Breaking

सातारा : कराड मध्ये रुग्णालये हाऊसफुल्ल, रुग्णांना रस्त्यावर बसण्याची वेळ


कराड (सातारा) : करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण महाराष्ट्र होरपळला आहे. त्याला सातारा जिल्हाही अपवाद नाही. कराड तालुक्‍यात तर बेडच मिळत नसल्याने करोनाबाधितांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे. कराडमधील मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयांच्या प्रशासनाने हात वर केले आहेत. जे रुग्ण डिपॉझिट भरू शकतात, त्यांनाच दाखल करून घेतले जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


दरम्यान, उपचार मिळत नसल्याने ओंड, ता. कराड येथील करोनाबाधित महिला बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत रिक्षातच बसून होती. बेड न मिळाल्याने तिची प्रकृती गंभीर बनली होती. जिल्ह्यातील कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याचे या महिलेला सांगण्यात आले.


जिल्ह्यात एकूण तीन हजार 523 बेडस्‌ उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयात एक हजार 128 बेडस्‌ असून, त्यापैकी 95 व्हेंटिलेटर बेडस्‌ व ऑक्‍सिजनचे 728 बेडस्‌ आहेत. दोन उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण एक हजार 528 बेडस्‌पैकी 109 व्हेंटिलेटरचे व ऑक्‍सिजनचे एक हजार दहा बेडस्‌ आहेत. विविध करोना केअर सेंटर्समध्ये एकूण 867 बेडस्‌ आहेत. जिल्ह्यात एकूण 204 व्हेंटिलेटर बेडस्‌, 298 व्हेंटिलेटर नसलेले, ऑक्‍सिजनचे एक हजार 738 तर ऑक्‍सिजनविरहीत एक हजार 283 बेडस्‌ आहेत, अशी माहिती प्रशासनाने बुधवारी जाहीर केली आहे.


कोविड हॉस्पिटलची मान्यता मिळालेल्या खासगी हॉस्पिटल्से शासनाच्या आरोग्य योजनेला तिलांजली दिली जात आहे. योजनेतून कोविड रुग्णास उपचारांसाठी दाखलच करून घेतले जात नाही. या रुग्णांना शासकीय रुग्णालयांकडे पाठवले जात आहे.


वास्तविक कराड तालुक्‍यात कृष्णा, सह्याद्री, एरम, गुजर व कोळेकर या पाच रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांवरील उपचारांसाठी शासनाच्या योजना लागू आहे. या योजनेव्यतिरिक्‍त श्री व कराड हॉस्पिटलमध्ये कोविडबाधितांवर खासगीत उपचार केले जातात; परंतु योजनेचे नाव काढले की, रुग्णाला बेड नाकारला जातो. ओंड येथील एका करोनाबाधित महिलेला नातेवाईक उपचारासाठी सर्व रुग्णालयांमध्ये घेऊन गेले; परंतु त्यांना डिपॉझिट भरायला सांगण्यात आले.


बेड शिल्लक असतानाही प्रवेश नाकारल्याने या महिलेला बुधवारी सकाळपासून 8 तासांहून अधिक वेळ रिक्षात बसावे लागले. तिला प्रवेश मिळावा म्हणून नातेवाइक धडपडत होते. एरम हॉस्पिटलमधून त्यांना कॉटेज हॉस्पिटलला जायला सांगण्यात आले. तेथे जागा नसल्याने हॉस्पिटलच्या दारातच बसावे लागले. अखेर डिपॉझिट भरल्यानंतर एका खासगी हॉस्पिटलने प्रवेश दिल्याचे समजते.


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली


शासनाच्या पोर्टलनुसार उपलब्ध बेडस्‌ची संख्या हजारात आहे. त्यात कराडमधील पाचशेहून अधिक बेडस्‌ आहेत. याबाबतची माहिती रोज दिवसातून दोन वेळा सॉफ्टवेअरला भरायची आहे; परंतु ती भरली जात नाही. ऑडिटरकडून बेडस्‌ची तपासणी होत नसल्याचे समजते. कोविड हॉस्पिटलमध्ये शासनाच्या योजनेतून रुग्णांवर उपचार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा