Breakingविद्रोही सांस्कृतिक चळवळीचा दत्ता जाधवही अखेर करोनाने गेला! - सुबोध मोरे


दत्ता जाधव गेला त्याला काल एक महिना झाला. दि. २३ एप्रिलला तोही करोनाने गेला. तो गेल्याची बातमी आम्हा जवळच्या मित्रांना कुणालाही लगेच कळली नाही. काल माझा नाट्य कलावंत मित्र अनिल तांबे याचा एक जुना व्हाटसप मेसेज, माझ्या आजारपणा नंतरचे जुने मेसेज पाहताना दि. २३ एप्रिलचा मेसेज वाचण्यात आला," आपला नाटकातील मित्र दत्ता जाधव गेला. " हा मेसेज वाचून मला धक्काच बसला व कन्फ्युजही झालो. कारण दत्ता जाधव नावाचे माझे दोन मित्र आहेत व दोघेही नाट्य कलावंत. एक शिरीष हाटे सोबतच्या मुंबई टेलिफोन नाट्य ग्रुपचा व दूसरा बी. ए. आर. सीत नोकरी करणारा व सिद्धार्थ कॉलेज च्या समीर भोळे, अनिल तांबे, यांच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये एके काळी सक्रीय असलेला. लगेच अनिलला फोन केला, तो म्हणाला सिद्धार्थ चाच दत्ता जाधव गेला. 


‌या दत्ता ला मी पुर्वी कधीतरी एकांकिका, नाट्य स्पर्धा मध्ये भेटायचो, पण तो माझ्या अधिक जवळ आला तो १९९९साली तथाकथित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या  ब्राम्हण्यवादी, भांडवली,साम्राज्यवादी आणि पुरुषसत्ताक मूल्यांच्या विरोधात ७ फेब्रुवारी ला धारावीत भरलेल्या ऐतिहासिक पहिल्या, "विद्रोही मराठी साहित्य संमेलनात" या संमेलनाच्या पुर्व तयारीत अनेक उत्साही तरुण कार्यकर्ते, कलावंत, माहीमच्या शे. का. प. कार्यालयात मिटींगला हजर रहात, दत्ताही त्यात असे. हे संमेलन दत्ता सारख्या अशा अनेक उत्साही कार्यकर्ते, कलावंत, तरुण कवी, साहित्यिक यांच्या संमेलनासाठी निधी जमा करण्या पासून ते स्वयंसेवक म्हणून राबण्या पर्यंतची जी अथक मेहनत घेतली त्यामुळेच खर्या अर्थाने यशस्वी झाले. त्यावेळी शिवसेना-भाजपा सत्तेवर होती व शिवसेनेने विद्रोही संमेलननाला उघड विरोध केला होता. त्यामुळे ते आव्हान स्वीकारुन विद्रोही साहित्य संमेलन धारावीत यशस्वी करायचेच असा चंगच कार्यकर्त्यांनी बांधला होता. 


तरुणांच्या उत्साहला नवं उधाण आलं होतं. हिंदीतील प्रगतिशील कवी, चिंतक, गजानन माधव मुक्तिबोध यांचे गाजलेले विधान, "अब, अभिव्यक्ती के खतरे  उठानेहीं होंगे, तोडनेही होंगे मठ और गढ सब" हे विद्रोही साहित्य संमेलनाचे घोषवाक्य गाजले होते. या विद्रोही साहित्य संमेलनासाठीच शाहीर संभाजी भगत याने, "हे पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही.. जीथे जिंदगी राबते, यांची लेखणी पोचत नाही.. " हे नवं खास गाणे लिहिले होते. जे नंतर खूप गाजले! 


‌या संमेलना नंतर" आम्ही सर्व सांस्कृतिक, सामाजिक संघटनांच्या प्रमुख कार्यकर्ते-कलावंत, तरुण साहित्यिक यांनी ठरविले की याला संघटनात्मक रुप द्यायचे आणि त्याप्रमाणे "विद्रोही सांस्कृतिक चळवळ" या राज्यव्यापी संघटनेची स्थापना करण्यात आली आली. यात नंतर दत्ताही सक्रिय होता. दत्ताचे वैशिष्ट्ये हे होते की तो विद्रोही साहित्य संमेलनाच्या, सांस्कृतिक चळवळीच्या, वर्तमानपत्र, मासिकात ज्या वेळोवेळी बातम्या, लेख प्रसिद्ध व्हायचे तो फाईल मध्ये तारखेवार छान कात्रणे करून संकलन करायचा. 


पहिल्या संमेलना नंतर, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे मुंबईत पहिलाच कार्यक्रम धारावीतील कबीरपंथी लोक गायकांना घेऊन, दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात "कबीर जयंती चा कार्यक्रम केला, ज्यात हिंदीतील अभ्यासक आत्माराम हा प्रमुख वक्ता होता. आणि नंतर १ ऑगस्ट २००० ला, लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने, पहिलाच "विद्रोही शाहीरी जलसा" चा भव्य कार्यक्रम दादरच्या छबिलदास नाट्यगृहात घेतला होता. या शाहीरी जलशात, शाहीर आत्माराम पाटील, निवृत्ती पवार, शाहीर चंदू भरडकर, शाहीर शेख जैनू चांद, केशर जैनू चांद, शाहीर विठ्ठल उमप, विलास जैतापकर, कृष्णकांत जाधव, सुरेश जाधव, मनोहर वळंजू मास्टर निशांत शेख आणि अर्थात संभाजी भगत, अविनाश कदम, शिवराम सुखी, दीपक पवार, सतीश पहुरकर हे सारे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे शाहीर यांनी अण्णा भाऊ साठे, अमर शेख, दत्ता गव्हाणकर, गद्दर, चेराबंडा राजू, वामनदादा कर्डक, शाहीर विलास घोगरे यांची गाजलेली गाणी जोषपुर्ण आवाजात  गायली. त्यावेळचा म. टाइम्सचा उपसंपादक संजीव साबडे यानेही गाणे गायले. 


आजचा दिव्य मराठीचा फिचर संपादक, प्रशांत पवार तेव्हा ढोलकी, नाल वाजवित होता. (तेव्हा प्रशांत, लोकसत्तात होता) प्रेक्षकात चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा, पुष्पा भावे, अनंत भावे, डॉ हेमू अधिकारी, आजचा प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, अविनाश महातेकर आदी होते. या "विद्रोही शाहीर जलशा"च्या कार्यक्रमाला तत्कालीन वर्तमानपत्रांनी व स्टार मराठी चॅनेलने ठळक प्रसिद्धी दिली. या कार्यक्रमा नंतर, विद्रोहीतर्फे दरवर्षी महाराष्ट्रभर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे जयंती व विद्रोही शाहीरी जलसे होऊ लागले. वरील दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या, मंच, ध्वनिक्षेपक यंत्रणा, कलाकारांशी संवाद दत्ता व अविनाश कदम हे जबाबदारीने पार पाडत होते. 


विद्रोही च्या कोल्हापूर, औरंगाबाद व नंतरच्याही अनेक संमेलने व मुंबईतील सांस्कृतिक चळवळीच्या अनेक कार्यक्रमात दत्ता माझा हक्काचा कार्यकर्ता होता. अविनाश कदम, शिवराम सुखी, शाहीर सुरेश जाधव, दीपक पवार सतीश पहुरकर, यांच्या सोबत विद्रोही सांस्कृतिक कला पथकात तो आयोजनाची जबाबदारी पार पाडायचा. नंतर विद्रोही च्या फाटाफुटीमुळे इतरां प्रमाणे तोही नाराज असायचा, पण मुंबईत तरी सर्वानी मिळून एकत्र विद्रोही चे काम करावे यासाठी आग्रही असायचा. काही वेळा मला तो बी. ए. आर. सी कॉलनीत, मानखुर्द येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले, सावित्रीबाई जयंतीच्या कार्यक्रमात आवर्जून बोलवायचे, तेथील बौद्ध व बहुजन समाजातील तरुणांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीत, पुरोगामी चळवळीत आणण्यासाठी तो प्रयत्नशील असायचा. अलीकडे त्याचे भेटणे जरा कमी झाले होते. पुर्वी तो दोन चार दिवसाआड ऑफिस मधून नेहमीच फोन करून कार्यक्रम आदी. चौकशी करायचा. नंतर तो स्वतः च्या कौटुंबिक समस्यां मध्ये अडकल्याचे फोनवर सांगायचा. 


सुमारे तीन वर्षांपूर्वी त्याने मला फोन करून सांगितले की नाशिक चा आमचा नाटककार कॉमन मित्र प्रशांत हिरे याला तातडीने, प्रज्ञा दया पवार चा, "आरपार लयीत प्राणांतिक" हा विठाबाई नारायणगावकर वरील कविता संग्रह हवा आहे, तो त्यावर नाटक लिहित आहे, त्याला तू तो देण्याची व्यवस्था कर. मी त्याच दरम्यान मनमाड-चाळीसगावकडे रेल्वे ने चाललो होतो, तेव्हा मी प्रशांतला नाशिक रोड स्टेशनवर भेटायला बोलावलं व प्रज्ञाचा संग्रह दिला. त्यावेळी प्रशांत माझ्यासाठी खास नाशिकचा फेमस चिवडा न मागता भेट घेऊन आला आणि संग्रहाचे वर पैसेही मी नको म्हणत असताना दिले. तीच माझी, प्रशांत ची शेवटची भेट. 


माझे महाराष्ट्र भर चळवळीत जे चहाते, जवळचे मित्र होते, त्यामधील दत्ता जाधव एक होता. दत्ताचा जन्म मराठा समाजात झालेला, पण, सिद्धार्थ महाविद्यालयातले समतावादी, आंबेडकरी, विचारांचे संस्कार व मित्रांचा सहवास त्याला पुरोगामी चळवळीकडे घेऊन आला. त्याच्या वैचारिक निष्ठा व सर्वस्व त्याने फुले, आंबेडकरी व पुरोगामी चळवळीलाच वाहिले होते. दत्ता जाधव २३ एप्रिल ला करोनाने गेला आणि प्रशांत हिरे ७  मे ला करोनाने गेला. दोघेही अकालीच गेले. त्यामुळे विद्रोही, पुरोगामी, फुले, आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे खूपच नुकसान झाले आहे.


- सुबोध मोरे,

- माजी सरचिटणीस, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र

 9819996029

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा