Breaking
अंगणवाडीतील पोषण आहार वितरण व्यवस्था व्हावी पारदर्शी - किसान सभेची मागणीपुणे : अंगणवाडीतील पोषण आहार वितरण व्यवस्था हि पारदर्शी व्हावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीने आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना,महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले आहे.


भारत सरकारने १९७५ साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाड्या चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे,गरीबातल्या गरीब बालकांचं आरोग्य सुधारणं हा होता.आरोग्यासोबतच ३ ते ६ वयोगटातील मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणं हे देखील अंगणवाड्यांना साध्य करायचं होतं.केवळ ० ते ६ वर्षांच्या बालकांच्या आरोग्यासाठी काम करून चालणार नाही तर बाळाला जन्म देणाऱ्या आईची देखील काळजी घेतली पाहिजे यासाठी गरोदर आणि स्तनदा मातेसाठी या योजनेचा विस्तार झाला. 


आज मागास ग्रामीण, शहरी व आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या बालक आणि मातांसाठी अंगणवाडीच्या माध्यमातून  सेवा पुरवल्या जातात.बालमृत्यू रोखण्यासाठी आणि कुपोषणाचा दर कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली गेली.भविष्यातील भारत सुदृढ व निरोगी आणि बुद्धिवंत व्हावयाचा असेल तर कुपोषणमुक्तीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यामुळे अंगणवाडीतील पोषण आहार वितरण व्यवस्था,लाभार्थी निवड प्रक्रिया ही अधिकाधिक पारदर्शी व उत्तरदायी होणे गरजेचे आहे.ग्रामीण,आदिवासी भागात ही  योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे,परंतु अनेक ठिकाणी या पोषण आहार वितरण विषयक सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आढळून आलेल्या दिसून येतात.काही ठिकाणी ठेकेदार व वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने काही चुकीचे प्रकार झालेले आहे.ही योजना कुपोषणमुक्तीसाठी व एकूणच लहान बालकांचे उज्वल भवितव्य घडवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे, त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जनतेचा सहभाग वाढविणे गरजेचा आहे व त्यासाठी अधिकाधिक माहिती सामान्य जनतेला उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.


रोजगार हमी कायद्याच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीसाठी रोजगार हमी विषयक असलेले वेबपोर्टल हे अधिकाधिक उपयुक्त ठरत आहे.यासाठी  महिला व बालकल्याण विकास विभागाने अशा प्रकारचे वेबपोर्टल केल्यास आपल्या योजनांची परिणामकारकता व विश्वसनीयता अधिक वाढेल असे संघटनेने म्हटले आहे.


या पार्श्वभूमीवर संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत - 

१.आपल्या महिला व बालकल्याण विकास विभागाने एक वेब पोर्टल तयार करून, कोणत्या गावात,कोणत्या महिन्यात,कोणत्या लाभार्थ्याला,कोणता शिधा, किती प्रमाणात वितरीत केला आहे,याची इत्यंभूत माहिती उपलब्ध करून द्यावी ही माहिती राज्यभरातील नागरिकांना खुली असावी. 


२.पोषण आहाराबरोबरच अंगणवाडीमध्ये इतर ही सेवा-सुविधा पुरविल्या जातात,त्यांची ही माहिती व तपशील या वेब पोर्टलवर उपलब्ध असावा.


३. अंगणवाडी ही ग्रामविकासातील व समाजविकासातील अत्यंत महत्वपूर्ण संस्था आहे, त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी यांचे असलेले विविध प्रश्न सोडवून, अंगणवाडीतील भौतिक सेवा-सुविधा याविषयी तातडीने पावले उचलावीत. 


सदरील मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष ऍड.नाथा शिंगाडे,उपाध्यक्ष - अजित अभ्यंकर,शेतमजूर युनियन च्या नेत्या किरण मोघे,किसान सभेचे पुणेजिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे,विश्वनाथ निगळे,अशोक पेकारी,राजू घोडे, अमोद गरुड,संतोष कांबळे, लक्ष्मण जोशी यांनी मेलद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजना,महाराष्ट्र राज्याचे आयुक्त  इंद्रा मालू यांना पाठवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा