Breaking
तोंडओळख गझलेची - प्रसाद कुलकर्णी


साप्ताहिक जनमंगल चा 'माय बडी राइट्स' हा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आणि अनुकरणीय आहे.याबद्दल सर्वप्रथम मी संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या उपक्रमामध्ये मला ज्येष्ठ साहित्यिका गझलकारा प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांनी सहभागी करून घेतले याचा मला विशेष आनंद होतो आहे. याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतों. प्रा.सुनंदा पाटील व माझा स्नेह मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट उर्फ दादा यांच्यामुळे आकाराला आला. त्याला आता तीन-साडेतीन दशके होऊन गेली आहेत. प्रा.सुनंदाजी यांचे 'गझलनंदा' हे नामकरण दादांनीच केले आहे.  "साहित्याचा वावर होता घरात माझ्या, गझल भेटली वाटेवरती शकुन झाले" असे लिहिणाऱ्या गझलनंदा व माझ्या  मैत्रीतील 'गझल' हा सर्वात मजबूत व टिकाऊ धागा आहे. स्वतः उत्तम गझलकारा असलेल्या गझलनंदा यांनी सुरेश भटांची शास्त्रशुद्ध मराठी गझल पुढे नेण्यासाठी मौलिक योगदान दिले आहे. त्यांच्याकडे गझलेचे प्रशिक्षण घेणाऱ्या अनेकांनी ते वेळोवेळी आदरपूर्वक अधोरेखित केले आहे. त्यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाली नुकतेच सुरू झालेले 'गझलानंद'  व्हाट्सअप समूह हे त्याचे आणखी एक ताजे उदाहरण आहे.म्हणूनच 'My Buddy Writes'  या उपक्रमात 'गझलेची तोंडओळख' या विषयावर संक्षिप्तपणे लिहीत आहे.

 
'गझल' या काव्यप्रकाराला पाचशे वर्षांची परंपरा आहे. ती फारसी मधून उर्दूत आणि तिथून अन्य भाषांमध्ये गेली.

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे. त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार म्हणूनही गझलेकडेच पहावे लागते. ख्यातनाम कवी माधव ज्युलियन ऊर्फ माधव त्र्यंबक पटवर्धन  यांचा शंभर वर्षापूर्वी 'गज्जलांजली' नावाचा काव्यसंग्रह  आला.त्यातील कविता उत्तम आहेत यात शंका नाही. मात्र त्या परिपूर्ण गझला नाहीत हेही तितकेच खरे आहे. मराठी मध्ये 'गझलेची बाराखडी' लिहून शास्त्रशुद्ध गझलेची ओळख सुरेश भटांनी अर्धशतकापूर्वी करून दिली. सर्वार्थाने 'मराठी गझल विद्यापीठाचे कुलपती' असलेल्या सुरेश भटांनी आपल्या लेखणीतून मराठी गझल अतिशय समृद्ध करून ठेवली आहे.
 
  " बाराखडीच नव्या पिढीला दिली भटांनी, 
   म्हणून दिसते गझल मराठी पानोपानी "
   
 हे सार्वकालिक सत्य आहे. उत्कृष्ट रचना, तंत्रशुद्धता ,छंदोबद्धता ही गझलेची वैशिष्ट्ये ती कोणत्याही भाषेतील असली तरी फार महत्त्वाची असतात. डोळ्यांना तशी भाषा असते तसे गझलेला व्याकरण असते. बंधने असूनही बंधमुक्त आणि हळुवारपणा जपत कठोर प्रहार करण्याची क्षमता ही गझलेची खरी ओळख आहे. गझल ही जगण्याचा गंध पकडणारी तसेच काळजातुन शब्दसुत कातणारी विधा आहे.म्हणूनच ती तलम दिसते व असतेही.

  " मी जगण्याचा गंध मनाशी पकडत होतो 
  त्याचा दरवळ गझले मधुनी वाटत होतो ,
  
  गझला माझ्या तलम जगाला वाटत होत्या
   काळजातले शब्दसूत मी कातत होतो..."
 
मराठी कवितेला आठ शतकांची परंपरा आहे. आख्यान काव्य, कटाव, पोवाडा, खंडकाव्य,  स्वयंवर काव्य, महाकाव्य आदी कथालनपर काव्ये तर ओवी ,अभंग, गवळण, भारुडे , स्तोत्रे, विराणी, पाळणे, लावणी, सुनीते, गझल यासारखे भावकवितेचे प्रकार आहेत. अलिकडे गझल हा काव्यप्रकार सर्वात जास्त चर्चेत असतो हे दिसून येते. लोकप्रियता, हृदय प्रियता, कर्णप्रियता आणि नयन प्रियता ही गझलेची वैशिष्ट्ये असतात. निव्वळ शब्दकृती म्हणजे गझल होत नसते. तर त्या शब्दकृतीचे विशिष्ट संकेतांना अनुसरून केलेले काव्यात्म रूप म्हणजे गझल असते. नेहमीच्या भाषेपेक्षा गझलेची भाषा वेगळी असते.
 
वेदना आणि संवेदना यातूनच गझल जन्म घेत असते. अपूर्णतेतच नवनिर्मितीची बिजे असतात आणि बीजाचे अंकुरणे कधीच सोपे नसते. कारण त्यासाठी त्याला आतून तडकावे लागते. गझल व तिचे शेर काळजात घुसतात याचे कारण तिची  निर्मिती प्रक्रिया सहज साध्य  नसते. ती प्रसववेदना सोसूनच जन्म घेत असते. गझल बाहेर येण्यापूर्वी काळजात लोणच्यासारखी मुरवत ठेवली तर ती अधिक आस्वाद देते आणि अस्सल गझलेची तीच ओळख आहे.
 
"गझलेचा प्रियकर होणे हे साधे सोपे नसते
एकेका शेरासाठी मी रक्त अटवले होते.."

 गझलेकडे या गांभीर्याने पाहिले पाहिजे.वृत्त,काफिया (यमक), रदीफ (अंत्ययमक) यामुळे गझलेचा
 आकृतिबंध बनतो. त्यालाच 'जमीन' असेही म्हटले जाते. अर्थात रदीफ नसलेली म्हणजे 'गैरमुरद्दफ' गझलही असतेच. गझल लिहू वा समजून घेऊ इच्छिणाऱ्याने  व्याकरणाचा बाऊ करु नये.पण त्याचा नेमका अभ्यास केला पाहिजे. वृत्त वापरताना यतीभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गझलियत, शेर, मतला, रदीफ, काफिया समजून घेतला पाहिजे. केवळ गझलेचे तंत्र पाळून लिहीलेल्या दोन ओळी एकत्र करून शेर निर्माण होत नसतो. शेर निर्माण होण्यासाठी त्याचा परस्पर संबंध, धक्कातंत्रापासून परिपूर्णते पर्यंतच्या सर्व बाबी सांभाळाव्या लागतात. योग्य शब्दांची निवड, आशय आणि अभिव्यक्ती यांना गझलेत अतिशय महत्त्व असते.
 
 "नऊ रसांच्या आस्वादाने माझी भूकच नाही भागत
  मीच दहावा रस होतो अन गझलेमधुनी जातो मांडत.."
  
हे गझलेचे वेगळेपण आहे. सुख आणि दुःख या मानवी  जीवनाच्या अटळ बाजू आहेत. संपूर्ण सुखी किंवा संपूर्ण दुःखी असा माणूस नसतो. गझलकार वेगवेगळ्या अनुभवातून, दाखल्यातून, परकाया प्रवेशातून मानवी मनाची आंदोलने टिपत असतो. गझलकाराचे शेर हे केवळ त्याच्या काळजात वास करत नसतात. तर श्वासातुन आणि रक्तातुन वाहत असतात. कवी इतिहास आठवत, भविष्य पहात वर्तमानात जगत असतो. त्यामुळे अनेकदा त्याचे लेखन समकालीनते बरोबरच कालातीतही असते. गझल असो किंवा कविता असो, शेवटी ती माणसाच्या म्हणजेच पर्यायाने समाजाच्याच भोवती फिरते. माणूस हा नाशवंत असल्यामुळे त्याच्यात अपूर्णतेची जाणीव आहे. त्याच जाणिवेमुळे सर्व कला समृद्ध होत जातात. तसेच दिलखुलास, मनमुराद आनंद देणे व घेणे हे मानवी जीवनाचे सार आहे. ज्यांच्यापर्यंत प्रकाश पोहोचू शकला नाही, त्यांच्यापर्यंत तो नेण्याचे काम करणे ,तसा प्रयत्न करणे यातच खरा आनंद आहे. गझलेने तो केलेला आहे, दिलेला आहे. अलीकडे समाज माध्यमांमुळे गझल अधिकाधिक समाजाभिमुख होत आहे. मात्र त्याच वेळी ती सुमारीकरणात अडकणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. कारण समाज माध्यमानी एक मायावी व आभासी विश्व निर्माण केले आहे. माणसाशी दुरावा ठेवून यंत्राशी, माध्यमांशी जवळीक ठेवल्याने गझल निर्माण होणार नाही. माध्यमे प्रेम निर्माण करू शकतील पण त्या प्रेमात रंग भरण्यासाठी जिवंत हृदयच लागत. तो जिवंतपणा गझलेत नक्कीच आहे.
 

घर गझलेचे
--------------

घर गझलेचे बांधायाला जमीन आधी तू शोधावी 
सुरुवातीला साधी सोपी काही वृत्ते  हाताळावी..

सांगायाला अपुल्या हाती केवळ दोनच ओळी असती
असे शिरावे काळजात की ' शेर 'उपाधी सार्थ ठरावी..

वेगवेगळी आशयघनता मुशायऱ्याला रंगवतेही
 गझलेमधली गझलीयतही रसिकजनांना स्पष्ट दिसावी..
 
 जन्मभरी मी ओठांनाही शपथ घातली प्रेमभराने 
 डोळे मिटल्यानंतरही या ओठांवरती गझल असावी..
 
 बेचैनीने बेचैनाला निर्णय घेऊ दिलाच नाही 
 कधी वाटले चिता रचावी ..कधी वाटले गझल म्हणावी.
 
पुनर्जन्म जर मला मिळाला तर ही इच्छा माझी आहे
 या जन्मीची  त्या जन्मीला माझी मजला गझल मिळावी..
 
 नावांचा उल्लेख टाळते मात्र पोचते योग्य ठिकाणी
 मी 'तू ,तो ,ती सारे असुनी अखेर राही गझल निनावी..

ज्या जमिनीवर पाया बळकट तीच इमारत भक्कम राही भाषेच्या श्रीमंतीसाठी अनवट-अवघड वृत्ते घ्यावी..

लेख हजारो लिहून गेलो हयातीत मी माझ्या तरीही 
मी जाताना माझ्या मागे केवळ ओळख उरावी...


-----------------------------
प्रसाद माधव कुलकर्णी
५३६/१८,इंडस्ट्रियल ईस्ट
समाजवादी प्रबोधिनी
इचलकरंजी - ४१६ ११५
जि.कोल्हापूर
( ९८५०८३०२९०)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा