Breakingबीड : मोहा येथे कोव्हीड केअर सेंटरचे उदघाटन


परळी वैजनाथ : मोहा येथील कोविड सेंटर हे आदर्श असेल असे मत मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी व्यक्त केले. 


ते कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मानवलोक, आरोग्य विभाग बीड व महाराष्ट्र शिक्षण संस्था, मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विद्यालय, मोहा या ठिकाणी कोरोनाच्या सौम्य रुग्णासाठी व विलगिकरण कक्ष उपलब्ध असणारे सुसज्य असे 50 बेडचे कोविड केयर सेंटर चे उदघाटन प्रसंगी बोलत होते.पुढे बोलताना लोहिया म्हणाले कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र शिक्षण संस्था, मोहा व मानवलोक यांची कार्यपद्धती एकच असून आपत्ती काळात सदैव मदतीचा हात पुढे करणाऱ्या ह्या संस्था आहेत. मानवलोकच्या वतीने या कठीण प्रसंगात बीड जिल्ह्यामध्ये 18 सेंटर मध्ये 1000 बेड उपलब्ध करून कोरोना रुग्णांची काळजी घेण्याचे काम करीत असताना दुःख होत असून हे ही दिवस निघून जातील या आशेवर मानवलोक ही संस्था कार्य करत आहे. या कोरोनाच्या काळात विलगीकरण, मास्क, सैनीटायझर व स्वच्छता अतिशय महत्त्वाची असून सर्वांनी या गोष्टी लक्षात घ्याव्यात तसेच संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मानवलोक तयारी करून आहे, असे मत मानवलोक चे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी केले.यावेळी तहसीलदार सुरेश शेजुळ म्हणाले, मोहा येथील कोविड सेंटरमूळे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल. शहरी भागात कोरोना  रुग्णांची संख्या नियंत्रणात असून ग्रामीण भागात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील घरे,घरामध्ये वास्तव्यास असलेले सदस्य या सर्वांचा विचार करता एखाद्या रुग्णास कोरोनाची बाधा झाल्यावर एकत्र कुटुंब पद्धती असल्याने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा वेळी संशयित किंवा रुग्ण सहवाशीत व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवल्यास गावातील कोरोनाची साखळी तोडण्यास मोठा फायदा होईल. कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव ऍड. अजय बुरांडे म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोना या आजाराविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत या आजाराची भीती ही खूप मोठ्या प्रमाणात असून मोहा गाव परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसताच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून योग्य ते उपचार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार करून घ्यावेत. कोणताही आजार अंगावर काढू नये मोहा गाव व परिसरातील सर्व नागरिकांची योग्य ती परिपूर्ण काळजी घेण्यासाठी या ठिकाणी हे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून या कोविड सेंटरमध्ये सर्व काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी या आजाराविषयी कोणतीही भीती बाळगण्याचे काम नाही.


सर्व कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करीत मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे, प्रतिष्ठानचे सचिव ऍड. अजय बुरांडे, सिरसाला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकसिंगे, मोहा गावचे सरपंच पांडुरंग शेप, यांच्यासह मानवलोकचे व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाचे वैद्यकीय अधिकारी, आजी-माजी पंचायत समिती सदस्य, गाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक राजमाने तर आभार विशाल देशमुख यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा