Breaking


रेशन दुकानात मोफत धान्य वाटपात काळाबाजार - अपर्णा दराडे


मापात पाप केला जात असल्याचा आरोप 


पिंपरी चिंचवड : रेशन दुकानात मोफत धान्य वाटपात मापात पाप केला जात असल्याचा आरोप अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शहर सचिव अपर्णा दराडे यांनी केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात असल्याचेही म्हटले आहे.


अपर्णा दराडे म्हटल्या की, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रेशन दुकानदार कार्ड धारकांना शासन आदेशाप्रमाणे माणसी 4 किलो तांदूळ आणि 6 किलो गव्हाचे मोफत वितरण करत नसल्याचा तक्रारी येत आहेत.


कोरोना काळात मे आणि जून महिन्याचे रेशन मोफत आणि पूर्ण देण्याचा आदेश असतानाही कार्डवरील धान्य मापात पाप करून दिले जातेय. रेशन दुकानदार कोणतीही पावती देत नाहीत. बहुसंख्य घरेलू महिला कामगार, रिक्षाचालक, पथारीवाले यांना शासन आदेश समजत नाही. रेशन दुकानदार नियमाप्रमाणे कोणताही लक्षात येईल, असा सूचना फलक लावत नाहीत.


शहरातील बिजलीनगर, दळवीनगर, घरकुल, हरगुडे वस्ती, चिखली, मोरेवस्ती, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, आकुर्डी, ओटा स्कीम येथील वस्तीत अन्नधान्य पुरेशे वितरित होत नाही. अनेक दुकानदाराकडे अतिरिक्त तांदूळ आणि गहू शिल्लक राहतो, सरासरी 20 रुपये किलो दराने तांदूळ आणि 18 रुपयाने गव्हाचा काळाबाजार सुरू आहे.


रेशनच्या या तांदळाचा उपयोग इडली, डोसा, उत्तपा आणि भाकरीसाठी केला जातो. अनेक हॉटेल आणि स्नॅक्स सेंटरना काळ्याबाजारातील या धान्यामुळे सुगीचे दिवस येत आहेत. पिंपरी चिंचवड मधील अन्नधान्य वितरण अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा