Breaking

विशेष : पृथ्वी तापते आहे आणि आपण निवांत आहोत - प्रसाद कुलकर्णी


कोरोनाची दुसरी लाट वेग घेत असतानाच आणखी एक चिंताजनक बाब सरताना निदर्शनास आली. ती म्हणजे यंदाचा सरून गेलेला मार्च हा गेल्या १२१ वर्षातील सर्वाधिक तिसऱ्या नंबरचा उष्ण महिना ठरला आहे. मार्च महिन्यातील सरासरी कमाल तापमान ३२. ६५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.९५ अंश सेल्सियस इतके नोंद झाले आहे. यापूर्वी गेल्या बारा शतकात केवळ दोन वेळाच याहून कमाल तापमान जास्त होते. मार्च महिन्यामध्ये राजधानी दिल्लीत गेल्या शहात्तर वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ४०-४१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. भारतीय हवामान विभागाकडून प्रसारित झालेली ही माहिती अतिशय चिंताजनक आहे. मार्च महिनाच एवढा उष्ण असेल तर एप्रिल व मेमध्ये काय होणार याची कल्पनाच केलेली बरी. तापमानातील वाढ हा आता मानवी अस्तित्वाचा, जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा, पृथ्वीच्या समग्र पर्यावरणाचाच गंभीर प्रश्‍न बनला आहे. 


निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर संबंधात वेगाने अंतर पडू लागले आहे. त्यातूनच वैश्विक तापमान वाढ अर्थात 'ग्लोबल वार्मिंग' सुरू झाले आहे. त्याचे भयावह परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. वाढत्या तापमानाने हिवाळा कमी आणि उन्हाळा व पावसाळा जास्त कालावधीचा व तीव्रतेचा होतो आहे. अन्नधान्य दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मानवी अनारोग्य संख्यात्मक व गुणात्मक वाढत आहे. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी माणसाला घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे प्रमाण वाढले आहे. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यातच भांडवली अर्थानीतीने' आहे रे 'आणि' नाही रे 'यांच्यातील तफावतही वाढत चालली आहे. एकूणच व्यक्तीचे, व्यवस्थेचे मानसिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक कोरोनिकरण होत जाणे हे चांगले लक्षण नाही. आपण आत्ता सावरलो नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही हे निश्चित. पृथ्वी तापत असताना माणसाचे निवांत राहणे परवडणारे नाही. निसर्गाशी मैत्री करणे आणि त्याचे नियम समजून घेणे हे समस्त मानव जातीसाठी तिच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे.

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा