Breaking

साठेबाजाला तुम्ही का वाचवता ? नवाब मलिक यांचा गंभीर आरोप


मुंबई : 'एका साठेबाजाला वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन विरोधी पक्षनेते व दोन आमदार स्वत: पोलीस ठाण्यामध्ये जातात, याचा अर्थ यामागे नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा महाराष्ट्राला मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न आहे,' असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 


ब्रुक फार्मा कंपनीनं रेमडीसीवीरचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर बीकेसी पोलिसांनी काल कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे समजताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे रात्रीच्या वेळी थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीनं भाजपला घेरलं आहे. 'राज्यातील भाजप का घाबरलाय? भाजप साठेबाजाची वकिली का करतोय याचं उत्तर जनतेला द्यायला हवं, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

केंद्र सरकारनं रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांनी राज्य सरकारशी संपर्क साधला होता. आमच्याकडे रेमडेसिविरचा साठा आहे तो विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. डोकानिया यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली होती, असा दावाही मलिक यांनी केला आहे.

ब्रुक फार्मा कंपनीकडं रेमडेसिविरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या आधारावर पोलिसांनी डोकानिया यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, एफडीएने रात्री दहा वाजता परवानगी दिलेल्या परवानगीची कॉपी दाखवल्यावर त्यांना सोडून देण्यात आलंय. पोलिस यंत्रणा जनतेसाठी काम करतेय. काळाबाजार रोखण्यासाठी काम करतेय. साठा असेल तो जप्त करून लोकांना दिला पाहिजे या भूमिकेतून काम करतेय. पण डोकानियांना ताब्यात घेतल्यानंतर भाजप का घाबरलाय? देवेंद्र फडणवीस डोकानियांचं वकीलपत्र घेऊन त्यांची बाजू का मांडत होते? राजेश डोकानियाबरोबर भाजपचे काय संबंध आहेत, याचा खुलासा भाजपनं करावा, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा