Breaking
मोठी बातमी : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका, "या" तारखेला इशारामुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका अजूनही कायम आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे, मात्र हे वादळ कुठल्या दिशेनं जाईल हे आत्ताच सांगता येणार नाही.


अरबी समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात दाट ढग जमा झाल्याचं इन्सॅट उपग्रहानं पाठवलेल्या ताज्या प्रतिमेतून स्पष्ट होतंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 तारखेला अरेबियन समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रुपांतर होईल.


मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते सांगतात, "16 तारखेला या चक्रीवादळाचा जोर वाढून महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याचा प्रभाव जाणवेल. तिथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे पाहायला मिळतील. या हवामानाचा परिणाम मध्य महाराष्ट्रावरही पाहायला मिळेल."


या दरम्यान अरबी समुद्रानं रुद्रावतार धारण केलेला दिसेल. वाऱ्याचा वेग 40 ते 50 ताशी किलोमीटर असेल आणि त्याची तीव्रता ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढूही शकते. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. ज्या बोटी समुद्रात आहेत, त्यांनी लवकरात लवकर परत यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.


इथून चक्रीवादळ पश्चिमेला ओमानच्या दिशेनं सरकू शकतं. ते पूर्वेला सरकलं, तर आधी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशात त्याचा प्रभाव जाणवू शकतो आणि तिथून ते पुढे उत्तरेला गुजरात किंवा दक्षिण पाकिस्तानकडे सरकू शकतं. याविषयीची निश्चित माहिती 14 मे नंतरच कळू शकेल.


यंदाच्या मोसमातलं हे या परिसरातलं पहिलं चक्रीवादळ ठरू शकतं. या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर त्याला 'तौकते' हे नाव दिलं जाईल. म्यानमारनं सुचवलेलं हे नाव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा