Breakingकन्याकुमारी येथे हजारों शेतकरी व मच्छिमार यांची विशाल महापंचायत संपन्न


तमिळनाडू : कन्याकुमारी येथे २०,००० हून अधिक शेतकरी व मच्छिमारांची विशाल महापंचायत आज (२७ मार्च) रोजी पार पडली. भारताच्या दक्षिणतम टोकाला असलेल्या कन्याकुमारी येथे भारतीय महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचे मीलन होते. विवेकानंद स्मारक, महात्मा गांधी स्मारक आणि सुप्रसिद्ध तामिळ कवी थिरूवल्लुवार यांचा प्रचंड पुतळा कन्याकुमारीत आहे. 


भाजपच्या केंद्र सरकारने 'सागरमाला' प्रकल्पाअंतर्गत कन्याकुमारी येथे एक अजस्त्र पोर्ट प्रस्तावित केले आहे आणि ते गौतम अदानीला बांधण्यास देण्यात येणार आहे. त्यातून लाखो शेतकरी आणि मच्छिमारांचे जीवन उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ ही महापंचायत येथील संघर्ष समितीने आयोजित केली होती. चार महिने चाललेल्या ऐतिहासिक देशव्यापी किसान संघर्षालाही या सभेने संपूर्ण पाठिंबा दिला. 


या महापंचायतीला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, किसान संघर्ष समितीचे निमंत्रक कंवलप्रीत सिंग पंनू, नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे सरचिटणीस ओलेंसीओ सिमोस या प्रमुख पाहुण्यांनी संबोधित केले. 

महापंचायतीच्या अध्यक्षस्थानी निवृत्त सनदी अधिकारी एम. जी. देवसहायम हे होते. ८८ वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक कोडीकल शेख अब्दुल्ला, बिशप नझरीन सुसाई, समाजसुधारक बालप्रजातिपती आदिगलार, फ्रेंड्स ऑफ अर्थचे सुंदरराजन, किसान सभेचे तामिळनाडू राज्य सहसचिव तुलसी नारायण आणि गावातील तरुणांची भाषणे झाली. थॉमस फ्रँको यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. सर्व धर्मजातींचे वक्ते आणि श्रोते या महापंचायतीत एकत्र आले होते. 


सर्व वक्त्यांनी मोदी-शहा-अंबानी-अदानी या भ्रष्ट चौकडीवर आसूड ओढले. ते केवळ या प्रस्तावित पोर्टलाच जबाबदार नाहीत, तर तीन काळे कृषी कायदे, चार काळ्या श्रम संहिता आणि वीज विधेयक यांसही हीच अभद्र युती जबाबदार आहे. ६ एप्रिलला होणाऱ्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका आणि त्याच दिवशी होणारी कन्याकुमारीची लोकसभा पोटनिवडणूक यात भाजप व त्याच्या मित्रपक्षांचा धुव्वा उडवण्याचे आवाहन वक्त्यांनी केले.

प्रस्तावित अदानी पोर्ट ताबडतोब कायमचे रद्द करावे हा ठराव महापंचायतीतील उपस्थित लोकांनी हात उंचावून एकमताने पास केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा