Breakingपिंपरी चिंचवड : फूड, पोळीभाजी आणि स्नॅक्स सेंटर वरील निर्बंध हटवा - सिटू संलग्न हॉकर्स युनियन


संचार बंदी आणि जमावबंदीच्या आदेशातून खाद्य विक्रेत्यांचे व्यवसाय वगळा


पिंपरी चिंचवड फूड, पोळीभाजी आणि स्नॅक्स सेंटर वरील निर्बंध हटवावेत, तसेच संचार बंदी आणि जमावबंदीच्या आदेशातून खाद्य विक्रेत्यांचे व्यवसाय वगळावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगर हॉकर्स युनियन (CITU) च्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, व महापौर माई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
निवेदनात म्हटले आहे की, शहरात पोळीभाजी, फूड, स्नॅक्स सेंटर रात्री आठ नंतर बंद करण्याचे निर्बंध आहेत. चहा, नाश्ता, वडा पाव, समोसा, कांदेपोहे, उपिट, राईस्प्लेट, पोळीभाजी, गरम दूध इ. वस्तूंची विक्री करून अनेक कुटुंबे उदर निर्वाह करत आहेत. आकुर्डीगाव, दत्तवाडी, विठ्ठल वाडी, निगडी, त्रिवेणीनगर, रुपीनगर, बिजलीनगर, दळवीनगर, कुदळवाडी, नेवाळेवस्ती, चिखली, भोसरी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी या भागात खाद्य विक्रीचा व्यवसाय जास्त चालतो.
 
याच परिसरात विविध कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कंत्राटी कामगार रहात आहेत. यातील बहुतांश कामगार हे बॅचलर आहेत. कामगार कामावरून सायंकाळी सात वाजता घरी येतात. संचार बंदी आणि जमावबंदीचे आदेश असल्यामुळे रात्री आठ वाजता त्यांना जेवण किंवा नाश्ता देणारी केंद्रे बंद झालेली असतात. निर्बंधामुळे विक्रीवर परिणाम होत आहे. उदर निर्वाह करण्याचे दुसरे साधन नाही, त्यामुळे उपासमार होऊ शकते. अशा परिस्थितीत आठ वाजेपर्यंत या व्यावसायिकांचा किरकोळ धंदा होत नाही आणि कामगारांना गैरसोय होत आहे.

त्यामुळे संचार बंदी आणि जमावबंदीच्या आदेशातून खाद्य विक्रेत्यांचे व्यवसाय वगळावेत, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा सिटू संलग्न हॉकर्स युनियने दिला आहे.
 
निवेदनावर गणेश दराडे, सचिन देसाई, अमिन शेख, स्वप्निल जेवळे, सुषमा इंगोले, निर्मला येवले, मुन्ना सरोज, संतालाल, सुवर्णा उंडे, संगीता ससाणे, विद्या चव्हाण, हमीदा कोरबू यांची नावे आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा