Breaking

सुरगाणा : भदर येथील शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू


सुरगाणा (दौलत चौधरी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भदर येथील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेला आठ वर्षीय विद्यार्थी योहान शिवा वार्डे हा मित्रांसोबत तलावाकडे अंघोळीला गेला असताना पाय घसरून पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (ता.१० एप्रिल) घडली आहे.


सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास योहान अजून  घरी का परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधा शोध सुरु केली असता कोणीतरी सांगितले की, दुपारच्या वेळी काही मुले अंघोळीसाठी तलावाकडे गेली होती. पालकांनी तलावाकडे शोध घेतला असता तो मृतावस्थेत तलावात आढळून आला. तलावाच्या  भरावाची उतरण असल्याने तो पाय घसरून पाण्यात पडला पण त्यास खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून अंत झाला. योहानचे आईवडील  मोलमजुरी निमित्ताने त्यास आजीकडे सोपवून पिंपगाव भागात गेले होते. 


पोलिस पाटील मोहन गांगुर्डे यांनी भ्रमणध्वनी द्वारे हि माहिती पोलिसांना दिली. त्यास तात्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. आकस्मिक मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे  अंघोळीसाठी गेलेल्या दोन बालकांचा याच तलावात  बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा