Breaking
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय; महाविद्यालयातही मिळणार लॉगइन- आयडी, पासवर्डपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणा-या प्रथम सत्राच्या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लॉगइन- आयडी व पासवर्ड मिळण्यास अडचण निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाकडून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेता येणार आहे.


विद्यापीठाच्या प्रथम सत्रच्या परीक्षा १० एप्रिल पासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांनी लॉग इन आयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक ईमेल आयडी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. परंतु, विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या मॉक टेस्ट दरम्यान काही विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड मिळत नसल्याचे दिसून आले.


विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षेसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त केले आहे. त्याच बरोबर विद्यापीठाशी संलग्न असणा-या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे लॉग इन आयडी व पासवर्ड पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. थेट विद्यापीठाशी संपर्क साधण्याऐवजी विद्यार्थी महाविद्यालयांमधील आपल्या परिचित प्राध्यापकांशी संपर्क साधून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेऊ शकतात .त्यामुळे विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.


परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी विद्यापीठाने आवश्यक यंत्रणा उभी केली आहे. परंतु, वर्षभर अभ्यास केल्यानंतर केवळ लॉगइन- आयडी व पासवर्ड माहीत नसल्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणे योग्य नाही. तसेच सर्व महाविद्यालयाकडून आपल्या विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी अडचण येऊ नये याबाबत काळजी घेतली जाते. त्यामुळे महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचे लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यात आले आहेत, असे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा