Breaking
हेमडी येथील आदिवासी कातकरी महिलेचा भरदिवसा बलात्कार करून खून; १८ तासानंतर FIR दाखल


रायगड
 : हेमडी येथील वीटभट्टी कामगार कातकरी महिलेचा भरदिवसा बलात्कार करून खून करण्यात आला. तब्बल १८ तासानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.


सुत्रांकडून समजते की, ३१ मार्च रोजी दुपारी ही घडली असून रिक्षाचालकाने हे कृत्य केल्याचा संशय आहे. घरी लग्न असल्याने सदर महिला (वय ४२) ही आपल्या नवऱ्याला (वारद-माजगाव ता. खालापूर, जि. रायगड) वीटभट्टीवरून आणण्यासाठी सकाळी १० च्या दरम्यान जवळच्या गावातील रिक्षा भाड्याने घेऊन निघाली होती. दुपारी २ च्या दरम्यान सदर रिक्षाचालक वीटभट्टीवर तिच्या नवऱ्याकडे गेला व त्याने तुझी बायको तुला न्यायला आली आहे व मालक सुट्टी देणार नाही म्हणून इथं न येता पुलाखाली थांबली आहे तर तू पटकन आवरून चल असे म्हणाला. नवरा जेव्हा १०० मीटरवरच असलेल्या त्या पुलाखाली पोहोचला तेव्हा त्याला कडेच्या झुडुपात बायको मृत अवस्थेत पडलेली आढळली. नवऱ्याने त्या रिक्षा चालकास बायकोला दवाखान्यात नेऊ असे म्हटले असता रिक्षा चालक मला काम आहे सांगून तिथून निघून गेला. त्यानंतर वीटभट्टी मालकाच्या गाडीतून दवाखान्यात नेले असता महिला मृत असल्याचे निष्पन्न झाले. 

नवऱ्याने तिला हेमडी या गावी अंत्यसंस्कारासाठी आणले. मात्र गावातील महिलांनी मृत महिलेस तपासले असता तिच्या अंगावर अंतर्वस्त्रे नव्हती, गुप्तांगाला सूज आलेली होती व विर्यसदृश्य काहीतरी तिथे सांडल्याचे आढळले. तसेच अंगावरील साडी ही नेसलेली नसून गुंडाळलेली दिसली. यावरून बलात्कार झाल्याचे लक्षात येऊन हे कृत्य रिक्षावाल्यानेच केल्याचा संशय आल्याने रात्री १० वाजता पुन्हा पती व इतर लोक महिलेला घेऊन पोस्टमार्टेमसाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. मात्र डॉक्टर नसल्याने त्यांना सकाळी ९ वाजता या असे सांगण्यात आले. त्याचवेळी ते खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले मात्र पोलिसांनी बलात्कार व खून अशी एफआयआर दाखल न करता महिला चक्कर येऊन मृत पावली असा Accidental death report लिहून घेतला.

काल १ एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते सचिन आशा सुभाष यांना हे समजल्यानंतर ते खालापूरला गेले. त्यावेळी एफआयआर व पोस्टमार्टेम झाले नसल्याचे समजले. सचिन आशा सुभाष यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली. तसेच डीवायएसपी यांना भेटल्यानंतर पोस्टमार्टेम होऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर एफआयआर दाखल करु, असे सांगितले. गावकऱ्यांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली व सचिन आशा सुभाष यांनी मी वकील असल्याचे सांगितले. त्यानंतर जोपर्यंत एफआयआर दाखल केले जात नाही, तोपर्यंत डेडबॉडी ताब्यात घेतली जाणार नाही, असा नागरिकांनी ठणकावून सांगितल्यानंतर एफआयआर दाखल केला.

पिडितेचा मृत्यू होऊन २४ तास झाल्यानंतर आणि दवाखान्यात आणून १८ तास उलटल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. पोस्टमार्टेम झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता अंंत्यसंस्कार पार पडले.

"आदिवासी कधी आणि कसा जन्मतो आणि कधी आणि कसा मरतो याकडे कुणाचंच लक्ष नसतं हे दुर्दैवाने वास्तव आहे. साधा एफआयआर व्हायला १८ तास वाट पाहायला लागते तर न्याय मिळणं खूप अवघड बाब आहे. मी, नंदाताई व ते तलाठी जर नसते तर हे प्रकरण FIR न होताच चक्कर येऊन मृत्यू जाहीर करून निकाली निघालं असतं आणि गुन्हेगार अजून एक बलात्कार आणि खून करायला मोकाट सुटला असता. ज्याच्या पाठीमागे कोणी नाही, त्याच्या पाठीमागे व्यवस्था पण नाही हे वास्तव आहे."
- सचिन आशा सुभाष 

पोलिसांच्या केबिन मधून बाहेर निघताना एक कातकरी पोलिस अधिकाऱ्यांना हात जोडून म्हणाला "साहेब, एक विनंती आहे, आम्हा आदिवासी लोकांना पोलिस स्टेशनात नीट वागणूक मिळत नाही. आम्ही पण माणसंच आहोत आम्हाला नीट वागणूक मिळावी एवढी अपेक्षा आहे." त्यावर हसत अधिकारी म्हणाले "काय करणार, सगळ्या महाराष्ट्रात असंच आहे." 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा