Breaking


पाकिस्तानात साखरेने गाठली शंभरी; सट्टेबाजीमुळे वाढले दर


पकिस्तान : पाकिस्तानात आटा, भाजी, अंड्यानंतर साखरेचे दरही वाढले आहेत. राजधानी इस्लामाबादसह देशभरात साखर प्रती किलो १०० पाकिस्तानी रुपये (भारतीय ४९रुपये) दराने विकली जात आहे. रमजानचा महिना सुरू झाल्याने इम्रान सरकारने फोडलेल्या या महागाईच्या बाँबने पाकिस्तानातील सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. 


रविवारी एका लाईव्ह टीव्ही कार्यक्रमात इम्रान खान श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यावेळी एका महिलेने फोन केला. देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर मुळीच कमी होताना दिसत नाहीत. म्हणूनच तुम्ही तुमचे आश्वासन पाळले पाहिजे. महागाई कमी करावी. हे करता येत नसेल तर घाबरू नका, असे तुम्ही सांगता. मग आता तरी जनतेला घाबरण्याची परवानगी देऊन टाका, अशा शब्दांत इम्रान यांना या महिलेने खडे बोल ऐकवले. त्यावर इम्रान यांनी स्मित हास्य करत समजावण्याचा प्रयत्न केला.

सरकारचे लक्ष महागाईवर आहे. त्यावर लवकरच काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. इम्रानच्या सल्लागार शहजाद अकबर यांनी साखरेच्या वाढत्या दराचे खापर सट्टेबाजांवर फोडले आहे. देशातील साखरेचा तुटवड्याची ही अफवा आहे. त्यामुळेच साखरेचे दर वधारले आहेत, असा दावा शहजाद यांनी केला. पाकिस्तानची केंद्रिय तपास संस्था (एफआयए) अनेक लोकांवर कारवाई करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पाकिस्तान काही दिवसांपासून भारतातून साखर आणि कापूस खरेदी करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. मात्र अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा