Breaking

देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय


मुंबई : देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण करण्याच्या केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत करून आभार मानले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी आभार मानले आहेत.


देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीक कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतात. त्यामुळे बाधितांमध्ये या वयोगटातील रुग्णांची संख्या देखील जास्त असल्याने त्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण करावे, अशी मागणी सातत्याने केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्याने केलेल्या या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.


राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत असून युवा वर्गाने आता लसीकरणात सक्रीय सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून कोरोनाला रोखणे शक्य होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात लसीकरणाला गती देतानाच दररोज आठ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा