Breaking

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न


औंध : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. 


यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या प्रा. डॉ. जयश्री मगदूम तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. संजय नगरकर उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. जयश्री मगदूम यांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखविला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास लक्ष्मी वहिनींनी आयुष्यभर साथ दिली. आपल्याकडील समाजसुधारकांना सामाजिक कार्य करीत असताना सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिराव फुले यांना तर साधनाताई आमटे यांनी बाबा आमटे यांना आयुष्यभर साथ दिली. त्याप्रमाणेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना लक्ष्मी वहिनींनी आयुष्यभर साथ दिली. 

त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास त्या एकरूप झालेल्या दिसतात. बहुजन समाजाचा उद्धार व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ओळखले होते. बहुजन समाजातील, विविध जाती-जमातीमधील मुला- मुलींना शिक्षण घेता यावे, यासाठी कर्मवीर अण्णांनी शाहू बोर्डिंगची स्थापना केली. वसतिगृहातील मुला-मुलींच्या अन्नधान्याची व्यवस्था व्हावी म्हणून कर्मवीर अण्णा नेहमी  परगावी जात असत. अशावेळी वसतीगृहातील मुला-मुलींची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मी वहिनींवर येऊन पडत असे. वसतिगृहातील मुला-मुलींना आपल्या घरची आठवण येऊ नये म्हणून लक्ष्मी वहिनींनी त्यांना आईचे प्रेम आणि माया दिली. 

कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर समाजाने बहिष्कार टाकला. अशा परिस्थितीतही त्यांनी आपले काम थांबवले नाही. दिवसेंदिवस वसतिगृहातील मुलांची संख्या  वाढत गेली. मुलांच्या जेवणाची आणि शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून लक्ष्मी वहिनींनी एक-एक करत आपले शंभर तोळे सोने विकून टाकले. तसेच एक दिवस मुलांच्या जेवणासाठी आपला शेवटचा अलंकार मंगळसूत्रसुद्धा मोडले. लक्ष्मी वहिनींनी तन-मन-धन अर्पण करून कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास सहकार्य केले. त्यामुळे लक्ष्मी वहिनी या संस्थामय जीवन जगणारी एक महान स्री होती. असे मत डॉ. जयश्री मगदूम यांनी व्यक्त केले.
 

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. संजय नगरकर म्हणाले, आजच्या तरुण-तरुणींसमोर कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मी भाऊराव पाटील यांचा आदर्श उभा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये बाया कर्वे, सावित्रीबाई फुले व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी जे सामाजिक कार्य केले. तसेच सामाजिक कार्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. या सर्व गोष्टींची जाणीव आजच्या विद्यार्थ्यांना व्हावी अशा उद्देशाने हा उपक्रम साजरा केला जात आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांना शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी लक्ष्मी वहिनींनी प्रेरणा दिली. लक्ष्मी वहिनी यांच्या ठिकाणी वात्सल्य, माया,  ममता आणि त्यागाची भावना दिसते. लक्ष्मी वहिनींनी वस्तीगृहातील मुलांसोबत हा वात्सल्यभाव कायम जोपासला. आजच्या तरुण तरुणींनी यामधुन प्रेरणा घेऊन शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करावे, अशा स्वरूपाचे मत प्रा. डॉ.संजय नगरकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. नलिनी पाचर्णे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा. आसावरी शेवाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी तर तांत्रिक सहकार्य प्रा. मयूर माळी यांनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा