Breaking
विशेष लेख : अजितदादांनी दादागिरी दाखवावी - जेष्ठ पत्रकार विजय भोसले


देशात भारतीय जनता पक्ष राजकीय कुटनितीचा वापर करून छोट्या पक्षांना बरोबर घेऊन सत्ता काबिज करायची. आणिं एकदा का शिरकाव झाला की त्या पक्षाचे पंख छाटून त्यांना निस्तेज करायचे. तोडफोडीचे राजकारण करित आपली सत्ता प्रस्थापित करायची. हे धोरण भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षांत जोरदार राबविले असून महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यात शिरकाव केलाच तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये आख्ये केंद्रीय मंत्रीमंडळ प्रचारासाठी गेले. आणि त्याठिकाणी नगण्य अवस्था असताना भाजपने बर्‍यापैकी नगरसेवक निवडून आणले.


पिंपरी- चिंचवड शहराचा अभ्यास करता राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्त्ता असताना शहराचा विकास मोठ्या झपाट्याने झाला. याचे श्रेय राष्ट्रवादीला जाते. मात्र, 2017 च्या महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अति आत्मविश्वासामुळे राष्ट्रवादीचे पानीपत झाले. हातून सत्ता गेली. याचे कारण आपण मोठी विकास कामे केली आहेत. त्यामुळे निवडणुकीत खर्च करणार नाही, जनता निवडून देईल, या अविर्भावात निवडणुकीत खर्च केला नाही. भारतीय जनता पक्षाने 25 लाख रुपयांच्या मूर्ती खरेदी प्रकरणावरून जे रान पेटविले, त्यामध्ये राष्ट्रवादी बदनाम झाली. राष्ट्रवादीच्या स्थानिक शिलेदारांनी भाजपला त्याचे चोख उत्तर द्यायला हवे होते. मात्र, हितसंबंधामुळे उत्त्तरे दिली नाहीत. आणि याचा देखील परिणाम महापालिका निवडणुकीत होऊन सत्ता घालवावी लागली. याला राष्ट्रवादीच जबाबदार आहे. अनेक राष्ट्रवादीचे शिलेदार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. त्याचा फटका बसलाच. मात्र, निवडणुकीत ज्या पध्दतीने अजितदादांनी लक्ष देण्याची आवश्यकता होती. त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले. आणि हातची सत्ता गेलीच. शिवाय गेल्या चार वर्षांत भाजपच्या महापालिकेच्या कारभाराचा अभ्यास करता गैरकारभाराने कळस गाठला असून राष्ट्रवादीच्या या मंडळींनी अप्रत्यक्ष भाजपला पाठिंबा देऊन आपले हात ओले करून घेतले. आत्ता वर्षभरावर महापालिकेच्या निवडणुका आल्यामुळे अजितदादा देखील आता खडबडून जागे झाले आहेत. चार वर्ष गप्प बसलेले दादा आता पक्षातील शिलेदारांना झापू लागले आहेत. किमान दादांना कळून चुकले आपलेच नाणे खोटे आहे. तर दुसर्‍यांना बोलून काय फायदा? नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत अजितदादांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तुम्ही काय-काय धंद्दे करता याची पुर्ण माहिती मला आहे. त्यामुळे यापुढे जर भाजपचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणला नाही तर माझ्याशी गाठ आहे, असा सज्जड दम देऊन राष्ट्रवादीला संजिवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या शिलेदारांनी प्रामाणिकपणाने किल्ला लढविला नाही तर जे चार बुरूज अजून मजबुत आहेत. ते बुरूज ढासळायला वेळ लागणार नाही. कारण, दादा आत्ता खर्‍या अर्थाने तुम्हाला तुमची दादागिरी दाखविण्याची वेळ आली आहे. यासाठी येणारा भविष्यकाळ सोबतच्या पक्षांबरोबर विश्वासघात करणे देखील महागात पडेल.

राज्यात राजकीय नाट्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात येईल, अशी कोणत्याही भविष्यकाराला माहित नव्हते. मात्र, राजकारणात कधी काय घडेल, याची शाश्वती देता येत नाही. त्याचा अनुभव महाराष्ट्राच्या राजकारणात आला. ज्या शिवसेनेबरोबर काँग्रेस सत्तेत जाईल, असे स्वप्नात देखील कोणाला वाटले नसेल मात्र राज्यातील राजकीय नाट्याला वेगळी कलाटणी मिळून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या तीन पक्षाची मोट बांधून काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सर्व बाजू पटवून दिल्यानंतर काँग्रेसने देखील सरकार स्थापन करण्यास परवानगी देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच राज्यात हा नवा राजकीय अध्याय सुरू झाला. राज्यात या तिन्ही पक्षाची सत्ता आल्यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये या तिन्ही पक्षाने भाजपला रोखण्यात यश मिळविले. जिल्हा बँकांच्या निवडणुकीत देखील भाजपला रोखण्यात यश मिळविले. मात्र, आता राज्यातील 2022 मध्ये पुणे, पिंपरी- चिंचवड, मुंबई, नागपूर, ठाणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार असून या निवडणुका जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण, कोरोनाच्या संकटात राज्याला आर्थिकदृष्ट्या मोठी किंमत मोजावी लागली आहे. रोजगार, शिक्षण यावर गंभीर परिणाम झाला असून त्यातच शिवसेनेचे तत्कालीन मंत्री संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागल्यामुळे एका अर्थाने पक्षाची पर्यायाने सरकारची देखील बदनामी झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. कोरोनाची दुसरी लाट भयानक असल्यामुळे सरकारला यावर नियंत्रण आणणे हे आव्हान असून दुसरीकडे राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे विरोधकांचे होणारे हल्ले ते परतावून कोरोनातून सावरण्यासाठी जनतेला दिलासा देणे, ही देखील सरकारपुढे मोठी तारेवरची कसरत आहे. वर्षभरात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच नियोजन करून कामाला लागणे, याचा अर्थ या महाविकास आघाडी सरकारला हे मोठे दिव्य पार करावे लागणार आहे. यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाची कस लागणार आहे.

पिंपरी महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर अजितदादा हाताश झाले. त्यानंतर दोन वर्षाने म्हणजेच 2019 ला लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातून दादाचे सुपूत्र पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली. निवडणुकीत स्थानिक बाहेरचा वाद होऊन स्थानिक एकत्र आले. त्यामध्ये सर्व पक्षाचे मिळून एक होते. या सर्वांनीच पार्थच्या विरोधात जावून मतदान केले. आणि पार्थचा पराभव झाला. या पराभवाचा सर्वाधिक धक्का अजितदादांना बसला. कारण, त्यांचे चिरंजीवाचा राजकारणातला प्रवेश आणि पहिलीच निवडणूक तेही पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव दादांच्या जिव्हारी लागला. या पराभवामुळे दादांच्या डोक्यात या शहरातली अनेक मंडळी बसली. काही महिने येथील लोकांना भेटणे देखील टाळले. शेवटी राजकारणात या गोष्ष्टी होतच असतात. पुन्हा दादांनी लक्ष घालण्यास सुरूवात केली. सुदैवाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. आणि सत्तेच्या चाव्या दादांच्या हाती आल्यामुळे अनेक समर्थक पुन्हा दादांना भेटू लागले. तरी देखील मनामध्ये आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला, हे शल्य काही विसरू शकत नाही. आणि त्यातूनच दादांचा अखेर उद्रेक बाहेर आला.

महापालिकेत भाजपची सत्त्ता आहे. भाजप बहुमताच्या जोरावर वाटेल ते ठराव मंजुर करून घेत आहे. अनेक विकास कामात निविदांच्या रकमा 5 ते 10 पटीने वाढवून जो गैरकारभार केला आहे. त्याचा अक्षरक्षाः कळस झाला आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वतः महापालिकेतील विकास कामात जो मोठा गैरकारभार होत आहे, चुकीच्या पध्दतीने विकास कामाचे आराखडे केले जात आहे, त्याबद्दल त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राज्य सरकार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तर कै. नगरसेवक दत्ता साने यांच्या विरोधी पक्ष नेत्याच्या वर्षभराच्या कारकिर्दीत भाजपच्या भ्रष्ट कारभाराबद्दल त्यांनी आवाज उठविला. मात्र, त्यानंतरही तिन्हीही विरोधी पक्षनेत्यांनी भाजपच्या भ्रष्ट कारभाराबद्दल आवाज उठविला नाही. उलट स्थायी समितीमध्ये त्यांच्या होला हो मिळवून एकप्रकारे पाठिंबा दिला आहे. या सर्व बाबी अजितदादांना माहित नाही का? सर्व माहित आहे. आणि म्हणूनच अखेर दादांचा संयम सुटला. आणि आपल्या समर्थकांची खरडपट्टी काढून चार वर्षांत काय दिवे लावले, याचा हिशोब मागितला.

दादांनी गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची बैठक पुण्यात बोलवली होती. या बैठकीत दादांनी प्रत्येकाला फैलावर घेऊन राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून काय दिवे लावले, हे सांगा, अशा शब्दात खरडपट्टी काढली. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार भाजपाचे सत्ताधारी करत असताना विरोधी पक्षनेत्यांसह पक्षाचे सर्वच नगरसेवक मात्र सत्ताधार्‍यांच्या सूरात सूर मिसळून सेटिंगमध्ये व्यस्त आहेत, असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत दादांनी पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांना अत्यंत शेलक्या शब्दात खडे बोल सुनावले. दादांनी कोणाचीच तमा न बाळगता केलेल्या फटकेबाजीमुळे शहरातील पदाधिकारी चांगलेच धास्तावले. राष्ट्रवादीचे स्थायी समितीत सदस्य असताना वादग्रस्त विषयांना विरोध न करता त्यांना मान्यता दिली जाते. याचा अर्थ काय? या गैरकारभारात देखील तुम्ही सहभागी आहेत, असाच होतो. ज्यांनी 25 लाख मुर्तीच्या खरेदी प्रकरणावरून राष्ट्रवादीला लक्ष्य करून जनतेमध्ये गैरसमज पसरवून देऊन राष्ट्रवादीला बदनाम केले आणि सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले. आणि आता राजरोसपणे कोट्यावधी रूपयांचा गैरकारभार, भ्रष्टाचार होत असताना राष्ट्रवादी यावर चकार शब्द बोलायला तयार नाही. याचा अर्थ अशा कारभाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असाच होतो. झाले हे पुरे झाले, यापुढे मी खपवून घेणार नाही. चुकीच्या कामांना विरोध करून सत्त्ताधार्‍यांचा गैरकारभार जनतेसमोर आणा, असे दादांनी ठणकावून सांगितले. या बैठकीला पार्थ पवार, आमदार अण्णा बनसोडे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.

दादा आपण आता सत्ताधारी आहात. राज्य सरकारच्या हातात बरेच काही असते. त्यामुळे चुकीच्या कामांना स्थगिती देऊन या कामाची राज्य सरकारकडून चौकशी लावू शकता. मात्र, आपण गेल्या वर्षभरात अशी कोणतीच कार्यवाही केली नाही. कारण, भाजपमध्ये आपले देखील मैत्रीचे संबंध असल्यामुळे कदाचित मैत्री आड येत असेल. त्यामुळे आपण काही निर्णय घेऊ शकत नसाल. ही वस्तुस्थिती असली तरी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.

तर तुम्ही सत्तेचा वापर करून पिंपरीतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून या भाजपच्या स्थानिक नेत्यांना सळो की पळो करू शकता. मात्र, स्थानिक नेत्यांचे देखील आपले आजही संबंध आहेत. कारण, भविष्यात हे पुन्हा राष्ट्रवादीत येऊन सत्तेत आणण्यासाठी मदत करतील, यासाठी आपण याकडे कानाडोळा करत असाल तर राजकीयदृष्ट्या आपल्याला महागात पडेल. कारण, पार्थचा पराभव आणि महापालिकेची सत्ता याच मंडळींनी आपल्याकडून खेचून नेली आहे. त्यामुळे दादा आत्तापर्यंत बेरजेच्या राजकारणामुळे आपला तोटा झाला आहे. राजकारणाचा ट्रेंड बदलल्यामुळे राजकारणाचे व्यापारीकरण झाले आहे. त्यामुळे आपणासही आता बदलावे लागेल. आणि दादा आता तुम्हाला राजकारणातील खर्‍या अर्थाने दादागिरी दाखवावी लागेल.


दै. केसरीच्या सौजन्याने 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा