Breaking
विशेष लेख : कार्ल मार्क्स : येणाऱ्या पिढ्यांचाही मार्गदर्शक सहप्रवासी - प्रसाद कुलकर्णी

बुधवार ता. ५ मे २०२१ रोजी जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांचा २०३ वा जन्मदिन आहे. आज जगभर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतने प्रस्थापित केलेले विषमतेचे मॉडेल आणि आणि गेल्या सव्वा - दीड वर्षात कोरोना रुपी जागतिक संकटाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दाखवून दिलेल्या मर्यादा व तिचे हिडीस स्वरूप पाहायला मिळते आहे . कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लॉक डाऊन गरजेचा आहेच आहे. पण हे संकट भारतात येण्यापूर्वी चीन सह अनेक देशात थैमान घालत होते.त्या दीड – दोन महिन्यात आपण देश म्हणून काय करत होतो ? जबाबदार नेते, अभ्यासक या संकटाची चाहूल देणारी चर्चा समाजमाध्यमातून करत होते तेंव्हा देश म्हणून आपण काय करत होतो ? तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देश होरपळून  निघत असताना सत्ताधारी पक्ष व नेतृत्व पाच राज्यांच्या निवडणूक सभात व्यस्त होते. ‘पहिल्या लॉकडाऊनचे निर्णय फिल्मी स्टाईलने घेऊन वाट लावल्यानंतर, आता प्रचारात लाखोंच्या सभा घेऊन लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय आहे, मास्क व फिजिकल डिस्टन्स गरजेचे आहे असा उपदेश करत आहेत. वास्तविक गतवर्षी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी हातावर पोट असलेल्या, रोजंदारीवर असलेल्या करोडो लोकांच काय ? त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची जगण्याची किमान व्यवस्था काय ? हा विचार सर्वांगीण समता आणू पाहणाऱ्या विचारधाराच करू शकतात. भांडवलशाही व्यवस्था समाजातील कष्टकरी, कामगार वर्गाचा विचार करत नाही. ती  आपत्तीतही आपल्याच भांडवलदार  बांडगुळी पाठीराख्यांना इष्टापत्ती कशी ठरेल याची इमानेइतबारे दक्षता घेत असते. कोणतीही किमान व्यवस्था,पूर्वसूचना न देता, नियोजन काय केले जातेय ? याची काहीही माहिती न देता एकशे तीस कोटीच्या देशात लॉक डाऊन हा आवश्यक असला तरी  धक्कातंत्री निर्णय घेतला गेला हे भांडवलशाही राजकारणाचे हिडीस लक्षणच मानावे लागते. सारे  जनजीवन दोन - चार तासात ठप्प करण्याचा निर्णय घेणारी मानसिकता ही केवळ आणि केवळ भांडवलशाही अर्थव्यवस्थेची पुरस्कारच करीत नसते, तर राज्यव्यवस्थासुद्धा भांडवलशाहीशी बांधिल राहील याची हमी देत असते.


कोरोनाच्या या संकटाने आणि त्यापूर्वीच्या चुकीच्या आर्थिक धोरणाने बेरोजगारीच्या खाईत प्रचंड वाढ झाली आहे, होत आहे आणि होणार आहे..एकीकडे रोजंदारांचा रोजगार हिरावला जातोय, गरीब अधिक गरीब होतोय आणि दुसरीकडे  बड्या भांडवलदारांची, आर्थिक साम्राज्यवाद्यांची, देशबुडव्यांची कर्जे माफ केली जात आहेत. अशावेळी समाजव्यवस्था व  अर्थव्यवस्था यांसह मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित राहतो. तेव्हा कार्ल मार्क्स आणि त्याची विचारधारा आपल्याला टाळता येत नाही. ज्या ज्या वेळी जागतिक मंदी आली त्या त्या वेळी मार्क्स काय म्हणतो ? हे जाणून घेण्याची गरज जगाला वाटत  आलेली आहे. हे गेल्या दीडशे वर्षात सत्य ठरलेले आहे. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. रघुराम राजन यांनीही अलीकडे जागतिक भांडवलशाही धोक्यात असल्याचे भाकीत केले आहे. तसेच कोरोनाने प्रचंड बेरोजगारीसह सर्व क्षेत्रात जे मूलभूत बदल होणार आहेत त्याचे सूतोवाच केले आहे. सध्याचे जागतिकीकरण ज्या पद्धतीने जगभर थैमान घालत आहे, केवळ बाजारपेठ केंद्रित नीती वापरली जात आहे त्यामुळे गरीब व श्रीमंत यातील दरी अधिकाधिक रुंदावत आहे. यावरून भांडवलशाहीच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. सध्याच्या लॉक डाऊन काळात तर लहान मोठ्या उद्योजकांचे होत असलेले नुकसान, स्थलांतरित मजूर, विकेंद्रित मजूर, मध्यमवर्ग यांचे होत असलेले प्रचंड हाल आपण पहात आहोत. कोरोनाच्या आजारापेक्षा या अर्थनीतीने बळी गेलेल्यांची संख्या  अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही . अनेकांच्या पुढे, अनेक कुटुंबां पुढे काय वाढून ठेवले आहे ? आणि आपले काय काढून घेतले आहे ? हे स्पष्ट होण्यासाठी अजून काही काळ द्यावा लागेल. कारण कोरोना साठीचा लॉक डाऊन अद्याप सुरू आहे. तो पुन्हा किती लांबेल हे सांगता येत नाही. आणि तो संपला की अनेक कुटुंब आयुष्यातून उठलेली दिसण्याची भयानक शक्यता नाकारता येत नाही. इतकं भयावह, भयंकर अस्वस्थ करणार वर्तमान आहे. म्हणूनच मानवी जीवन कायमस्वरूपी समतेच्या पातळीवर ठेवण्यासाठी ज्या विचारधारा मोलाची कामगिरी बजावतात त्यामध्ये कार्ल मार्क्सला अग्रक्रमाने विचारात घ्यावे लागते. आज त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भावतालाची परिस्थिती बघता जास्त गरज आहे.

आज जगभर ची परिस्थिती पाहिली तर बहुतांश जनतेला विकासाच्या समान संधी उपलब्धच नाहीत हे वास्तव आहे. भांडवलशाही व्यवस्थेचे सैद्धांतिक विवेचन करून तिच्यातील दोष कार्ल मार्क्सने दीडशे वर्षांपूर्वी दाखवून दिले होते. मार्क्सची विचारधारा  ही पोथी, पुराण, वेद वाङ्मय यासारखे बंदिस्त  तत्त्वज्ञान नाही. तर ते मानवी समाजव्यवस्थेत सर्वार्थाने समता प्रस्थापित करता येऊ शकते आणि ती केली पाहिजे असे सांगणारे जीवन तत्त्वज्ञान आहे.

५ मे १८१८ रोजी जन्मलेला कार्ल मार्क्स १४ मार्च १८८३ रोजी कालवश झाला. अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात कार्ल मार्क्सने मानवी समाजजीवनाच्या ऐतिहासिक वाटचालीचे, वर्तमान समाजाच्या अस्तित्वाचे आणि भविष्यकालीन परिस्थितीचे एक प्रारूप मांडले. समाजाच्या पुनर्रचनेचा तो मूलभूत विचार आहे. समाजातील शोषण जोपर्यंत संपत नाही, शोषित आणि शोषक यांच्यातील संघर्ष जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कार्ल मार्क्स ताजा, टवटवीत आणि समकालीन प्रस्तुतते बाबत अग्रक्रमावर राहणार आहे. "दुनिया मेरी मुठ्ठी मे” हा भांडवली व्यवस्थेचा मंत्र सदासर्वकाळ तसाच राहू शकत नाही. पण “जगातील कामगारांनो एक व्हा ,तुमच्या श्रुंखलांखेरीज  गमावण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही ” असे सांगणारा कार्ल मार्क्स शोषणाच्या अंतापर्यंत विचारात घ्यावाच लागेल.

पश्चिम जर्मनीतील ट्रीअर या गावी मार्क्सचा जन्म झाला. त्याचे वडील वकील होते. काल मार्क्स यांनीही बर्लिन आणि बॉन येथे कायद्याचा अभ्यास केला. अर्थात त्याने राजनीतिशास्त्रही बारकाईने अभ्यासले. वयाच्या पंचविशीत तो एका नियतकालिकाचा संपादक बनला. पण त्याच्या धारदार, तात्विक व क्रांतीदर्शी लेखनाने त्याला वर्षभरातच ही संपादकाची नोकरी सोडावी लागली .आज स्वतंत्र विचारांच्या माध्यमांची, विचारवंतांची लेखकांची मुस्कटदाबी होताना आपण पाहत आहोतच. किंवा मग सारी माध्यमे विकत घेतली जात आहेत. सत्ता आणि भांडवलशाही मिळून हा खेळ खेळत आहेत. मार्क्सला ही  त्यावेळी असाच काहीसा सामना करावा लागला. याच वेळी त्याला फ्रेडरिक एंगल्स हा जन्मभराचा समविचारी मित्र भेटला. आणि जेनी सारखी मैत्रीणही  मिळाली. १९४३ साली मार्क्सने जेनीशी विवाह केला . नंतर तो पॅरिसला गेला. तेथे तो पत्रकार, संपादक म्हणून काम करू लागला. याच ठिकाणी आणि त्याचा फ्रान्स, इंग्लंड, जर्मन आदि देशातील प्रागतिक विचारांच्या मंडळींची संपर्क आला. त्याच्या शास्त्रीय समाजवादाच्या सैद्धांतिक मांडणीचा तो प्रारंभबिंदू होता.

मार्क्सने वयाच्या विशीपासूनच लेखनाला सुरुवात केली होती. मार्क्सचे जीवन तसे अतिशय गरीबीत गेले. कारण लेखन वाचन, चिंतन याआधारे मानवी समाजाच्या वाटचालीचा मूलभूत सिद्धांत मांडणे यातच त्याने अवघे आयुष्य व्यतीत केले. या कामातून त्याला उसंत मिळत नव्हती. एंगल्स ने तसेच जेनीच्या नातलगांनी  मार्क्सला सातत्याने आर्थिक सहकार्य केले. वैचारिक स्वरूपाची सैद्धांतिक मांडणी करणारा  कार्ल मार्क्स अतिशय उत्तम कवी होता. अर्थात् कविमनाचा असल्यानेच त्याचे काळीज सर्वहारा वर्गाबद्दल कळवळले असेल. भारतीय दर्शन परंपरेत प्राचीन काळी कवीला द्रष्टा मानण्यात येत असे. समाजाला नवा विचार कोण देतो ? तर कवी. म्हणजेच कवी हा तत्त्वज्ञ दार्शनिक, विचारवंत याला समानार्थी शब्द होता. अर्थात आज कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वांवरच ते विचारवंत, दार्शनिक आहेत हा आरोप करता येणार नाही हे खरेच. पण मार्क्सबाबत ते खरे आहे. हा कविमनाचा, सहृदयी, तत्वज्ञ आणि त्याचे तत्वज्ञान कालातीत आहे. मानवी इतिहासावर, वर्तमानावर  आणि भविष्यावर आपल्या विचारांची मुद्रा ठळकपणे उमटवून गेलेला  हा थोर विचारवंत आहे. तो लंडन मध्ये कालवश झाला त्यावेळी त्याच्या  अंत्ययात्रेला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक होते. पण, आज तो कालवश झाल्याला १३७ वर्षे होऊन गेल्यानंतरही आपण त्याच्या विचारांना टाळू शकत नाही. तो आपला आणि येणाऱ्या पिढ्यांचाही मार्गदर्शक सहप्रवासी आहे, हे मान्य करावे लागते. यातच  त्याचे मोठेपण सामावलेले आहे.

माणसाचे पृथ्वीवरील अस्तित्व केंव्हा व कसे निर्माण झाले याची मांडणी सातत्याने होत आली आहे. जीवसृष्टीतील इतर प्राणी आणि मानव प्राणी यांच्या वाटचालीत काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. इतर प्राणी हजारो वर्षे तसेच आहेत, पण माणसात मोठा बदल झाला हे सर्व मान्य आहे. जीवन पद्धतीतील हा बदलाचा इतिहास मार्क्सने नेमकेपणाने स्पष्ट केला आणि म्हणून तर निसर्ग ,समाज आणि ज्ञान यांच्या विकासाचे विश्लेषण करणारे शास्त्र त्याने मांडले.त्यालाच आपण मार्क्सवाद असे मानतो. ऐतिहासिक भौतिकवादाद्वारे मार्क्सने समाजाच्या विकासाचेच तत्त्वज्ञान मांडले. मानवी घडामोडीतून इतिहास घडत असतो, हा इतिहास भौतिक कारणांनी घडत असतो आणि ही भौतिक कारणे प्रामुख्याने आर्थिक असतात असे मार्क्स सांगतो. औद्योगिक क्रांतीनंतरच्या  काळात तर मानवी जीवनाच्या आर्थिक बाजूला मोठेच बळ प्राप्त झाले. अठराव्या शतकातील फ्रेंच राज्यक्रांतीनेही हे दाखवून दिले होते. मानवी समाजातील आर्थिक रचनाबंधाचा आणि उत्पादन प्रक्रियेतील हितसंबंधांचा सखोल अभ्यास मार्क्सने सर्वप्रथम केला. तसेच त्याची सुस्पष्ट प्रमेयबध्द मांडणीही केली.

मानवी समाजात क्रिया, प्रतिक्रिया यांच्यातील संघर्ष आणि नंतर समन्वय यातून इतिहास घडत असतो. आणि हे सारे चैतन्यशक्तीचे आविष्कार आहेत असे मत हेगेल या तत्वज्ञाने मांडले होते. कार्ल मार्क्स यांनी मात्र म्हटले आहे की, हेगेलच्या विवेचनातील क्रिया, प्रतिक्रिया, संघर्ष, समन्वय वगैरे ठीक आहे. पण हे सारे अदृश्य चैतन्यशक्ती अथवा परमतत्त्व घडवत नसते. तर हे बदल वर्ग कलहातून वाढत असतात. कोणत्याही समाजाचे जीवन अर्थव्यवहार नियंत्रित करत असतो. अर्थव्यवस्थेत धनिकवर्ग आणि सर्वहारा वर्ग असे दोन वर्ग असतात. या दोहोतील संघर्ष अटळ असतो. दडपला गेलेला वर्ग संघटितपणे लढून विजयी होणार हा इतिहासक्रमाचा भाग आहे. या विजयीवर्गाच्या पिळवणुकीला बळी पडणारा नवा सर्वहारा वर्ग तयार होतो पुन्हा नवीन वर्ग रचना तयार होते. म्हणजेच मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, अशी मांडणी मार्क्स करतो. वर्गकलहातून एक वर्ग जाऊन दुसरा वर्ग सत्तेवर येतो. या अरिष्टाचे मुख्य कारण खाजगी मालमत्ता असल्यामुळे सगळेच मालक आहेत आणि कुणीही मालक नाही अशी व्यवस्था आणली तर भांडणाचे मुळेच नाहीसे होईल. खाजगी मालकीच राहिली नाही तर समाजात वर्गच उरणार नाहीत. आणि वर्गच उरले नसतील तर वर्गसंघर्ष कसा होईल ? असा प्रश्न मार्क्स उपस्थित करतो. वर्गविहीन, राज्यविहीन समाजाची भूमिका तो मांडतो. त्याच्या या मांडणीने अनेकदा केवळ स्वार्थमूलक भूमिकेतून येणाऱ्या ईश्वर, धर्म वगैरे संकल्पनांना हादरे बसले .कारण, ईश्वर व धर्म यांच्या सांगितल्या जाणाऱ्या अर्थापेक्षा मानवी समाजात अर्थकारणाचे महत्व फार मोठे आहे असे मार्क्स सांगतो.

आज ज्या भांडवलशाही व्यवस्थेने विषमता निर्माण केली आहे त्याच्या मर्यादा मार्क्सने स्पष्ट केल्या होत्या. त्याच्या मते मानवी जीवनातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदल हे उत्पादन पद्धतीवर आधारित असतात. तसेच राजकीय व सामाजिक परिवर्तन या अटळ बाबी असून भांडवलशाही समाजव्यवस्था हा इतिहासातील एक टप्पा आहे. तिच्यात मूलतः अंतर्विरोध असल्याने ती स्थिर नाही. श्रम, श्रमशक्ती, मूल्य, वरकड मूल्य, श्रम आणि मूल्याचे अपहरण, भांडवल, स्थिर भांडवल, चलित भांडवल, तेजी-मंदी आणि भांडवलशाहीच्या नाशानंतरची समाजव्यवस्था या साऱ्यांची मांडणी मार्क्स त्याचा ‘कॅपिटल ‘या  ग्रंथात करतो.

आजवरच्या तत्ववेत्यांनी निरनिराळ्या पद्धतीने जगाचा अर्थ सांगितला. पण केवळ अर्थ सांगून प्रश्न सुटत नसतो, म्हणून मुद्दा आहे तो जग बदलण्याचा असे मार्क्स ठणकावून सांगतो. त्याचा समाजवाद मानवी कारुण्यावर नव्हे  तर आर्थिक समतेवर आधारित आहे. हे सारे तत्त्वज्ञान तो कमालीच्या रसपूर्ण, काव्यमय भाषेत मांडतो. माणसेच आपल्या संकल्पनांची, विचारांची उत्पादक असतात. ती कृती करणारी असतात. जाणीव म्हणजे इतर काहीही नसून ते माणसाचे सजग अस्तित्वच असते. आणि माणसाचे अस्तित्व हेच जगण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया असते. आपले भौतिक उत्पादन आणि भौतिक संबंध यांचा विकास करताना माणसे आपले विचार, अस्तित्व यात बदल करत राहतात. आयुष्य जाणीवेने ठरत नसते तर जाणीव आयुष्यामुळे ठरते असे मार्क्स  सांगतो.

आज भांडवलशाहीत विषमतेचा कडेलोट होत आहे.  भारतातही अत्यंत अतार्किक, चुकीच्या , मनमानी, समग्रतेचे भान व जाण नसलेल्या निर्णयांची किंमत देशाला म्हणजेच देशातील सर्वसामान्य नागरिकांना चुकवावी लागत आहे.प्रचंड वाढती बेरोजगारी, कमालीची औद्योगिक मंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या  अशा मूलभूत प्रश्नांपेक्षा सांस्कृतिक राष्ट्रवाद, धर्मांधता यांचे पद्धतशीर विस्तारीकरण सुरू आहे. त्याचे समर्थन करणारी एक समताविरोधी समाजमाध्यमी विकृती पद्धतशीरपणे कार्यरत ठेवलेली आहे.  विचारपूजेपेक्षा विभूतीपूजा  सुरू झाली की त्यामध्ये  सत्याची आहुती पडत असते हा इतिहास आहे. आमचा अग्रक्रम कशाला याचे समाजभान पद्धतशीरपणे दुसरीकडे वळवले जात आहे. अशावेळी चुकीच्या आर्थिक धोरणातून निर्माण झालेली दुरावस्था सावरायची असेल तर त्यासाठी योग्य आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक धोरणांची गरज असते. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा वृथा बागुलबुवा अथवा परधर्माचा द्वेष उपयुक्त नाही. तसेच सत्तेच्या बगलबच्ची भांडवलदारांचा गुणाकाराच्या श्रेणीहूनही अधिक श्रेणीने विकास होणे म्हणजे विकास नाही. तर समाजातील शेवटच्या माणसाचा विकास म्हणजे खरा विकास असतो, हे सार्वकालिक सत्य जनतेच्या लोकमानसाच्या मनावर बिंबवणे ही काळाची गरज आहे. ती बिंबवण्यात कार्ल मार्क्सची विचारधारा आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शक ठरू शकते यात शंका नाही. मार्क्सच्या २०३ व्या जन्मदिनी त्याला विनम्र अभिवादन…

प्रसाद कुलकर्णी 

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा