Breaking
आडम मास्तरांचा दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी कडून भारत ज्योती पुरस्काराने सन्मान


पुरोगामी विचारांचा व श्रमणाऱ्या  हातांचा गौरव - कॉ.आडम मास्तर


सोलापूर : माजी आमदार नरस्या आडम मास्तर यांना दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी कडून भारत ज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, दिल्ली ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी नामांकीत संस्था व संशोधन केंद्र आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी आर्थिक विकास, सामाजिक विकास, कला,क्रीडा,सांस्कृतिक विकास, साहित्य, संशोधन, राजकारण या विविधांगी क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व बहुमोल योगदान देणाऱ्या अभिनव प्रयोग व उपक्रमशील व्यक्तींचा भारत ज्योती पुरस्कार देऊन गौरव करतात. तर यंदा महाराष्ट्रांतुन आर्थिक विकास व राष्ट्रीय एकीकरणा साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी आमदार ज्येष्ठ नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना भारत ज्योती पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. आजपर्यंत हा पुरस्कार मदर तेरेसा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री कलाकार, साहित्यिक, क्रीडापटूशास्त्रज्ञ आदींना मिळाला. यंदा हा बहुमान सोलापूर च्या आडम मास्तरांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 9 एप्रिल रोजी दिल्ली येथील लोधा गार्डन सभागृहात पार पडला. 

यावेळी इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशीप सोसायटी च्या पदाधिकारी यांच्या  हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नगरसेविका कामिनी आडम, चिरंजीव डॉ.किरण आडम आदी उपस्थित होते.

कॉ.नरसय्या आडम मास्तर हे महाराष्ट्राच्या कामगार चळवळीतील अग्रगण्य नाव गेली पाच दशके अव्याहतपणे समाजातील विविध क्षेत्रात श्रमणाऱ्या हातांसाठी आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी अविश्रांत लढणारे नेते. यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रयत्नांना आणि कार्याला झळाळी देण्यासाठी तीन वेळा नगरसेवक व तीन वेळा आमदार बनवले. केवळ आमदार म्हणून नाहीतर एक सर्वहारा वर्गाचा प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह काबीज करत असत. पहाडी व बुलंद आवाजात पोटतिडकीने प्रश्न मांडताना सरकारला धारेवर धरत असत. म्हणून त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट विधानसभा पटू पुरस्कार देऊन तत्कालीन महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आला. हा मुलुख मैदानी तोफ आजही सत्ताधीशांसोबत सतत संघर्ष करून न्याय मिळवून देण्यासाठी वयाच्या शहात्तरीतही प्रचंड स्फूर्ती, ऊर्जा आणि जोमाने लढ्याच्या मैदानात तयारीत आहे. 

गेल्या पाच दशकात अनेक पुरस्कार, सम्मान कॉ.आडम मास्तरांना मिळाले. पण आज दिल्ली येथे झालेला सन्मान हा महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा, कामगार चळवळीचा, श्रमणाऱ्या हातांचा, विद्यार्थी, युवक, महिला, मध्यमवर्गीय सुशिक्षित सभ्य नागरिकांनी केलेल्या अखंडीत जन आंदोलनाचा सन्मान आहे. अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत हा भारत ज्योती पुरस्कार चळवळीला समर्पित केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा