Breaking
जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा


जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाण्याच्या जलस्रोतांनी दर वर्षी प्रमाणे या वर्षी मार्च महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. तर, काही गावांमध्ये पाणीसाठे कोरडेठाक पडल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. 


कुकडी खोरे, खिरेश्वर खोरे, हिवरे पठाराचा परिसर या तीन खोरी मुसळधार पडणाऱ्या पावसासाठी परिचित आहेत. पावसाळ्याच्या चारही महिन्यामध्ये या परिसरात धो - धो पाऊस पडतो. या पवासामध्ये येथील विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य जलस्रोत तुडुंब भरुन वाहतात. परंतु भात कापणीस सुरुवात झाली की अनेक गावांना पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते.

आदिवासी भागातील नागरिकांचा पाण्यासाठीची वणवण वर्षानुवर्षे चालूच आहे. मागील कित्येक वर्षे या भागाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. परिणामी, या भागातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. 

तालुक्यातील कोपरे, मांडवे, देवळे, घाटघर, खटकाळे, सितेवाडी, नळावणे, मुथाळणे, जांभुळशी, आंंबे, हातविज, हिवरे, हडसर, उसराण या गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. इतर गावांमध्येही वापराच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते.
 
कुकडी खोऱ्यातील देवळे, घाटघर, पेठेचीवाडी, कवटेवस्ती, खटकाळे, उसराण या गावांच्या शेजारी माणिकडोह येथील "शहाजी सागर जलाशय" हे धरण असूनही या लोका़च्या घशाला कोरड कायमचीच पडलेली आहे. "धरण उशाला अन् कोरड घशाला" अशी आवस्था आहे. या गावांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. माणिकडोह धरणाचे पाणलोटक्षेत्र व धरणाचा फुगवटा या गावांच्या हाकेच्या अंतरावर असूनही या गावांतील आदिवासी बांधवांना वाटीने झऱ्यातून पाणी टिपावे लागत आहे.

निवडणूका आल्या की आश्वासनांची खैरात 

निवडणूका आल्या की लोकप्रतिनिधी आश्वासनांची खैरात केली जाते. परंतु पाच वर्षे जनतेचा विसर पडत असल्याचे दिसत आहे. येथील समाज वर्षानुवर्षे मुलभूत प्रश्नांपासून वंचित आहे. लोकप्रतिनिधी फक्त प्रसिद्धीच्या झोतात दिसता, परंतु मुलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले जात नसल्याची चर्चा आता लोक करु लागले आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा