Breaking

चर खोदून कर्नाटकने सीमा केली बंद


गडहिंग्लज
 (कोल्हापूर) : जिल्ह्यात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांची धास्ती कर्नाटकने घेतली असून यापूर्वी कोगनोळी येथे अडवणूक केली जात असताना आता सीमा बंद करण्यामध्ये कर्नाटक सरकारने हालचाली वेगवान केल्या आहेत. नांगनूर ते संकेश्वर रोडवर गोटूर बंधार्‍याच्या पलीकडे मोठी चर मारून हा रस्ता बंद केला आहे. या रस्ता बंदमुळे सीमाभागातील अनेकांना मोठ्या अंतराचा फटका बसत आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी शेजारील कर्नाटकात मात्र रुग्णसंख्येचे आकडे महाराष्ट्राच्या तुलनेने कमी आहेत. महाराष्ट्रात कडक निर्बंध, संचारबंदी व आता लॉकडाऊनकडे वाटचाल असताना कर्नाटकात मात्र तूर्तास यातील काहीही नसून केवळ रात्रीची संचारबंदी काही ठिकाणी लागू केली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे निपाणी पोलिसांनी बुधवारी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा बंद केल्या असून, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाका येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍या नागरिकांना येथे प्रवेश देताना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. कोरोना तपासणी केलेली कागदपत्रे पडताळून मगच कर्नाटकात प्रवेश द्या, अशा सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे बुधवारपासून निपाणी सर्कलमधील पोलिसांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक मार्गावर अनेक ठिकाणी नाकाबंदी करून प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक सरकार करीत आहे. सीमा बंद न करता तपासणी करून प्रवाशांना सोडले जात असल्याने त्यावेळी फारशी समस्या नव्हती. आता मात्र कर्नाटक सरकारने काही ठिकाणच्या सीमा बंद करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नांगनूरजवळ थेट रस्त्याची खोदाई करूनच रस्ता बंद केल्याने मोठी अडचण होत आहे. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील 25 ते 30 हून अधिक खेड्यांचा संपर्क कर्नाटकशी येतो. या परिसरातील लोकांची गैरसोय होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा