Breaking
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी ; लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही, सोसायटीमध्येच घेता येणार लस


मुंबई :
लवकरच मुंबईकरांना त्यांच्या सोसायटीमध्येच करोनाची लस उपलब्ध करुन दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने शहरांमधील मोठ्या सोसायट्यांना खासगी रुग्णालयांसोबत टायअप करुन लसीकरण मोहीम राबवण्याची परवानगी दिली आहे. सोसायटीच्या आवारामध्ये रुग्णालयांशी बोलून लसीकरण मोहीम राबवता येणार आहे. मात्र यासाठी पुरेश्या प्रमाणात लसी उपलब्ध आहेत का याबरोबरच करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन केलं जात आहे का याकडेही रुग्णालांनी लक्ष देणं बंधनकारक आहे. या लसीकरण मोहिमेचे दर सरकारने खासगी रुग्णालयांसाठी ठरवून दिलेले आहेत. यासंदर्भात काही सोसायट्यांनी महापालिकेसोबत चर्चा सुरु केली आहे तर काही सोसायट्यांनी स्वत: लसीकरणासाठी लागणारी व्यवस्था उभारण्याची तयारी सुरु केलीय.


अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), सुरेश कलानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. गृहसंकुले, इंडस्ट्रीयल पार्क, बँका, मोठ्या कंपन्या कोणत्याही खासगी रुग्णालयासोबत टायअप करुन त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या आवारामध्ये लसीकरण करु शकतात, असं कलानी म्हणाले. “आम्ही लसीकरणासाठी ७५ खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. अर्ज येतील त्याप्रमाणे इतर रुग्णालयांनाही आम्ही परवानगी देऊ. रुग्णालयांनी ही लसीकरण केंद्र उभारताना वाट पाहण्यासाठी रांगेत असणाऱ्यांसाठी जागा, लसीकरण, लसीकरणानंतर ऑबझर्व्हेशन एरिया यासारख्या गोष्टींबरोबर लसीकरणासंदर्भात इतर नियम पाळणे बंधनकारक अशणार आहे. ज्यांना मोफत लस हवी आहे ते बीएमसीने उभारलेल्या २२७ लसीकरण केंद्रावरुन ती घेऊ शकतात. या केंद्रामध्ये मोफत लस मिळेल पण लसींचा पुरवठा झाल्यानंतरच ही केंद्र सुरु होतील,” असं कलानी यांनी स्पष्ट केलं आहे.


लोढा ग्रुपने आपल्या सर्व रहिवासी संकुलांमधील नागरिकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये आम्ही लसीकरणासंदर्भात संबंधित संस्थांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. आम्ही स्थानिक महानगरपालिकांकडून यासंदर्भातील परवानगी मिळवण्यासाठी चर्चा करत आहोत. “आम्ही स्थानिक खासगी रुग्णालयांसोबत लसीकरणासंदर्भातील करार केलाय,” असं लोढाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.


मुलुंडमधील अॅटमोस्पीयर हाऊसिंग सोसायटीनेही मुंबई महानगरपालिकेची मदत मागितली आहे. भागजाचे खासदार मनोज कोटक सुद्धा त्यांच्या कॉम्पलेक्समध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. “आमच्या संकुलात एकूण ७०० घरं आहेत येथे १५०० हून अधिक जण राहतात. आम्ही आमच्या संकुलामध्ये लसीकरण केंद्र उभारण्यासाठी महापालिकेला मदत करु शकतो. तसेच येथे मदत करण्यासाठी काही लोकांची व्यवस्थाही आण्ही करु शकतो. असं केल्याने लोकांना संकुलाच्या बाहेर न पडता इथेच लस घेता येईल,” असं संकुलातील रहिवाशी असणाऱ्या राज कुलकर्णी यांनी सांगितलं.


कोटक यांनी मुंबई महानगरपालिकेला सेवाभावी संस्थांना खासगी रुग्णालयांसोबत टायअप करुन सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. “यामुळे लसीकरण केंद्रातील गर्दी कमी करण्यास मदत होईल,” असं कोटक सांगतात.


दोस्ती एकर्समधील ११ सोसायट्यांच्या वतीने बांधकाम व्यवसायिकांना पत्र पाठवून येथील कम्युनिटी हॉल हा लसीकरणासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केलीय. “आम्ही महापालिकेच्याही संपर्कात आहोत. महापालिकेच्या केंद्रावर प्रचंड गर्दी होईल आणि त्यांच्यावर ताण येईल. त्यामुळे छोट्या छोट्या केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबवली पाहिजे,” असं दोस्ती लिली हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष राहुल दागा यांनी सांगितलं. तसेच हे केंद्र उभारण्यासाठी सोसायटी खर्च करण्यास तयार आहे असंही दागा म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा