Breaking

घनघोर संघर्ष : सिरियाने केला इस्रायलच्या अणूभट्टीवर क्षेपणास्त्र हल्ला


तेल अवीव : सीरियाने इस्रायलच्या अणु प्रकल्पाजवळ क्षेपणास्त्र डागली आहेत. सीरियाकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे गुरुवारी सकाळी इस्रायलमधील नेगेव वाळवंटात पडली. या भागात शिमोन पेरेज नेगेव अणु संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी इस्रायलने आपला पहिला अणुबॉम्ब विकसित केला होता. सीरियाकडून झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले.


सीरियाकडून इस्रायलच्या अणु प्रकल्पाजवळ क्षेपणास्त्र पडल्यानंतर गुप्त ठिकाणी असलेल्या अणु भट्टीजवळील सायरन वाजला. त्यानंतर इस्रायलचे सैन्य प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले. समोर आलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आदेशानंतर इस्रायलच्या सैन्याने प्रत्युत्तरात जोरदार हल्ला केला. सीरियाच्या मिसाईल लाँचरसह अनेक ठिकाणांवर जोरदार हल्ले केले. मागील काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. या घटनेच्या मागे सीरियात सक्रिय असणारे इराणचे मिलिशिया जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी इराणच्या अणु प्रकल्पावर सायबर हल्ला करून स्फोट घडवण्यात आला होता. हा हल्ला इस्रायलने केला असल्याचा आरोप इराणने केला होता. इस्रायलला या हल्ल्याची किंमत मोजवी लागणार असल्याची धमकी इराणने दिली होती. राजकीय विश्लेषकांनुसार, हा हल्ला इराणचा पाठिंबा असलेल्या मिलिशियाने केला असण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सीरियात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. त्यामुळे इस्रायलसारख्या शक्तिशाली देशांविरोधात कोणीही असे कृत्य करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

जगभरातील अणवस्त्रे आणि शस्त्रांबाबतचे विश्लेषण करणारी स्वीडनची संस्था स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या २०२० च्या अहवालानुसार, इस्रायलकडे ८० ते ९० अणु बॉम्ब आहेत. इराणने कोणत्याही परिस्थितीत अणुबॉम्ब विकसित करू नये यासाठी इस्रायल प्रयत्न करत आहे. त्यामुळेच सातत्याने इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमात अडथळे आणले जात आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा