Breaking

गर्दीची माहिती न दिल्यास पोलीस पाटालांवर निलंबनाची कारवाई करू - सारंग कोडोलकर


डिंभे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ, दशक्रिया विधी आदी कार्यक्रमात गर्दी झाल्याची माहिती पोलीस पाटलांनी संबंधित अधिकाऱ्यांना न दिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिला. 


आंबेगाव तालुक्यातील पोलीस पाटील, मंडलाधिकारी, तलाठी यांची प्रांत अधिकारी कोडलकर, तहसीलदार रमा जोशी, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांची ऑनलाइन बैठक झाली. त्यावेळी प्रांत अधिकारी कोडोलकर बोलत होते. 

होम क्वारंटाइन असलेली व्यक्ती घराच्या बाहेर फिरणार नाही याची काळजी संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी घ्यावी. त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवावी. 

लग्न समारंभामध्ये गर्दी होऊ न देणे. व-हाडींची अॅण्टिजन तपासणी केली आहे का ? ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे का  आदीची माहिती घ्यावी. याशिवाय, इतर कार्यक्रमांमध्ये देखील शासनाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक गर्दी झाल्याची माहिती पोलीस पाटलांनी द्यावी. अन्यथा कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोडोलकर यांनी दिला.

ग्रामीण भागात होतोय कोरोनाचा शिरकाव !

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा