Breaking
विशेष : महात्मा फुले जयंती आणि किसान सभेची स्थापना एकाच दिवशी - एक सुखद योगायोग - डॉ. अशोक ढवळे


आज ११ एप्रिल हा महात्मा जोतीराव फुले यांचा जयंतीदिन. १८२७ साली त्यांचा जन्म झाला. ब्राह्मण्यवाद, वर्णजातिव्यवस्था आणि सावकारशाहीचे कट्टर विरोधक; स्त्रीशूद्रातिशूद्रांचे लढाऊ कैवारी; १८४८ साली सावित्रीबाईंसोबत भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचे संस्थापक; 'गुलामगिरी', 'शेतकऱ्याचा आसूड', 'ब्राह्मणांचे कसब', 'छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा' अशा मूलभूत ग्रंथांचे लेखक; आणि भारतातील अग्रगण्य क्रांतिकारी समाजसुधारक; हे होते महात्मा जोतीराव फुले यांचे तेजस्वी पैलू. वर्णजातिव्यवस्थेचे आणखी एक कट्टर शत्रू, स्त्रीमुक्तीचे खंदे समर्थक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना आपले गुरू मानत असत. आंबेडकर जयंती १४ एप्रिलला येत आहे.


सुखद योगायोग असा की, आज ११ एप्रिल हा अखिल भारतीय किसान सभा ह्या देशातील पहिल्या आणि आज २३ राज्यांत दीड कोटी शेतकरी सभासद असलेल्या सर्वात सामर्थ्यशाली किसान संघटनेचाही स्थापना दिन आहे. आजच्या दिवशी १९३६ साली लखनौ येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात तिची स्थापना झाली. 


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किसान सभेचा लक्षणीय सहभाग होता. आंध्रमधील तेलंगणचा सशस्त्र शेतकरी संग्राम, बंगालमधील तेभागाचा लढा, केरळमधील पुन्नप्र वायलारचा संघर्ष, महाराष्ट्र व त्रिपुरातील आदिवासी उठाव, आसाममधील सुरमा खोऱ्याचा लढा, तामिळनाडूमधील पूर्व तंजावूरचा संघर्ष अशा अनेक तेजस्वी सरंजामशाहीविरोधी लढ्यांचे तिने नेतृत्व केले. या व नंतरच्या शेतकरी लढयांत हजारो हुतात्मे धारातीर्थी पडले. 


१९९१ साली आपल्या देशात सुरू झालेल्या देशघातकी नवउदारवादी आणि अतिभांडवलदारी धोरणांना कसून विरोध करणारी ती देशातील पहिली किसान संघटना होती. या धोरणांच्या विदारक परिणामांविरुद्ध किसान सभेने देशभर अनेक लढे केले.


महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जून २०१७च्या ११ दिवसांच्या अभूतपूर्व संयुक्त शेतकरी संपात किसान सभेचा महत्त्वाचा वाटा होता. मार्च २०१६ मधील नाशिक येथील १ लाख शेतकऱ्यांचा 'महामुक्काम सत्याग्रह', ऑक्टोबर २०१६ मधील पालघर जिल्ह्यात वाडा येथील ५० हजार आदिवासी शेतकऱ्यांचे 'महाघेराव आंदोलन' आणि मार्च २०१८ मध्ये नाशिक ते मुंबई असा ७ दिवसांचा, ४० हजार शेतकऱ्यांचा अभूतपूर्व 'किसान लॉंग मार्च' अशा आंदोलनांचे किसान सभेने नेतृत्व केले. 


गेले साडेचार महिने 'संयुक्त किसान मोर्चा'च्या नेतृत्वाखाली दिल्लीजवळ आणि देशभर अविरत चाललेल्या ऐतिहासिक शेतकरी संघर्षात इतर अनेक संघटनांसोबत अखिल भारतीय किसान सभेचा मोठा सहभाग आहे. 


११ एप्रिल या महात्मा फुले जयंतीदिनी आणि किसान सभेच्या स्थापनादिनी, आणि १४ एप्रिल या आंबेडकर जयंतीदिनी, आजच्या भ्रष्ट, कॉर्पोरेटधार्जिण्या, जनविरोधी, धर्मांध, मनुवादी आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या सरकारांच्या विरोधात जनतेला एकत्र करून श्रमिक-दलित-पीडित-वंचित जनतेचे हक्क, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक-आर्थिक न्याय आणि आपल्या संविधानाचे संरक्षण करण्याची आपण सर्व जण मिळून प्रतिज्ञा घेऊ या आणि या अटीतटीच्या संघर्षात तनमनधनाने उतरू या!
डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय अध्यक्ष
अखिल भारतीय किसान सभा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा