Breaking
अकोलेतील आरटीपीसीआरचे 350 अहवाल प्रलंबित, तातडीने मिळण्याची मागणी


अकोले
 (अहमदनगर) : अकोलेतील आरटीपीसीआरचे 350 अहवाल प्रलंबित आहेत, प्रलंबित अहवाल तातडीने मिळण्याची मागणी राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे सुशिलकुमार चिखले यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.


चिखले म्हणाले की, कोरोना घशातील श्राव चाचणी (आरटीपीसीआर) अहवाल नगरहून अकोलेपर्यंत पोहचण्यास तीन ते चार दिवस लगत असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीचे जवळपास साडेतीनशे अहवाल पेंडिंग आहेत. सकाळी स्त्राव घेतला की सायंकाळी नगरला पोहोचतो. तेथे नंबरनुसार चाचणी होते आणि तिसऱ्या दिवशी उशिरा अहवाल अकोलेत येतो.

रुग्णपर्यंत अहवाल पोहोचण्यास चौथा दिवस उजाडतो. त्यामुळे सबंधित रुग्णास तो बाधित आहे किंवा नाही हे समजत नाही. तो बाधित असल्यास अहवाल येईपर्यंत बाधित रुग्णगावात, बाजारपेठेत फिरत राहतो. यातून त्याच्या संपर्कात येणारेही बाधित होतात व कोरोना रुग्ण संख्येचा आकडा वाढतो. आरटीपीसीआर चाचणी यंत्रणा तालुका स्तरावर उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे. 

दोन तीन आठवड्यापूर्वी नगरवरुन रिपोर्ट यायला पाच - सहा दिवस लागत होते. आता तीन दिवसात रिपोर्ट येतात. पण सुट्टी आडवी आली की अहवाल दिरंगाईने प्राप्त होतात. चाचणीसाठी स्त्राव घेतल्यानंतर संबंधिताच्या हातावर शिक्का मारायचा व त्यास जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात ठेवायचे, असा प्रस्ताव आला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू दिसत नाही.  कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीच्या चाचण्या वाढवल्यास संसर्ग कमी होईल आणि वेळत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आरटीपीसीआर अहवाल तातडीने मिळण्याची सुविधा सुरु करावी, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा