Breaking
जुन्नर : एक घास त्यांच्यासाठी....! शिवजन्मभूमीतील तरुणांचा मुक्या प्राण्यांसाठी अनोखा उपक्रमजुन्नर (पुणे) : "शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील अजिंक्य घोलप ह्या युवकाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. लॉकडाऊन काळात मुक्या प्राण्यांना चालू नित्यनियमाने अन्नदान" चालू आहे.


एक घास त्यांच्यासाठी....! या मोहिमेंतर्गत ह्यांच्यासाठी थोडं शक्य होईल का..? भुकेल्या पोटाला काही खायला मिळेल का...? तुम्ही बोलू शकता पण ह्यांच काय..? माणूसकी जपुयात...! असे भावनिक आवहानही ते करत आहेत.


कोरोनाच्या थैमानांन एव्हाना सगळं विश्व व्यापलं आहे. मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या घटकांसमोर या निमित्ताने कधी नव्हे एवढं मोठं संकट उभं राहिलं आहे. व्यापार, कृषी, वाहतूक, छोटे-मोठे धंदे, हातावर पोट भरणारे मजूर अशा अनेक घटकांची त्रेधातिरपीट उडत आहे. परंतु आता कोरोनाचं हे लोन फक्त माणसांपर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही. मानवासोबतच निसर्ग संस्थेतील वन्यप्राणी, वनस्पती आणि इतर अन्य घटकांवर याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या विपरीत परिणाम दिसायला लागले आहेत.


राज्यात सध्या लॉकडाऊनचे निर्बंध चालू आहेत. परिणामी देवस्थाने, धार्मिक स्थळे बंद आहेत. एरव्ही मंदिर परिसरात, मंदिराच्या पायऱ्यांवर दिसणारी माकडे आणि त्यांना वेगवेगळे खाद्यपदार्थ खाऊ घालणारी भाविक मंडळी हे चित्र मागच्या गेल्या वर्षापासून दुरापास्त झाले आहे. याचा नकारात्मक परिणाम म्हणजे या माकडांना अन्न-पाण्यासाठी ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत वणवण भटकावे लागत आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक देवस्थानांपैकी एक असलेलं श्री.क्षेत्र लेण्याद्री गणपती मंदिर परिसरातही माकडांची अशीच अडचण समोर आली आहे. 


मंदिर बंद असल्यामुळे भाविक नाहीत आणि भाविक नसल्यामुळे या मुक्या प्राण्यांना खायला काही मिळत नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी अन्नाच्या शोधार्थ ही माकडे गडावरून खाली उतरतात आणि बंद असलेल्या दुकानांमध्ये शिरून मालाची नासधूस करतात. बिचारी ती तरी काय करणार ? पोटाच्या भुकेसमोर ती अस्वस्थ होऊन मिळेल ते खाण्याचा प्रयत्न करत आहेत.


मागच्या वर्षीसुद्धा मंदिर बंद असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी मंदिर प्रशासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सामाजिक संघटनांनी, सुजाण नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान जोपासत या माकडांना खाण्यासाठी केळी, फळभाज्या, काकडी, खरबूज आणि अन्य खाद्यपदार्थ मंदिर प्रशासनाला सुपूर्द केले होते. 


परंतु पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आल्यामुळे परिणामी माकडांच्या पोटालाही अप्रत्यक्षरित्या लॉकडाऊन लागू पाहत आहे. मंदिर प्रशासनाने त्यांच्यासाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे. खाण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं खायला दिलं जात आहे. परंतु यापलीकडे जात त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सामाजिक संघटनांनी, समाजातील दानशूर व्यक्तींनी, शेतकऱ्यांनी, सर्व समाजघटकांनी आपापल्या परीने पुढे यावे, असे मदतीचे आवाहन केले आहे.


मानवाने त्यांच्या नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप केल्यामुळेचं त्यांच्यावर आज ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आज आपण पुढे आलंच पाहिजे. वनविभागानेही या समस्येत लक्ष घालून झाडांची लागवड करून या मुक्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची भविष्यकालीन व्यवस्था उभी करावी. परंतु आजची या माकडांवरची वेळ बघता समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे, ही कळकळीची विनंती करण्यात येत आहे.


 तसेच कुणाला ह्या सामाजिक कार्यात सहभागी होऊन काही मदत करायची इच्छा असेल तर ७७५८००३३४४ ह्या नंबर वर संपर्क करायची विनंती देखील अजिंक्य घोलप ह्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा