Breakingजुन्नर : डोंगरांना आग लावण्याचे प्रमाण वाढले, प्रशासन हतबल


जुन्नर (रोहित बोऱ्हाडे) : तालुक्यातील डोंगरांना आग लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील भिवाडे, कुकडेश्वर तसेच देवळे, खैरे, खटकाळे, तळमाची या परिसरातील प्रसिध्द दौंड्या डोंगर आगीने जळून खाक झाला आहे. (३० मार्च) रोजी अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे निमगिरी किल्ला परिसरात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांना आपला प्राण गमवावा लागला असण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या प्रमाणात हिरडा, इतर आंब्याच्या झाडांसह काजू आंब्याच्या झाडांना देखील आग लागली आहे तसेच जनावरांसाठी कापून ठेवलेला चारा जळून खाक झाला आहे.


वन उपजांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान !


आदिवासी भागातील बहुतांश जनतेचे हिरडा हे वन उपज आर्थिक साधन आहे. वर्षातून एकदा येणारा हिरडा जमा करुन अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. परंतु लागल्या आगींमुळे वन क्षेत्राबरोबर खाजगी मालकीतील हिरड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


वन्यजीवांची मोठी हानी ! 


जंगलांना लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आगीत भस्मसात होतात. डोंगराला लावल्या जाणाऱ्या आगी साधारणपणे रात्रीच्या वेळेला लावल्याचे समजते. रात्रीच्या वेळी जंगलातील प्राणी, पक्षी, डोंगराच्या पायथ्याशी, कुशीत, कड्या कपाऱ्यात शांत निद्रिस्त असताना अचानक लागलेल्या आगीत भस्मसात होऊन जातात.


पुढच्या वर्षी चांगलं गवत येतं हा गैरसमज 


शेतातील, जंगलातील गवत जाळल्यामुळे गवत चांगलं उगवतं, हा समज लोकांमध्ये रुढ झाला आहे. त्यामुळे खाजगी मालकीतही लोक आग लावतात. परंतु यामुळे हजारोंं, लाखो जीव आगीत जळून खाक होतात. हे भान लोकांना राहत नाही. किडे, मुंग्या, सरपटणारे अनेक प्राणी आणि पक्षीही आगीचे बळी ठरत आहेत. 


गवत जाळल्यामुळे पुढच्या वर्षी चांगलं गवत येतं हा गैरसमज डोक्यातून काढून टाकणे गरजेचे आहे. यामुळे शेतातील पालापाचोळा, काढीकचरा जळून खाक होतो. हाच पालापाचोळा, काढीकचरा उत्तम खत म्हणून वापरले जाऊ शकते.


पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज !


जागतिक तापमान वाढ हे एक आवहान बनले असताना शासन पर्यावरण जनजागृती सप्ताह, दिन साजरे करत आहे. परंतु अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे वन क्षेत्रात लावलेली झाडेच जळून ठाक होत असतील तर हे प्रशासनाचे अपयश आहे.


प्रशासनाचे कागदी आदेश, कारवाईचे काय? 


साधारणपणे महिन्यापूर्वी वन विभागाने स्थानिक जमीन मालकांना नोटिसा काढल्या होत्या. त्यामध्ये म्हटले होते की, जर कोणी स्वत:च्या  किंवा वन विभागाच्या हद्दीत आग लावल्यास किंवा वन विभागाच्या हद्दीत आग लावल्यास किंवा डिरडा, बेहडा सारख्या झाडांपासून २०० मीटर च्या आत आग लावल्यास दंडात्मक कारवाई तसेच शिक्षा करण्याचे आदेश दिले होते. परंतु वन विभागाचे आदेश कागदावर राहिले असून आतापर्यंत पश्चिम परिसरातील सर्वसाधारण सर्वच डोंगररांगांना आगी लावण्यात आल्या आहेत.


आग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज !


वन विभागाने नोटीसा काढून आम्ही दक्ष असल्याचे दाखले आहे. परंतु नोटिसा काढून मार्ग निघणार नाही. प्रशासनाने दक्ष राहून कारवाई करण्याची गरज आहे. वन विभाग कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्थानिकांकडूनच डोंगरांना आगी लावल्या जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान होत आहे. नागरिकांनी स्वतः वनांचे रक्षण करणे गरजेचे आहे. आग लागल्यास विझविण्यासाठी गावातील नागरिकांनीच पुढे आले पाहिजे.

- रमेश खरमाळे, वनरक्षक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा