Breaking

मोठी बातमी : टाटा मोटर्सने उत्पादन थांबवले


पुणे : कोरोना संसर्गात वाढ होत असल्याने 14 एप्रिलला रात्री आठ वाजल्यापासून एक मेपर्यंत महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, टाटा मोटर्सने पुण्यातील त्यांच्या फॅक्टरीतील उत्पादन 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचं एका पत्राद्वारे जाहीर केलं आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी मर्यादित कामगार संख्येने टाटा मोटर्सचे पुणे प्लांटमधील काम सुरू आहे.


महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन आदेशात नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून टाटा मोटर्स आपल्या पुणे प्लांटमध्ये कार्यरत आहेत. मर्यादित कर्मचारी सर्व सुरक्षा प्रोटोकॉल, अंतराचे निकष आणि स्वच्छता मानकांचे पालन करत याठिकाणी उपस्थित आहेत. संचारबंदी आदेशानुसार आम्ही आमच्या प्लांटमधलं वाहनांचं उत्पादन 15 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.' असं टाटा मोटर्सने पुण्यातील भोसरी याठिकाणी असणाऱ्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सादर केलेल्या पत्रात लिहिलं आहे.

कंपनीत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची बससेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची विनंती टाटा मोटर्सतर्फे करण्यात आली आहे.

सुरक्षितता राखण्यासाठी तसंच वीज, पाणी आणि हवेची लाइन यांचं व्यवस्थापन तीन शिफ्टमध्ये करण्यासाठी आम्ही प्रत्येक शिफ्टमध्ये अत्यावश्यक सेवांच्या व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांना बोलावत आहोत. त्यात डिस्पेन्सरी, डीजी सेट ऑपरेशन, अग्निशमन यंत्रणा, पाणीपुरवठा, 22 केव्ही सबस्टेशन, सिक्युरिटी व्हिजिलन्स आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदींचा समावेश आहे,' असं कंपनीतर्फे पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

याशिवाय क्रेन्स, रोड लेव्हलर्स, एक्सॅव्हेटर्स यांसारख्या कन्स्ट्रक्शन एक्विपमेंट्सचे उत्पादन करणारे सहा प्लांट्स आणि टायर्स, विंडशिल्ड्स, स्टीअरिंग मेकॅनिझम या भागांची निर्मिती करणारे प्लांट्स इत्यादींचा त्यात समावेश आहे.

13 एप्रिल रोजी राज्य सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या आदेशानुसार उत्पादन क्षेत्रावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी आहे; मात्र कमी मनुष्यबळात ते सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत. 14 एप्रिलपर्यंतच्या स्थितीनुसार, महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. 'पीआयबी-महाराष्ट्र'च्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 14 एप्रिलपर्यंतच्या स्थितीनुसार एक लाख 12 हजार 213 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित असून, 14 एप्रिल रोजी 7887 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातल्या सर्वांत जास्त कोरोनाबाधित असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा