Breaking
जुन्नर : कोपरे परिसराची जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी केली पाहणी ; पाणी प्रश्न सुटणार ?[महाराष्ट्र जनभूमीच्या स्पेशल रिपोर्टचा इम्पॅक्ट]

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोपरे गाव आणि परिसरातील विविध प्रश्नांवर सर्व प्रथम "महाराष्ट्र जनभूमी"ने २० मे रोजी स्पेशल रिपोर्ट केलेला होता, या रिपोर्टनंतर कोपरे परिसरातील प्रश्नांची प्रशासनाने दखल घेतली आहे.

कोपरे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे या गावातील पाणी, वीज, मोबाईल टॉवर असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले, परिणामी पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर झाला. 


या संबंधी 'महाराष्ट्र जनभूमी'ने बातमी दिल्या नंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले त्यानंतर आमदार अतुल बेनके, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिनिधी विजय कोल्हे तसेच जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांनी या गावात येऊन पाहणी करत तातडीने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाऊले उचलली.

तसेच कोपरे गावात स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना तातडीने राबविण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेकडे करण्यात आली. याची तातडीने दखल घेत पुणे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व ग्रामस्थांच्या टीमने कोपरे, जांभुळशी, मांडवे, मुथाळणे गावांची पाहणी करत टंचाईग्रस्त वाड्या-वस्त्यांसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. 

 
महाराष्ट्र जनभूमी स्पेशल रिपोर्ट मार्फत आमच्या गावातील अनेक पायाभूत प्रश्नांना वाचा फोडली.  संसद दत्तक गाव कोपरे मध्ये आज विकास कामांना गती मिळत आहेत. यापुढे देखील संवेदनशील दाखवून त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत सहकार्य लाभले पाहिजे. त्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो. 
- संजय माळी, ग्रामस्थ कोपरे

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता भुजबळ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी (ता. २६) परिसराची पाहणी केली. यावेळी उपअभियंता कैलास टोपे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, सरपंच ठमाजी कवठे, खासदारांचे प्रतिनिधी विजय कोल्हे व स्वीय सहायक तुषार डोके आदी उपस्थित होते.


यावेळी येथील वाड्या-वस्त्यांना भेट देऊन येथील पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी केली. तसेच शिवकालीन तळे, एकदिवसीय पाणी साठवण तलाव, जर्मन फॅब्रिकेटेड तलाव यांची सद्यस्थितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यासोबतच शिवकालीन तळ्याला फिल्टर जोडून तेच पाणी पिण्यासाठी उपयोगात कसे आणता येईल हे देखील पडताळून पाहण्यात आले. त्याचबरोबर या खोऱ्यातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मांडवी नदी खोऱ्यात 'एमआय टँक' बांधण्यासंदर्भात लवकरच जलसंपदा व जलसंधारण विभागांसमवेत संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील दिली.

परिसरातील पाणी प्रश्नी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पाहणी केल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच ग्रामस्थांनी देखील महाराष्ट्र जनभूमीचे आभार मानले.

हे पण वाचा !कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा