Breaking
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी ताबडतोबीच्या उपाययोजनांच्या संदर्भात सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना संयुक्त पत्र


नवी दिल्ली : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी ताबडतोबीच्या उपाययोजनांच्या संदर्भात सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना संयुक्त पत्र देत विविध मागण्या केल्या आहेत. 


पत्रात म्हटले आहे की, आपल्या देशात कोविड-१९ महामारीने एका अभूतपूर्व मानवी शोकांतिकेचे रूप धारण केले आहे. याबाबत यापूर्वीही आम्ही अनेकदा स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे, केंद्र सरकारने कोणती पावले उचलायला हवीत, याकडे आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने सरकारने आमच्या सर्व सूचनांकडे एक तर दुर्लक्ष तरी केले अन्यथा त्या सूचना उडवून लावल्या. त्याच्या परिणामी इतका भयानक उत्पात घडून आला आहे. 

देशाला या विदारक अवस्थेत आणताना केंद्र सरकारने काय केले आणि काय केले नाही या तपशिलात न जाता, यापुढे आपण युद्धपातळीवर पुढील उपाययोजना कराव्यात असे आमचे ठाम मत आहे.

पत्राद्वारे केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

१. उपलब्ध असलेले देशी-विदेशी सर्व स्त्रोत वापरून केंद्राने लस मिळवावी.

२. देशभरात मोफत आणि सार्वत्रिक लसीकरण मोहीम ताबडतोब राबवावी.

३. देशातील लस उत्पन्न वाढवण्यासाठी अनिवार्य परवाना पद्धत अमलात आणावी.

४. लसीकरणासाठी अर्थसंकल्पात राखून ठेवलेले ३५,००० कोटी रुपये त्वरित वापरण्यात यावेत.

५. सेन्ट्रल व्हिस्ता प्रकल्पाचे बांधकाम त्वरित रोखून तो निधी ऑक्सिजन आणि लस मिळवण्यासाठी वापरावा.

६. बेहिशोबी खाजगी ट्रस्ट असलेल्या पंतप्रधान केअर फंड यातील सर्व निधी लस, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांसाठी उपलब्ध करून द्यावा.

७. सर्व बेरोजगारांना दरमहा किमान ६००० रुपये द्यावेत.

८. सर्व गरजूंना मोफत धान्य वाटप करावे. (एक कोटी टनाहून अधिक धान्य सध्या केंद्रीय गोदामांत कुजत पडले आहे.)

९. कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत, जेणेकरून आपले अन्नदाते महामारीला बळी पडणार नाहीत आणि देशाच्या जनतेची भूक भागवण्यासाठी धान्य पिकवू शकतील.

आजवरचा आपल्या कार्यालयाविषयीचा आणि सरकारविषयीचा आमचा अनुभव पाहता, पत्रांना उत्तर देण्याची आपली पद्धत नाही, असा टोलाही पत्राद्वारे लावण्यात आला आहे. तरी देखील देशाचे आणि आपल्या जनतेचे हित लक्षात घेऊन या पत्राला आपण उत्तर द्याल, अशी अपेक्षाही व्यक्त करत आली आहे.

पत्रावर कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी, जनता दल-एस चे एच. डी. देवे गौडा, राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, तृणमूल कॉग्रेसच्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चा हेमंत सोरेन, जम्मू काश्मीर पीपल्स अलायन्स फारुख अब्दुल्ला, समाजवादी पार्टी अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांच्या सह्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा