Breaking

विशेष लेख : पैसे देऊनही पाणी मिळणार नाही, ऑक्सिजन सारखे जल संकट निर्माण होईल - क्रांतिकुमार कडुलकर


कोरोना महामारीने प्राणवायूचे (ऑक्सिजन) महत्व शंभर वर्षांनी जाणवले आहे. आता शहरातील पाणी आणि त्याचे महत्व अद्यापही लोकांना कळलेले नाही.

 

पाणी टंचाई ही पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरांची महत्त्वाची डोकेदुखी बनले आहे. विशेषत: पाण्याला जास्त मागणी असते तेव्हा, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी पुरवठ्यांची समस्या शहरांमध्ये अधिकच बिकट बनते. अशा परिस्थितीत झोपडपट्टी आणि अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गरिबांना आणि प्रचंड कर्जे काढून सदनिका घेतलेल्या सोसायटीमधील लोकांना त्यांची सर्वाधिक झळ बसते. या संकटावर मात करण्यासाठी पर्जन्य संचयनाचा म्हणजेच पावसाच्या पाण्याचा (रेनवॉटर हार्वेस्टिंग) कसा वापर करता येईल, याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे.

 

शहरांना पाणी पुरवणाऱ्या धरण क्षेत्रात कौटिल्याच्या काळात जेव्हडा पाऊस पडत होता तेव्हढा आजही पडत आहे. फक्त त्याच्या मोसमात बदल झालेला आहे. चंगळवादी आणि आधुनिक जीवनशैलीमुळे पाण्याचा अनावश्यक वापर वाढला आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर होत नाही आणि पैसे दिले की हजारो कार, धुऊन मिळतात. जलसाक्षरता आणि जल संवर्धन याची जाणीव नसल्यामुळे मनपाचे पाणी ३० टक्क्यांहून जास्त गळती होऊन वाया जाते. लाखो घरामध्ये नळ लिकेज असते. इंद्रायणी, पवना या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सर्वत्र बेल लगाम शहरीकरण झाल्यामुळे धरणाच्या मर्यादा संपल्या आहेत. पाणी कोठूनही रेल्वेने आणले तरीही ते परवडणार नाही.

 

सरकार पाणी फुकट देत नाही आम्ही पैसे मोजतो, या अहंकारामुळे भविष्यात मनपा पाणी कुठून आणून देईल याचा विचार नागरिक म्हणून कोणी करत नाही.


पुढील पाच वर्षात शहराची लोकसंख्या ३५ कोटीहून  जास्त असणार आहे. याचे भान लोक प्रतिनिधींनी लक्षात ठेवले पहिजे. ग्रामीण भागाचे पाणी जास्त दिवस पळवून आणले तर प्रचंड असंतोष निर्माण होईल. नव्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण शेती व्यवस्था उध्वस्त झाल्यामुळे दरवर्षी एक लाखाहून कंगाल, बेरोजगार लोक शहरात येत आहेत. २००३ साली चेन्नई, हैद्राबाद, बंगळूर या मोठ्या शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कायदा करून सरकारांनी बांधकाम पूर्णत्वाचे दाखल्याला हार्वस्टिंगची अट घातली.

 

अमेरिका, चीन, भारत, रशिया या देशांमध्ये युद्धासाठी आवश्यक असलेले इंधन साठवून ठेवले जाते. पिंपरी चिंचवड शहरात प्रचंड पाऊस पडतो, पूर येतो. बहुमजली इमारतीत राहणाऱ्या उचभ्रू आणि समृद्ध वर्गाला सुद्धा टँकरचे पाणी विकत घ्यायची वेळ आलेली आहे. टाटा मोटर्स सारख्या कंपनीने खूप वर्षांपूर्वी मोठा तलाव विकसित करून पाण्याची साठवण केली आहे. औद्योगिक वापरा नंतरचे पाण्याचा तेथे पुनर्वापर होत आहे.

 

रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या सोसायट्या, संस्थांना विशेष सवलत देऊन भविष्यकाळात ऑक्सिजन सारखी पाणी टंचाई येऊ नये, यासाठी जल तज्ज्ञांची मनपाने मदत घ्यावी. शहरातील प्रत्येक प्रभागात सार्वजनिक जागेमध्ये मोठे शोष खड्डे, जलसाठ्याची केंद्रे उभारावीत. रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभ्या करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना यावर्षी परवाने देऊन त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे.

 

पाणी टंचाईमुळे ऑक्सिजन तुटवड्या सारखी पाणीबाणी आली तर अराजक निर्माण होऊ शकते.

 

- क्रांतिकुमार कडुलकर, कार्यालयीन सचिव

- माकप, पिंपरी चिंचवड

- 8888552300

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा