Breaking
कॉम्रेड आर.बी. मोरे : दलित व कम्युनिस्ट चळवळीचा सशक्त दुवा


मे ११ कॉम्रेड रामचंद्र बाबाजी मोरे (कॉ.आर.बी.मोरे) यांचा स्मृती दिवस. कॉम्रेड मोरे यांचे जीवन, विचार आणि कार्य दलित कम्युनिस्ट चळवळीला मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांचा जन्म महाड तालुक्यात एका छोट्या गावात दलित कुटुंबात झाला . कुटुंब अत्यंत गरीब होते. अशा परिस्थितीत आर्थिक आणि जातीय चटके सहन करीत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. महाड येथील शाळेत त्यांना भेदभावाची वागणूक  मिळत होती. वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतले.अस्पृश्यतेचे चटके सहन करत त्यांनी दलित मुक्तीसाठी कार्य करण्याचा  निर्धार केला.


19 सप्टेंबर 1923 रोजी  मुंबई प्रदेश सरकारने सार्वजनिक विहिरी, तलाव, पाणवठे, कचेऱ्या, दवाखाने इत्यादी सर्व अस्पृश्यांसाठी खुले राहतील असा आदेश जारी केला. या आदेशाने कॉम्रेड मोरे आनंदी झाले. कारण महाड येथील दलितांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होता.त्यांनी या आदेशाची माहिती देण्यासाठी एक सभा आयोजित केली. सभेमध्ये त्यांनी एक निर्णय घेतला की,महाड येथे एक परिषद घेणे आणि या परिषदेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बोलावणे. म्हणजे महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह करण्याची मूळ कल्पना काॅम्रड मोरे यांची होती. त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात साकार केली. त्यांनी महाड तालुका आणि रायगड जिल्हा फिरून हजारो जनतेला संघटित केले.

कॉ. मोरे आणि डॉ.आंबेडकर यांचे संबंध फारच घनिष्ठ होते.कॉम्रेड मोरे यांची मार्क्सवादावर प्रचंड निष्ठा होती. दलित मुक्ती आणि समाजाचे  प्रश्न आपण भांडवली आणि सरंजामी समाजरचनेत सोडवू शकत नाही. त्यासाठी कामगार शेतकरी समाजसत्तावादी वर्गीय चळवळीशी नाते जोडावे लागेल, याची त्यांना जाणीव होती. म्हणून ते कम्युनिस्ट पक्षात सामील झाले.

त्यांच्या या तत्वनिष्ठेचे डॉ.आंबेडकरांनी वेळोवेळी कौतुक केले होते. एकदा डॉ.आंबेडकर यांची सभा मुंबई सुरू होती. कॉ.मोरे आपल्या मित्रांसोबत सभा ऐकण्यासाठी गेले आणि पाठीमागे उभा राहून सर्व ऐकत होते. हे डॉ.आंबेडकरांनी पाहिले आणि त्यांना व्यासपीठावर आग्रहाने बोलून घेतले. यावेळी डॉ.आंबेडकर म्हणाले की,मला ज्यांनी राजकारणात आणले त्या पैकी हे एक आहेत. अस्पृश्यतेविरुद्धची लढाई  ही एकट्या अस्पृश्यांची नाही तर त्या जोडीला स्पृश्यातील गरीब जनतेची जोड आवश्यक आहे. म्हणून त्यांनी भाई अनंतराव चित्रे, श्यामराव परुळेकर, सुरबानाना टिपणीस, नारायण नागू पाटील यांच्या सहकार्याने 23 एप्रिल 1929 रोजी चिपळूण येथे डॉ.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी परिषद  घेऊन खोती व वेठबिगारी पद्धतीविरुद्ध आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकरी शेतमजूर वर्गातील मराठा, कुणबी, अग्री, ओबीसी, दलित एकत्र आले होते. हा लढा बरेच वर्षे चालू राहिला. शेवटी सरकारला शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. कॉ.मोरे हे कुलाबा जिल्हा शेतकरी संघाचे सेक्रेटरी होते. खोतीविरोधी लढ्यामुळे आणि स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे त्यांना कुलाबा, ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले होते. त्यांच्या 'आव्हान' या पाक्षिकावर बंदी घातली होती.      

त्यांनी मुंबईमध्ये येऊन कामगारांना संघटित करण्याचे काम जोमान सुरू केल. कापड गिरणी कामगार  आणि रेल्वे कामगारांना संघटित केले. कामगारमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सभासद वाढवले आणि तेथूनच कॉ. मोरे यांनी  कम्युनिस्ट जीवनाची सुरुवात केली होती. कॉ.मोरे हे कम्युनिस्ट पक्षात सामील झाले तरीही त्यांनी जातीअंताची लढाई शेवटपर्यंत लढत होते.या प्रश्नांकडे पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी केंद्रीय कमिटीला 1953, 1957आणि 1964 मध्ये, असे तीन वेळा सविस्तर प्रस्ताव पाठवले होते. 

लोकशाही क्रांती यशस्वी करायची असेल तर सुरुवातीला जातीअंताची लढाई लढावी लागेल असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे असे ते म्हणत. कार्यकर्ता शिक्षण आणि जनतेचं प्रबोधन यावर त्यांच्या फार भर होता, म्हणून त्यांनी साप्ताहिक जीवन मार्ग सुरू केले होते. आज ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपञ आहे.  सामाजिक सर्वहारा आणि आर्थिक सर्वहारा यांची एकजूट करण्याचा त्यांचा अखंड प्रयत्न राहिला होता. म्हणून काम्रेड मोरे कम्युनिस्ट चळवळीचे खरे 'दीपस्तंभ' आहेत. त्यांच्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन.

कॉ.अण्णा सावंत, जालना

(लेखक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा