Breaking
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव, उपविभागीय अधिकाऱ्यांना किसान सभेचे निवेदनाद्वारे मूलभूत सूचना


आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील वाढता कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी किसान सभेने काही मूलभूत सूचना उपविभागीय अधिकारी आंबेगाव यांना एका निवेदनद्वारे केल्या आहेत.


निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग हा अत्यंत धोकादायक आहे, कोरोनाला अटकाव करण्यासाठीच्या प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांना किसान सभेने पूर्ण पाठिंबा दिला आहे. कोरोना विरोधातील या लढाईत प्रशासना सोबत आम्ही आहोत, सोबत राहू असा विश्वास अखिल भारतीय किसान संघटनेने या निवेदनातून व्यक्त केला आहे.


आंबेगाव तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात कोरोनाचे वाढते रुग्ण ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यासाठी प्रशासन, जनता आणि संस्था, संघटना यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात कोविडचा वाढता प्रसार हा अत्यंत धोकादायक ठरू शकतो. यासाठी वेळीच पावले उचलावी लागतील, या अनुषंगाने काही सुचना अखिल भारतीय किसान सभेचे अशोक पेकारी, कृष्णा वडेकर, राजू घोडे यांनी केल्या आहेत.


किसान सभेने केलेल्या सुचना पुढीलप्रमाणे : 


● मागील दोन दिवस तळेघर येथे डॉक्टर उपलब्ध न झाल्याने कोविडच्या संशयित रुग्णांची तपासणी होवू शकली नाही. त्यामुळे तपासणीसाठी आलेले संभाव्य कोविड रुग्ण यांची, तपासणी न झाल्यामुळे त्यांचे विलगीकरण झाले नाही व त्यामुळे अशा व्यक्तींपासून संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे आदिवासी भागातील संशयित रुग्णाच्या तपासण्या कशा वाढवता येतील याविषयी नियोजन होणे आवश्यक आहे.


● आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात कोविड पोझीटिव्ह रुग्ण आढळून आल्यास व त्यांना कोणतीही लक्षणे दिसून न आल्यास त्यांना विलगीकरणासाठी अवसरी येथे न पाठवता भक्त निवास, राजपूर येथे व्यवस्था करावी.


● अवसरी येथील कोविड कक्ष, यावर जो ताण निर्माण झालेला आहे, त्यातून अवसरी येथील कोविड केंद्राचे काम सुरळीत होण्यास मदत होईल व रुग्णांची होणारी हेळसांड थांबू शकते. यासाठी भक्त निवास, राजपूर येथे किंवा आदिवासी भागातील एखाद्या शासकीय इमारतीत कोविड विलगीकरण कक्ष तयार करावा. 


● आदिवासी भागातील ज्यांच्या कोविड टेस्ट पोझीटीव्ह येत आहेत, परंतु लक्षणे कोणतीही नाही त्यांचे विलगीकरण येथेच करावे हे विलगीकरण केंद्र नक्कीच अत्यंत उपयुक्त ठरेल.


● महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत जेथे कोविड रुग्णावर उपचार केले जातात तेथे रुग्णांवर या योजने अंतर्गतच रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध व्हावे, रुग्णांना हे इंजेक्शन बाहेरून आणायला सांगू नये. रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांच्या नातलगाना हॉस्पिटलमध्येच उपलब्ध व्हावेत, ते बाहेरून आणण्यास सांगू नये. याविषयी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे पालन व्हावे.


● लसीकरण मोहिमेत विविध सामाजिक संस्था, संघटना यांना सहभागी करून घेवून, ४५ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण कसे होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 


● आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेघर, अडविरे, तिरपाड, डिंभे येथे संशयित रुग्ण तपासणीची संख्या वाढवावी तसेच येथे नियमित डॉक्टर उपलब्ध असावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा