Breaking

मोदी पंतप्रधान नव्हे, पक्षपाती 'प्रचारक' - सीताराम येचुरी


नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार कायम ठेवल्याबद्दल भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय-एम) रविवारी टीकेची झोड उठविली. देशाचे पंतप्रधान म्हणून नव्हे तर एका पक्षपाती पक्षाचे प्रचारक म्हणून ते आपले रुप दाखवीत आहेत, असा आरोप सीपीआय-एमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला.


येचुरी यांनी म्हटले आहे की, वेगाने फैलावणाऱ्या जागतिक साथीमुळे देशवासीयांना यातना सोसाव्या लागत आहेत. अशावेळी आपल्याकडे केंद्र सरकार नव्हे तर पीआर कंपनी आहे, जिच्याकडे एक निवडणूक प्रचारक आहे. जो निष्ठुरपणे आणि निर्लज्जपणे जनतेला वेदना, दैन्य आणि विनाशाच्या खाईत लोटतो आहे.

पंतप्रधान पदाची नव्हे तर प्रचारकाची भूमिका मोदी यांनी महत्त्वाची वाटते. त्यामुळेच त्यांनी निवडणूक प्रचाराला प्राधान्य दिले आहे. त्यातून वेळ उरलाच तर ते घाईघाईने दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी छायाचित्रे आणि मथळे मिळतील असे काहीतरी करतात. ही स्थिती अत्यंत खेदजनक असल्याचेही येचुरी यांनी म्हटले आहे.

बैठकांचा देखावा

देश अनेक दशकांतील सर्वाधिक भीषण संकटाचा सामना करीत असून ही स्थिती युद्धासारखी असल्याचे एका माजी लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. मोदी मात्र प्रचारात व्यस्त आहेत. ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपलब्ध नाहीत. सामुहिक संसर्गास कारणीभूत ठरणारे उपक्रम (सुपरस्प्रेडर) पार पडल्यानंतर ते बैठकांचा देखावा करीत आहेत, असेही येचुरी यांनी म्हटले आहे.

भारतीयांच्या जीवापेक्षा सभा...

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सीपीआय-एम तसेच काँग्रेसने भव्य सभा आयोजित करायच्या नाहीत असा निर्णय घेतल्याचे येचुरी यांनी निदर्शनास आणून दिले. अमित शहा यांचे नाव न घेता ते म्हणाले की, भाजप नेता, जो गृहमंत्री आहे, तो मात्र कोरोनाबाबत हास्यास्पद, अशास्त्रीय आणि मूर्खपणाची बडबड करतो आहे, असे येचुरी म्हणाले. त्यांच्या आणि मोदी यांच्या सभा भारतीयांच्या जीवापेक्षा मोलाच्या आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खासगी निधी लोकांच्या आरोग्यासाठी द्या

भारताने गेल्या वर्षी कोविड-१९ विषाणूला पराभूत केल्याचे वक्तव्य मोदी यांनी केले होते. त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून येचुरी म्हणाले की, हे खरे आहे की काय ? तसे असेल तर मग आपण इतक्या दुर्दैवी परिस्थितीत का सापडलो आहोत ? लोकांना मृत्यूच्या दारात लोटले जात आहे आणि हे रोखण्यासाठी तुमच्याकडे अजूनही कोणतीही योजना, पद्धती नाहीत. सामुहिक मेळावे थांबवा. महत्त्वाकांक्षेने पछाडून तुम्ही घेत असलेल्या प्रचारसभा थांबवा. तुमच्या खासगी ट्रस्टचा निधी लोकांच्या आरोग्यासाठी द्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा