस सावरायच्या आतचं कोरोनाची दुसरी लाट येऊन ठेपली.२०२१ हे वर्षतरी २०२० पेक्षा बरे जावे, अशी आशा मनात तरळत होती. परंतु, या ही वर्षी तेच झालं गेल्यावर्षी या कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. मुंबई, पुण्याचा आत्मा असलेल्या मजूर, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेला बेरोजगार केले. जीव धोक्यात घालून आपापल्या गावची वाट धरायला भाग पाडलं. औरंगाबाद, मध्यप्रदेशातील गुणा व उत्तर प्रदेशमधील औरय्या येथील अपघातात कित्तेक मजुरांचे बळी गेले "रोगापेक्षा इलाज भयंकर" अशीच काहीशी स्थिती भारतात झाली. भूकबळी, अपघात व उपचार न मिळाल्यानेही लोकांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या टिव्हीवर झळकत आहेत. ह्या चीनी कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, पोलिस, सफाई कामगार कोरोणाच्या सावटाखाली वावरत आहेत, कोरोनाशी दिवसरात्र झगडत आहेत.

या कोरोनाला संपवायला सामान्य नागरिकही "मीच माझा रक्षक" म्हणून जीव मुठीत घेवून जगतोय. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग सगळं सगळंकाही पाळतोय, सरकारी आदेशांचं, अटीनियमांच पालन करतोय. स्वतःची व त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबाची काटेकोरपणे काळजी घेतोय. एवढी काळजी घेतल्यावर आपल्याजवळ कश्याला फिरतोय कोरोना...? असं वाटतं. परंतु, एवढं सगळं करूनही कोरोनाचा विषाणू एखादा बेसावध क्षण गाठून माणसाजवळ येतोय. धडधाकट माणसाला कोरोना पाॅझिटीव्ह बनवतोय. एखाद्या कुटूंबातील एखादी व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्यावर जोपर्यंत ती व्यक्ती सुखरूप घरी येत नाही तोवर त्या व्यक्तीच्या अख्या कुटुंबाला वाईट, चिंताजनक, त्रासदायक अश्या अग्निदिव्यातून जावे लागत आहे.लस, ऑक्सिजन, बेड, ट्रिटमेंटचा खर्च याकरिता धावपळ करावी लागत आहे.

या कोरोनाच्या काळात माणूसच माणसाला मदतीचा हात देतोय. काही माणसे, काही संघटनाही माणसांना कोरोनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी झटत आहेत. रक्तदान शिबिर, प्लाझ्मादान, अन्नधान्य वाटप करून माणुसकी जपत आहेत. तर दुसऱ्या बाजूला  माणुसकीला काळीमा फासणाऱ्या महाभयंकर घटना घडत आहेत ज्या अतिशय विदारक अन् हृदय हेलावून टाकणारऱ्या आहेत. त्यातच लसींचा काळाबाजार, चुकीचे रिपोर्ट, कोरोनाबाबत असलेली अज्ञानता, खाजगी दवाखान्यांचा न परवडणारा खर्च इ. प्रश्न अधिकच चिंतेत भर घालत आहेत. कोरोना अफवा आहे, कोरोना मेडिकल रॅकेट आहे, लस घेतल्यावर कोरोना होतो. लस घेऊ नका अश्याप्रकरचे बिनबुडाचे संदेश लोकांच्या मनात शंका कुशंका उपस्थित करत आहेत. संभ्रम निर्माण करत आहेत व त्यामुळे सर्वसामान्य लोकं निष्काळजीपणे वागत आहेत सर्दी, खोकला, ताप लक्षण दिसल्यावर दवाखान्यात न जाता परस्पर गोळ्या औषधे घेत आहेत काहीजण तर औषधांऐवजी मांत्रिक, बाबाबुवा यांच्याकडे धाव घेत आहेत. आणि हाच बेजबाबदारपणा, गाफिलपणा माणसांच्या जीवावर बेतत आहे.
  
एवढ्या विषाणूमुळे कित्येकांची स्वप्ने विस्कटली, नोकरी गेली, गोरगरिबांच्या पोटापाण्यावर गदा आली, कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली, आयुष्यातली प्रिय माणसे हिरावून नेली. इतका मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला की, शवांना जाळायला स्मशानात लाकडे आणि जागाही उरली नाही. कसला विधी नाही, पै पाहूणे नातेवाईक नाही, का कुठले चार खांदे नाही. मृतदेहांवर कफन नाही तर... प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग करून जाळण्यासाठी शवांची रांगच्या रांग लागली. एकावेळी अनेक मृतदेह जाळावे लागत आहेत. कुठे बेडची कमतरता, तर कुठे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार सर्वोतोपरी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. परंतु, या कोरोनाच्या काळातही "जनता घरात आणि राजकारण जोरात" चालू आहे. श्रेयवादावरुन, ध्येय धोरणांवरुन अनेक नेत्यांच्या तोफा धडाडत आहेत. वरून कीर्तन, आतून तमाशा अशी गत झाली आहे. कोरोना संपेल न संपेल पण राजकारणाला अंत नाही.

कोरोनाच्या काळात घरी राहून राहून घर अगदी तुरुंग वाटू लागलं आहे. अंधार फार झाला दिवा पाहिजे असे वाटत असेल तर काटेकोरपणे आरोग्याची काळजी ही घ्यावीच लागेल. कारण आता...कोरोना हा विनोदाचा विषय राहिला नसून गांभीर्याचा विषय बनला आहे. जो तो माणूस या चीनी पाहुण्याला कंटाळून गेला आहे. कधी हा कोरोना नाहीसा होऊन मोकळा श्वास घेता येईल, आपण सर्व पहिल्यासारखे सुखासमाधानाने कधी राहू याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय "बास झाले जुलूम आता, थांबवा हा कोंडमारा" प्रत्येकजण इथला प्रार्थना करतोय ती या तुरुंगवासातून बाहेर पडण्याची.

- ऋतुजा गायकवाड
  (लेखिका पुणेस्थित असून विद्यार्थी आहेत.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा