Breaking



केंद्र शासनाच्या जाचक अटींमुळे अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून व कुपोषित बालके आहारापासून वंचित राहण्याची शक्यता ?


महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर मराठी ऐवजी इंग्रजीत काम करण्याची सक्ती



पुणे : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाड्यांच्या कामकाजाची माहिती शासनाला दैनंदिन पातळीवर कळविण्यासाठी, मे २०२० पर्यंत कॅस या ऍपमध्ये ती माहिती भरली जात होती. परंतु मे २०२० पासून कॅसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ते बंद पडले व माहिती पुन्हा रजिस्टर्समध्ये माहिती भरण्याचे आदेश आले. काही कर्मचाऱ्यांकडील जुनी रजिस्टर्स संपलेली असल्यामुळे त्यांना स्वखर्चाने नवीन रजिस्टर्स घेणे भाग पडले. या सर्व अडचणींना तोंड देत असतानाच पोषण ट्रॅकर या केंद्र शासनाच्या नवीन ऍपवर काम करण्याचा आदेश आला. नव्या आदेशामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

अनेक कर्मचाऱ्यांचा शासनाने दिलेला मोबाईल नादुरुस्त आहे व त्यात हा ऍप डाऊनलोड होत नाही त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाईलवर ऍप डाऊनलोड करायला सांगितले जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांंकडे स्वतःचा चांगला स्मार्ट फोन नाही. काहींकडे असल्यास तो त्या एकट्या वापरत नाहीत तर त्यांच्या घरातील कुटुंबीय सामायिक रित्या वापरतात. अनेकांच्या पाल्यांचे त्यावर ऑनलाईन वर्ग किंवा परिक्षा चालू असतात. त्यामुळे त्यांना तो हवा तेव्हा उपलब्ध होईलच याची खात्री देता येत नाही. शिवाय डेटा रिचार्जचे पैसे महिनोन महिने येत नाहीत. त्यामुळे पोषण ट्रॅकरसाठी खाजगी फोन वापरला जाऊ नये. शासनाने त्यांना चांगल्या क्षमतेचा नवीन मोबाईल द्यावा. तसेच डेटा रिचार्जसाठीचे पैसे नियमितपणे द्यावेत, अशीही मागणी कर्मचारी करत आहेत. 

महाराष्ट्र सर्व शासकीय व्यवहार मराठी, या आदेशालाच हरताळ

महाराष्ट्रात सर्व शासकीय व्यवहार मराठीत व्हावेत, असा आदेश आहे. त्यानुसार पोषण ट्रॅकरमध्ये देखील सर्व माहिती मराठीत भरली गेली पाहिजे. परंतु पोषण ट्रॅकर ऍपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही. इंग्रजीमध्येच सर्व माहिती भरावी लागते. बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी, विशेषतः ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील सेविका, मिनी अंगणवाडी सेविका कमी शिकलेल्या आहेत व त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरता येत नाही. काही ठिकाणी सेविकेची जागा रिक्त असल्याने मदतनीसांना ही जबाबदारी दिली आहे. त्यांना इंग्रजी येत नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन 

लाभार्थी बालकांचा आधार कार्ड क्रमांक जोडल्याशिवाय व सर्व माहिती इंग्रजीत भरल्याशिवाय त्यांना पूरक पोषण आहाराचा लाभ मिळून शकणार नाही, अशी जाचक अट पोषण ट्रॅकरमध्ये घालण्यात आलेली आहे. आधार कार्ड नसले तरीही कुणालाही सामाजिक सुरक्षा व अन्न अधिकारापासून वंचित ठेवण्यास प्रतिबंधित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तसेच मानवी हक्कांचे हे उल्लंघन आहे. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा खूपच चुकीचा निर्णय - शुमा शमीम

"अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा खूपच चुकीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही ऍपमध्ये भरलेली माहिती सिंक होत नाही. कधी रेंज न मिळाल्याने इंटरनेट चालू नसते किंवा त्याची क्षमता कमी असते त्यामुळे माहिती अपलोड होत नाही, तर कधी सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे काम करूनही केवळ पोषण ट्रॅकमध्ये माहिती गेली नाही म्हणून मानधनात कपात करणे अन्यायकारक आहे. "
शुमा शमीम, महासचिव 
अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू)

अंगणवाडी सेविकांच्या जागा रिक्त, मदतनीस वर कामाचा भार 

सेविकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या अंगणवाडीतील मदतनीस ऑनलाईन काम करण्यास सक्षम नसल्यास जवळच्या अंगणवाडी सेविकेला त्या अंगणवाडीचा अतिरिक्त कार्यभार दिला जातो. कमी वेळामध्ये अशा अतिरिक्त अंगणवाडीची जबाबदारी पार पाडणे, म्हणजेच दुप्पट काम करणे केवळ अशक्य आहे. 

या परिस्थितीत त्यांना एप्रिलचे मानधन न देण्याची व लाभार्थ्यांना आहार न देण्याची दबावही प्रशासनाकडून आणला जात आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन - महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती

पोषण ट्रॅकर बाबतच्या सर्व अडचणी सुटेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी बाकीची सर्व कर्तव्ये पार पाडतील. परंतु पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्याचे काम करणार नाहीत. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा निर्णय मागे घ्यावा. तसेच ५ ते ९ एप्रिल २०२१ या आठवड्यात राज्यातील सर्व प्रकल्पांवर तसेच जिल्हा परिषदांवर आंदोलन करून निवेदन देतील, असे अंगणवाडी कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील यांंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा