Breakingशिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्या; 'एसएफआय' ची समाजकल्याण मंत्र्यांकडे मागणी


मुंबई : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीने शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. यासाठी एसएफआयने ईमेलद्वारे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांना निवेदन पाठवले आहे.


एसएफआयने केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील एका वर्षापासून महामारीमुळे संपूर्ण देशासह आपले राज्य त्रस्त आहे. मागील काही दिवसांत राज्यात महामारी अजून प्रचंड प्रमाणात पसरत आहे. यामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षच विस्कळीत झाले आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव आम्हा विद्यार्थी वर्गाला जरूर आहे. परंतु यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताकडे पूर्णतः दुर्लक्ष होऊ नये, याची दक्षता सरकारने घ्यावी, ही विद्यार्थ्यांची भावना आहे.

या स्थितीत मागील शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती अजूनही मोठ्या प्रमाणात वितरीत झालेली नाही. अशातच यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारले गेले. याची अंतिम तारीख ३१ मार्च ही होती. शिष्यवृत्ती अर्ज करण्यात कोरोना महामारीमुळे आणि इतर कारणांमुळे अनेक अडचणी विद्यार्थ्यांना आल्या. तसेच शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी उपलब्ध केलेल्या संकेतस्थळावर देखील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे हजारो विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित आहेत.

म्हणून सर्व वंचित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शिष्यवृत्ती अर्ज करण्याची तारीख वाढवून द्यावी आणि अर्ज करण्यास संकेत स्थळावर येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. अशी मागणी एसएफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा