Breaking
पळसन येथील साठ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तिस रस्त्यातच कवटाळले मृत्यूने !


सुरगाणा (दौलत चौधरी) :  पळसन येथे साठ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तिला मृत्यूने रस्त्यातच कवटाळले. आज (ता.१२) रोजी सकाळी दहा ते अकरा   वाजेच्या  सुमारास घडलेल्या या दुर्दैवी  घटनेने आदिवासी भागातील चिंता, भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

या बाबत कोरोना केअर सेंटरचे समन्वयक वैद्यकीय अधिकारी कल्पेश भोये यांच्याकडील मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती वावरपाडा येथून बुबळी येथील हाकेच्या अंतरावर असलेले प्राथमिक आरोग्य  केंद्र तसेच सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली तर कोरोना काढतात. या मानसिक  भीतीपोटी उपचारासाठी दाखल होण्याचे टाळून पळसन येथे खाजगी डॉक्टरकडे कोरोनाची तपासणी न करताच चांगले उपचार करतात म्हणून तीस किलोमीटर अंतरावरील पळसन येथे धाव घेतली मात्र मृत्युने त्याचा पाठलाग सोडला नाही. 

खाजगी डॉक्टरांनी रुग्णावर तात्पुरते उपचार करुन  कोरोनाची लक्षणे रुग्णांत आढळल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करीता पाठवले. तेथील वैद्यकीय अधिकारी कमलाकर जाधव यांनी  आक्सिजन मात्रा तपासणी केली असता केवळ चाळीस ते बेचाळीस पर्यंत आक्सिमीटरने नोंद झाली. तसेच कोरोनाची रॅपिड अँन्टीजन टेस्ट केल्याने ती पाॅजिटिव्ह आल्याने अखेर तो रुग्ण कोरोना बाधित आढळला .

त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेने सुरगाणा येथे पुढील उपचारासाठी पाचारण केले. परंतु कोरोनाची लागण होऊन सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटल्याने तसेच वेळीच उपचार  करण्याची वेळ हातची निघून गेल्याने रस्त्यातच कोरोनाने मृत्युला कवटाळले. 

रुग्णास कोविड सेंटर सुरगाणा येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिका-यांनी उतरिय तपासणी अंती मृत घोषित केले. मृतदेह प्रथम नगरपंचायतीकडे सोपविण्यात आला तद्नंतर प्लास्टिक मध्ये गुंडाळून निर्जंतुकीकरण करुन घरी न घेता अंत्यसंस्काराकरीता थेट स्मशानभूमीतच घेण्याच्या अटीवर सरपंच, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत अंत्य संस्कार करण्याच्या अटीवर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आदिवासी भागात भीती व चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यानंतर तात्काळ बुबळी येथील पथकाने वावरपाडा येथे धाव घेऊन कुटूंबातील सदस्यांची कोरोना टेस्ट केली असता कुटूंबातील काही सदस्य कोरोना पाॅजिटिव्ह आढळून आले. दोनच दिवसापुर्वी आमदा येथे एकाचा कोरोनाने मृत्यु झाल्याची ताजी घटना घडली होती. केवळ कोरोनाच्या भीतीपोटी वेळीच उपचार न केल्याने सर्व कुटुंबच समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत.

यावेळी कोविड सेंटरचे नोडल अधिकारी  डाॅक्टर  कल्पेश भोये म्हणाले की, " कोरोनाची लक्षणे आढळून येताच नागरिकांनी घाबरून न जाता आशा, परिचारीका, अंगणवाडी सेविका, मलेरिया वर्कर, आरोग्य सहाय्यक शिक्षक यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट करुन घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सुरक्षित अंतर ठेवून नेहमी मास्क वापरावा, वारंवार  हात धुवून सॅनिटायजरचा वापर करावा."


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा